नागपूर ग्रामीणमध्ये पाय पसरतोय कोरोना, हा भाग होणार "हॉटस्पॉट'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जून 2020

हिंगणा तालुक्‍यात पहिला रुग्ण लोकमान्यनगर परिसरात आढळला होता. येथील ज्येष्ठ नागरिकाचा कोरोनाने मृत्यू झाला. यानंतर याच भागात सहा पॉझिटिव्ह आढळले. पोलिस प्रशासनाने लोकमान्यनगर परिसर सील केला.

हिंगणा (जि. नागपूर) : नागपूर शहरालगत असलेल्या हिंगणा एमआयडीसीत कोरोनाचा शिरकाव झाला. आतापर्यंत तालुक्‍यात तब्बल 23 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. एमआयडीसीतील झोपडपट्ट्यांमध्ये प्रादुर्भाव वाढत आहे. याचा धसका प्रशासनाने घेतला. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज (ता. 12) परिसराची पाहणी केली. आगामी काळात एमआयडीसी परिसर कोरोना हॉटस्पॉट तर ठरणार नाही ना, अशी भीती व्यक्त होत आहे.

हिंगणा तालुक्‍यात पहिला रुग्ण लोकमान्यनगर परिसरात आढळला होता. येथील ज्येष्ठ नागरिकाचा कोरोनाने मृत्यू झाला. यानंतर याच भागात सहा पॉझिटिव्ह आढळले. पोलिस प्रशासनाने लोकमान्यनगर परिसर सील केला. प्रतिबंधित क्षेत्रात ग्रामसेवक व तलाठी बेपत्ता असल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेल्या रुग्णाच्या घरी व परिसरात ग्रामसेवकांच्या पुढाकाराने निर्जंतुकीकरण करण्याची मोहीम राबवणे गरजेचे आहे.

मात्र, यासाठी ग्रामसेवक पुढाकार घेत नसल्याचे दिसून येत आहे. महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी केवळ चारचाकी वाहनातून दौरा करून निघून जातात. एमआयडीसी परिसरातील पारधीनगरात एक, नीलडोह एक, गजानननगर, इसासनीमधील भीमनगरात सात व वागदरा येथे एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.

आठ दिवस अंधारात असलेल्या कलिगुडा गावाला त्याने पुरवला प्रकाश

नीलडोह येथे सरपंचाच्या पतीला लागण झाली. एमआयडीसी परिसरात परप्रांतीय कामगार मोठ्या संख्येने आहेत. एमआयडीसी परिसरातील सर्वांत मोठी झोपडपट्टी म्हणून अमदनगर व भीमनगरचा समावेश आहे. येथे शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

शुक्रवारी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्यासह जि.प.चे सीईओ योगेश कुंभेजकर, आरोग्य विभागाच्या चमूने एमआयडीसी परिसरातील पारधीनगर, भीमनगर, नीलडोह, गजानननगर व वागदरा परिसराची पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी, तालुकास्तरीय कोविड समितीचे सचिव उपअभियंता जे. के. राव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पडवे, तहसीलदार संतोष खांडरे, खंडविकास अधिकारी महेंद्र जुवारे, डिगडोह सरपंच इंद्रायणी काळबांडे, पं. स. सदस्य सुरेश काळबांडे, जि. प. सदस्य सुचित्रा ठाकरे, अर्चना गिरी, नीलडोह सरपंच वनिता गडमडे, ठाणेदार हेमंतकुमार खराबे, वैद्यकीय पथकातील कर्मचारी उपस्थित होते. कोरोना प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांच्या समस्या जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या.
 

नवीन भानेगावात पुन्हा एक पॉझिटिव्ह

खापरखेडा : नवीन भानेगाव येथे एकाला कोरोनाची बाधा झाल्याने परिसरात खळबळ उडाली. प्रशासनाने वॉर्ड एक परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित केले. दरम्यान, रुग्णाच्या संपर्कातील 27 जणांना नागपूर येथे क्वारंटाइन करण्यात आले. यातील सर्वांच्या तपासणीत कोरोना बाधित रुग्णाच्या पत्नीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून, इतर 26 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. मात्र पत्नीच्या संपर्कात येणाऱ्या महिलेला आज क्वारंटाईन करण्यात आले. रुग्ण आढळलेला परिसर सील केला असून, आरोग्य कर्मचाऱ्यांची चमू घरोघरी जाऊन तपासणी करीत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingana MIDC campus likely to be a corona hotspot