घरी जायची भीती, डोक्‍याचा भुगा, डोळ्यांत पाणी... ही त्यांची कहाणी 

file photo
file photo

 नागपूर : कोरोनाविरुद्धच्या लढाईत आरोग्य विभागाच्या खांद्याला खांदा लावून पोलिस विभाग सहकार्य करीत आहे. मात्र, दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने पोलिसांचे मनोबल खचत आहे. एरव्ही 12 ते 16 तास ड्यूटी केल्यानंतर केव्हा घरी पोहोचतो आणि केव्हा नाही, असे वाटत असलेल्या पोलिसांना आता मात्र बंदोबस्तावरून सुटी मिळताच घरी जाण्याच्या विचाराने मनात धस्स होते. घरी पोहोचताच चिल्यापिल्यांना दूर ठेवून थेट स्नानगृह गाठावे लागते. वर्दी, काठी, बूट आणि टोपी सॅनिटाइज करावे लागते. स्वत:पेक्षा कुटुंबीयांच्या जीवाची भीती असल्याने हे सर्व करावे लागते. परंतु, कर्तव्य निभवायचचे आहे, हे मनात ठरवून पुन्हा सज्ज व्हावे लागते, अशी स्थिती पोलिस कर्मचाऱ्यांची आहे. 

कर्तव्याचा भाग
सध्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची ड्युटी कोणत्याही तपासात किंवा गुन्ह्याच्या चौकशीसाठी लावण्यात येत नसून थेट बंदोबस्ताची कमान पोलिसांवर आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने कोण कोरोनाबाधित किंवा कुणात कोरोनाची लक्षणे आहेत, हे ओळखणे कठीण आहे. रस्त्यावर 12 ते 14 तास तैनात असताना शेकडो लोकांचा सामना करावा लागतो. अनेकांशी हुज्जतही घालावी लागते तर काहींसोबत दोन-दोन हातही करावे लागतात. मात्र, हा कर्तव्याचा भाग असल्याने ताण वाटत नाही. मात्र, खरी परीक्षा सुरू होते, ती ड्युटी संपल्यानंतर घरी जाण्यासाठी निघताना. घरी पोहोचताच चिमुकल्यांना "दूर राहा.. बाजू व्हा.. जवळ येऊ नका... स्पर्श करू नका...' असे सांगून दूर लोटावे लागते. सर्व वस्तू सॅनिटाईज करून अंघोळीनंतर त्यांना जवळ घ्यावे लागते. हा प्रकार असह्य होत असला तरी कर्तव्याचा भाग म्हणून पोलिस कर्मचारी खंबीरपणे या परिस्थितीचा सामना करीत आहेत. 

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल 
पोलिस कर्मचारी घरी आल्यानंतर कसे स्वतःला कुटुंबातील सदस्यांपासूर दूर ठेवतात. मुलांनासुद्धा जवळ घेत नाहीत. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशा व्हिडिओमधून पोलिसांच्या कौटुंबिक जीवनात येणाऱ्या अडचणींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. 
 
तेव्हा डोळ्यांत पाणी... 
ती मला पाहताच बिलगण्याचा प्रयत्न करते. अगदी घरात येताच अंगाखांद्यावर खेळणाऱ्या चिमुकलीला दूर ठेवावे लागते. आई आणि मुलीच्या नात्यातील तो ओलावा आता पूर्वीसारखा जाणवत नाही. "मम्मी तुझे पूर्वीसारखे माझ्यावर प्रेम राहिले नाही गं.' असे चिमुकली म्हणते, त्यावेळी डोळ्यांत पाणी येते. परंतु, तिची समजूत घालण्यासाठी माझ्याकडे शब्दसुद्धा नसतात, अशी प्रतिक्रिया महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी व्यक्‍त केली. 
 
डोक्‍याचा भुगा होतो... 
रस्त्यावर बंदोबस्तात दुचाकीवाल्यांना अडविले तर विविध कारणे सांगितली जातात. त्याला कोरोनाचा धोका सांगितल्यानंतरही तो ऐकत नाही. त्याला संचारबंदीत फिरण्यास मनाई असल्याचे सांगितले की तो आमच्यावरच बफरतो. अशा स्थितीत त्याला दोन दंडे द्यावे लागतात, त्यावेळी डोक्‍याचा भुगा होता. आम्हाला कर्तव्यामुळे घरी राहता येत नाही, आणि ज्यांना घरी राहण्याची संधी आहे तो कोरोनाच्या आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न करतात, हे पाहिले की मनस्ताप होतो, अशी प्रतिक्रिया पोलिस कर्मचाऱ्याने व्यक्‍त केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com