निरोपाच्या पावसाचा जोरदार दणका, विदर्भात आणखी चार दिवस इशारा

नरेंद्र चोरे
Wednesday, 7 October 2020

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला होता. वरुणराजाने दणक्यात हजेरी लावून इशारा खरा ठरविला.

नागपूर  : विदर्भातून निरोप घेण्याच्या तयारीत असलेल्या मॉन्सूनच्या पावसाने अपेक्षेप्रमाणे बुधवारी शहरात जोरदार हजेरी लावली. धुवाधार पावसामुळे जागोजागी पाणी तुंबल्याने नागपूरकरांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसाळी वातावरण आणखी तीन-चार दिवस कायम राहणार असल्याचे प्रादेशिक हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला होता. वरुणराजाने दणक्यात हजेरी लावून इशारा खरा ठरविला. सकाळी काही भागांत हलक्या सरी बरसल्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र पावसाचा थेंबही पडला नाही. 

हेही वाचा - जेवताना पोळी कधी आणि किती खावी? जाणून घ्या आहारतज्ज्ञ डॉ. कविता गुप्ता यांच सल्ला
 

दुपारी चारनंतर आभाळ भरून आले. विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह अनेक भागांमध्ये अर्धा ते पाऊण तास जोरदार हजेरी लावली. बराच वेळपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. त्यामुळे अनेकांना आडोशाचा आधार घ्यावा लागला. पावसामुळे जागोजागी पाणी तुंबले होते. साडेपाचनंतर पुन्हा पावसाने झोडपून काढले. शहरात सायंकाळी साडेपाचपर्यंत १७.८ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.

विदर्भात चंद्रपूरमध्येही दमदार पाऊस झाल्याचे वृत्त आहे. याशिवाय वर्धा, भंडारा व गडचिरोली जिल्ह्यांतही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. विदर्भात वरुणराजाचा मुक्काम विकेंडपर्यंत राहण्याची दाट शक्यता आहे. तसे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. हा पाऊस काही पिकांसाठी लाभदायक मानला जात असला तरी, नुकसानच जास्त होण्याची शक्यता आहे. विशेषतः धान, सोयाबीन व कपाशीला घातक आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याची शक्यता असल्याने बळीराजाचीही चिंता वाढली आहे. 

संपादन  : अतुल मांगे  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains in nagpur, warning for four days in Vidarbha