पावसाळ्यात घ्या हलका आहार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जून 2020

पावसाळ्यात विविध आजारांविषयी आपल्याला माहिती असते. मात्र, पावसाळ्यात आहार कोणता घ्यावा, याची पुरेशी माहिती घेतली जात नाही. चुकीच्या आहाराच्या पद्धतीमुळे पोटदुखी, गॅस, अपचनासोबत पोटाच्या तक्रारी त्रास देण्याची शक्‍यता असते. पावसाळ्यात जठराग्नी मंद झालेला असतो.

पावसाळा सुरू होण्याआधीच अनेकांच्या आरोग्याविषयी तक्रारी सुरू झाल्याचे दिसते. पावसाच्या दूषित पाण्याने आजार पसरतात. कधी ऊन, कधी पाऊस तर कधी थंडी या बदलत्या हवामानामुळे पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप हे आजार डोके वर काढतात. सध्या कोरोना विषाणूमुळे सर्वत्र भिती पसरली असून, या पार्श्‍वभूमीवर पावसाळ्यात बळावणाऱ्या आजारांपासून दूर राहणे अधिक गरजेचे झाले आहे. 
पावसाळ्यात विविध आजारांविषयी आपल्याला माहिती असते. मात्र, पावसाळ्यात आहार कोणता घ्यावा, याची पुरेशी माहिती घेतली जात नाही. चुकीच्या आहाराच्या पद्धतीमुळे पोटदुखी, गॅस, अपचनासोबत पोटाच्या तक्रारी त्रास देण्याची शक्‍यता असते. पावसाळ्यात जठराग्नी मंद झालेला असतो. त्यामुळे खूप खावेसे वाटले तरी अन्नाचे पचन मात्र चांगले होत नाही. या ऋतूत पचनास अतिशय हलका असलेला आहार घ्यायला हवा. काहीवेळा खूप खाल्ल्याने पोटाच्या व्याधी निर्माण होतात. 

आहार कसा असावा 
- पचनास हलक असणारा आहार घ्यावा 
- खूप खा खा करू नये 
- तळलेले, भाजलेले पदार्थ खूप प्रमाणात खाऊ नये 
- मांस, अतिउष्ण पदार्थ यांचा अतिरेक टाळावा 
- पित्त वाढवणारे पदार्थ या काळात खाऊ नयेत 
- आहारात सुंठ, मिरी, हिंग, लसूण, जिरे, बडीशेप यांचा समावेश करावा 
- पावसाळ्यात दोन आहारांमध्ये अंतर ठेवून खावे. 
- ताप वा अन्य आजारांत मूग डाळीचे वरण, हलक्‍या भाताची पेज, मऊ फुलके यांचा समावेश असावा. 
- धान्याच्या लाह्या, भाजलेले व भरड काढलेल्या मुगाच्या डाळीचे कढणही या ऋतूत पोषक असते 
- पालेभाज्यांचे प्रमाण कमी करावे. मात्र, फळभाज्या स्वच्छ करून आहारात त्याचा समावेश करावा. कारले, दुधी भोपळा, कारले, पडवळ, भेंडी, मोड आलेली कडधान्ये आहारात जरूर असावीत 
- आहारात तूपाचा समावेश आवर्जून करावा. त्यामुळे पित्त, वातदोष कमी होतो. 
- तळलेले पदार्थ पचण्यास जड असतात. त्यामुळे पित्त वाढते. हे पदार्थ खाणे टाळावे 
- फळे खाताना ती स्वच्छ करून, धुवूनच खावीत. अधिक पिकलेली फळे या काळात शरीरास कुपथ्य ठरू शकतात. 
- पावसाळ्यात ताजा गरम आहार घ्यावा. पचनास जड असेल असा आहार टाळावा. 
- लहान मुलांना मऊ पेज, गरम दूध, मूगाच्या डाळीचे वरण, मसाला व कमी तेल घातलेल्या भाज्या, ताजी फळे, टोमॅटो सूप असे पदार्थ आवर्जून द्यावेत. 
- पाणी स्वच्छ व उकळून थंड केलेले असावे 
- गरमागरम पदार्थ खाण्याचा कितीही मोह झाला तरीही उघड्यावरचे, बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे. त्याने जंतुसंसर्ग होऊ शकतो. 

आजारी व्यक्तींचा आहार 
- पचनास हलके असे सूप, मऊ केलेली भाताची पेज घ्यावी 
- सफरचंद, केळे शक्‍यतो टाळावे 
- नारळपाणी पिऊ नये 
- बीट वा गाजर खावे. काकडी खाऊ नये. 
- तळलेले पदार्थ टाळावेत 
- आजारातून उठल्यावर त्वरित जड वा चमचमीत पदार्थ खाऊ नयेत. या पदार्थांमुळे पुन्हा आजार बळावतो 
- डॉक्‍टरांना औषधानुरूप कोणता आहार घ्यायचे, हे जरूर विचारावे 

घरात आर्युर्वेदिक धूप घाला- 
पावसाळ्यात घरातील वातावरण शुद्ध ठेवण्यासाठी तुम्ही घरात आयुर्वेदिक धूप घालू शकता. कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात धूपाचे साहित्य मिळते. अशा प्रकारचा धूप घरात दाखवल्यामुळे घरात डास अथवा जीवजंतूंचा प्रादूर्भाव होत नाही. 

खिडकीत खडे मीठ ठेवा- 
घरातील खिडक्‍यांच्या कोपऱ्यामध्ये, बाथरूममध्ये वाटीत खडे अथवा जाडे मीठ ठेवावे. मीठामुळे घरातील वातावरण निर्जंतूक राहण्यास मदत होते. शिवाय सर्दी-खोकला झाल्यास जाड्या मीठाचा शेक घेतल्यामुळे आराम मिळतो. 

बाल्कनीत तुळशीचे रोप लावा- 
घराच्या खिडकीत अथवा बाल्कनीमध्ये तुळशीची रोपं लावावी. वास्तविक तुळस ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. तुळशीचे रोप घराबाहेर लावलेले असल्यास घरातील वातावरण शूद्ध राहण्यास मदत होते. ज्यामुळे सर्दी, खोकल्यासारखे आजार कमी प्रमाणात होतात. शिवाय सर्दी खोकला झाल्यास पटकन तुळशीच्या पानांचा रस अथवा काढा घ्यावा. ज्यामुळे लवकर आराम मिळतो. 

रोज एक लिंबु खा 
हळदीचे दुध पिल्यास किंवा अदरक चा काढा पिल्यास कोरोना होणार नाही असे नाही. परंतु, त्यामुळे व्यक्तीची प्रतिकार शक्ती वाढते. पावसाळ्यात इतर आजारापासून दूर राहण्यासाठी आहारात प्रोटीन वाढवावे. दुध, दुधापासून तयार झालेले पदार्थ, सोयाबिन, अंडे, चिकन, मासे इत्यादी खाद्यपदार्थांचा समावेश रोजच्या जेवनात करावा. 
जेवनात रोज एक लिंबु खाल्यास अनेक आजार दूर राहतात. याशिवाय आवळासुपारी, ड्रायफ्रूट, चने, शेंगदाणे याचे सेवन करावे. याशिवाय 15 ते 20 मिनीट सकाळच्या उन्हात बसावे. 
कवीता गुप्ता, आहारतज्ज्ञ, नागपूर. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: helthy food