इथे जीव मुठीत घेऊन चालावे लागते ! 

file photo
file photo


नागपूर : उपराजधानीची हळूहळू "स्मार्ट सिटी'कडे वाटचाल सुरू आहे. शहराला "स्मार्ट' व अधिक देखणे बनविण्यासाठी सध्या जागोजागी विकासकामांचा धडाका सुरू आहे. पण हे करताना उदासिन प्रशासनाला ना गंभीरता, ना वेळेचे भान दिसते आहे. ठिकठिकाणी कासवगतीने कामे सुरू आहेत. झिंगाबाई टाकळी परिसरातील गोधनी रोड त्याचा उत्तम नमूना म्हणता येईल. या रस्त्यावर एकीकडे सीमेंट रोड बनत आहे, तर दुसऱ्या बाजूने खोल खड्‌डे आहेत. त्यामुळे वाहनधारकांना अक्षरश: जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागतात. कोणत्याही क्षणी अपघात होऊन जीव जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे प्रशासनाविरोधात स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. 


झिंगाबाई टाकळी व गोधनी परिसराचा गेल्या काही वर्षांपासून झपाट्याने विकास सुरू आहे. त्यामुळे रोडची कामेही जोरात चालू आहेत. या भागातील झिंगाबाई टाकळी ते गोधनी रोड या मुख्य रस्त्याचे सीमेंटीकरणाचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. वर्षभरात एका बाजूने कसाबसा सीमेंट रोड बनविला. रोड दोन फूट उंचीचा आहे. परंतु दुसऱ्या बाजूने गिट्‌टी व मोठमोठे खड्‌डे आहेत. कोरोनामुळे रोडचे काम अत्यंत कासवगतीने सुरू आहे. या मार्गावर शाळा-महाविद्‌यालये, दवाखाने व दुकाने असल्यामुळे मोठी वर्दळ असते. दररोज हजारो छोटी-मोठी वाहने धावतात. त्यामुळे वाहनधारकांना जीव धोक्‍यात वाहने चालवावी लागतात. 


वस्त्यांमध्ये शिरते पाणी 


पाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्या बनविण्यात न आल्याने पावसाचे पाणी जमा होऊन तलाव साचतो. हे पाणी श्रीकृष्ण सभागृह, कोहळे ले-आउट, गिऱ्हे ले-आउट, श्री प्रभूनगर, लक्ष्मीनगर, स्वामी समर्थनगर व आजूबाजूच्या अनेक वस्त्यांमध्ये शिरते. नागपूर सुधार प्रन्यासने विकासकामे करण्यासाठी ले-आऊटधारकांकडून विकासशुल्क घेतले. परंतु, अजूनपर्यंत येथील ले-आऊट्‌समध्ये मुलभूत सुविधा झाल्या नाहीत. प्रशासनाचा भोंगळ कारभार व चुकीच्या नियोजनामुळे येथील रहिवासी त्रस्त आहेत. 


...तर आंदोलनाचा इशारा 


यासंदर्भात येथील नागरिकांनी अनेकवेळा मनपा अधिकारी व जनप्रतिनिधींची भेट घेतली. मात्र कुणीही त्यांची अडचण गांभीर्याने घेतली नाही. लवकरात लवकर समस्या न सुटल्यास आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र कॉंग्रेस कमेटी ओबीसी सेलचे प्रदेश महासचिव संजय भिलकर, पापा शिवपेठ, नागेश राऊत, कृष्णा गावंडे, जगदीश गमे, अजय इंगोले, राजेंद्र बढिये, निखिल कापसे, विजय गायधने, संजय मांगे, आनंद टाकभवरे, वामनराव ठाकरे आदींनी दिला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com