मी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह बोलतोय.... 

राघवेंद्र टोकेकर
शुक्रवार, 19 जून 2020

आयुष्याची वीस वर्षे पूर्ण झालीत अन्‌ 2006 साली बांधकाम विभागाने सभागृहाचे नुतणीकरण केले. वास्तुचे रंगरूप पालटले अन्‌ भावही. येथे असंख्य सत्कार सोहळे अन्‌ राजकीय मेळावे झालेत. नाटकांची घंटा येथेच वाजली अन्‌ सात सुरांचा मिलाप येथेच घडला. आज मात्र सभागृहाच्या नशिबी अनिश्‍चित एकांतवास म्हणावा लागेल. 

नागपूर : कलासाधकांची काशी, संगीतसाधनेचा आधार अन्‌ असंख्य रसिकांच्या कायमच हृदयस्थानी राहीलेल्या देशपांडे सभागृहाचे किमान वर्षभरतरी दर्शन होणार नाही अशी स्थिती आहे. कोरोनाने निर्माण केलेले हे संकट आहे. मार्च महिन्यात अनिश्‍चित काळासाठी बंद झालेल्या या सभागृहात पुढची मैफल कधी रंगेल हे सांगता येणे कठीण आहे. प्रसंगी दर्दी रसिकांना रडवणारे अन्‌ हसवणारे हे सभागृह आज इतके ओसाड झाला की, तेथे जाऊन बघितले तर तोच आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय. 

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील वंदनीय अशा पंडित वसंतराव देशपांडे यांच्या पावन स्मृती जपण्यासाठी वास्तुला त्यांचे नाव देण्यात आले. ही वास्तु 1986 साली रसिकप्रेक्षकांच्या स्वाधीन झाली. मात्र महाराष्ट्राच्याच नव्हे तर जगभरातील श्रोत्यांच्या मनावार अधिराज्य गाजविलेल्या आवाजाच्या स्मृती जेथे जपल्या जाणार होत्या, तेथेच कोरोनाच्या संकटामुळे भयाण शांतता पसरली. नागपूरकरांच्या हृदयात या सभागृहाच्या असंख्य आठवणी आहेत. कोणी सांगेल जुगलबंदीच्या तर कोणी संगीत मैफलीच्या, कोटी नाटकाच्या तर कोणी बॅकस्टेजवरील विनोदांच्या. एक मात्र निश्‍चित, ज्या सभागृहाने असंख्य उपेक्षित साधकांना प्रसिद्धीच्या झोतात आणले, त्याच सभागृहाच्या नशिबी आलेला आजचा अंधार किती काळ राहील सांगता येत नाही. 

तुकाराम मुंढेंनी करून दाखवलं, 45 दिवसांत नागरिकांसाठी केली ही आवश्‍यक सुविधा

ज्यावेळी शहरात कविवर्य सुरेश भट सभागृह नव्हते, त्यावेळी देशपांडे सभागृहाची रया काही औरच होती. विशेष म्हणजे येथील बुकींग मिळवणे देखील त्यावेळी अवघड होते. येथे लागणाऱ्या लांबचलांब रांगा, वाहनतळावर होणारे वाद अन्‌ आव्हानांचा सामना करीत सादर होणारे नाट्यप्रयोग अनेकांच्या कायम लक्षात राहतील पण तुटलेल्या खुर्च्या अन्‌ अन्‌ भिंतीवरील तंबाखूचे फव्वारे देखील अनेकांच्या स्मरणात असतील. आयुष्याची वीस वर्षे पूर्ण झालीत अन्‌ 2006 साली बांधकाम विभागाने सभागृहाचे नुतणीकरण केले. वास्तुचे रंगरूप पालटले अन्‌ भावही.

512 रुपयांची आठवण 
सभागृहाने त्याकाळी ज्यांना आसरा दिला त्यातील जवळ जवळ सगळेच साधक विविध क्षेत्रातील नामवंत आहेत. सचिन ढोमणे, दत्ता हरकरे, प्रफुल्ल माटेगावकर व संदीप बारस्कर यांच्यासारख्या कलासाधकांच्या तर सभागृहाच्या बाबतीत असंख्य आठवणी आहेत. 11 फेब्रुवारी 1989 साली झालेल्या भावगीतांच्या पहिल्या कार्यक्रमासाठी डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहाचे 512 रुपये भाडे दिल्याची आठवण संगीत मैफलींचे प्रसिद्ध आयोजक प्रफुल्ल माटेगावकर यांनी सांगितली. 

येथे असंख्य सत्कार सोहळे अन्‌ राजकीय मेळावे झालेत. नाटकांची घंटा येथेच वाजली अन्‌ सात सुरांचा मिलाप येथेच घडला. आज मात्र सभागृहाच्या नशिबी अनिश्‍चित एकांतवास म्हणावा लागेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hello, I am Dr. Vasantrao Deshpande hall speaking