हॅलो.. हॅलो.. बोला आवाज ऐकू येत आहे..बोला; जिल्हा परिषदेच्या ऑनलाईन सभेत तांत्रिक गोंधळ

नीलेश डोये
Saturday, 24 October 2020

हॅलो..हॅलो.. बोला आवाज ऐकू येत आहे का, असे सदस्य म्हणत होते. बोला तुमचा आवाज ऐकू येत आहे, बोला, असे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत होते.

नागपूर : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण ऑनलाईन सभेत सदस्यांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. हॅलो हॅलो... आवाज ऐकू नाही यातच सभेचा बराच वेळ गेला. विरोधकांनी बहिष्कार टाकल्यामुळे सत्ताधाऱ्यांचे चांगलेच फावले.

ऑनलाईन सभेत सहभागी होण्यासाठी पंचायत समिती स्तरावर सदस्यांना सोय करून दिली होती. पदाधिकाऱ्यांसह अधिकारी जि.प.च्या सभागृहात उपस्थित होते. सभेत ५० वर सदस्य, अधिकाऱ्यांची उपस्थित होती. सभा सुरू झाल्यानंतर अनेक सदस्यांनी मुद्दे मांडले. हे मुद्दे मांडताना तांत्रिक अडचण निर्माण झाली. हॅलो..हॅलो.. बोला आवाज ऐकू येत आहे का, असे सदस्य म्हणत होते. बोला तुमचा आवाज ऐकू येत आहे, बोला, असे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत होते.

महत्त्वाचे मुद्दे 

- कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत पावलेल्यांना श्रद्धांजली देण्यात आली.
- कोरोनासाठी सेवा देणाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
- पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणारी गाय, शेळी, कुक्कुट देण्याची योजना समाजकल्याण, महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्याचा ठराव झाला.

बनण्यासाठी बहिष्कार
भाजपचे सदस्य सभेत सहभागी झाले नाहीत. आपल्या मतदारसंघाचे प्रश्न मांडण्याची त्यांनी चांगली संधी सोडली आणि जनतेचे नुकसान केले. सरकारचे आदेश असल्याने ऑनलाईन सभा घेण्यात आली. मात्र हिरो बनण्यासाठी भाजपने बहिष्कार घातला.
रश्मी बर्वे, अध्यक्षा.

 

भाजपचे धोरण दुटप्पी
महापालिकेत भाजपची सत्ता आहे. तिथे ऑनलाईन सभा घेण्यात आल्या. जिल्हा परिषदेच्या सभेला विरोध केला. यावरून भाजपचे धोरण दुटप्पी असल्याचे दिसून येते.
मनोहर कुंभारे, उपाध्यक्ष व कॉंग्रेस गट नेते.

 

विभागीय आयुक्तांकडे तक्रार
आमचा विरोध वैयक्तिक नाही. आमच्याकडे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे पुरावे होते. सभागृहात सभा झाली असती तर आम्ही ते पुरावे सभागृहापुढे मांडले असते. पण, सत्ताधाऱ्यांना त्याची भीती होती. त्यामुळे सभा ऑनलाईन घेतली. जि.प. प्रशासनाने शासनाकडे पाठपुरावा केला असता तर सभा सभागृहात घेणे शक्य झाले असते. इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षाशिवाय सभा झाली असेल. आम्ही सर्व बाबी तपासून सभा रद्द करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे तक्रार करू.
अनिल निधान, विरोधी पक्ष नेता.

 

आवाजाची अडचण
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना सरकारने मदत केल्याने अभिनंदनाचा ठराव घ्यावा. नुकसानीचे पंचनामे फक्त शासनाचा कृषी विभाग करतो. जि.प.च्या कृषी विभागातील अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. रिक्त जागा भरायला पाहिजे. सभेत आवाजाची अडचण होती.
सलील देशमुख,
सदस्य राष्ट्रवादी.

                               


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hello ... hello ... I can hear the voice ... speak