तासाभराच्या पावसाने नागपूर "स्मार्ट सिटी'चा फज्जा

file photo
file photo

नागपूर : "स्मार्ट सिटी'च्या दिशेने झपाट्याने वाटचाल करणाऱ्या उपराजधानीची मंगळवारी रात्री पहिल्याच पावसाने अक्षरश: दाणादाण उडविली. केवळ तास-दीड तास बसरलेल्या धो-धो पावसाने अख्खे शहर जलमय झाले. अनेक वस्त्या व झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरल्याने शेकडो नागरिकांना प्रचंड मनस्ताप झाला. अन्नधान्य खराब झाले, कित्येकांना रात्र जागवून काढावी लागली. पावसाने केवळ "स्मार्ट सिटी'चाच फज्जा उडविला नाही, तर महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभारही चव्हाट्यावर आणला.

नागपूरला "स्मार्ट सिटी' बनविण्यासाठी ठिकठिकाणी कामे सुरू आहेत. ही कामे करताना प्रभावी नियोजन अतिशय आवश्‍यक असते. विशेषत: विदर्भातील पावसाळ्यावर डोळा ठेवून रस्ते, गडर व नाल्यांची कामे करावी लागते. दुर्दैवाने त्याचा विचारच झालेला दिसत नाही. त्यामुळेच थोडा जरी दणक्‍याचा पाऊस आला, तरीदेखील जागोजागी तुडुंब तलाव साचतात. मंगळवारी साडेनऊनंतर शहरात विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह वरुणराजा मनसोक्‍त बरसला. पाण्याचा निचरा व्हायला पुरेशी जागा नसल्यामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय झाले होते. रस्त्यांवर जिकडेतिकडे पाणीच पाणी दिसत होते. काही ठिकाणी डिव्हायडरदेखील बराच वेळपर्यंत पाण्यात होते. पावसामुळे केवळ झोपडपट्‌टीवासीच त्रस्त नव्हते, मोठमोठे अपार्टमेंट्‌स, मंगल कार्यालये, बगीचे, शाळा-महाविद्यालये, शासकीय व खासगी कार्यालये व इतर वास्तूंनाही पावसाचा चांगलाच फटका बसला.

 सिमेंट रोडच्या नावाखाली शहरात सध्या जागोजागी खड्‌डे खोदणे सुरू आहे. त्यामुळे नागरिकांच्या अडचणीत आणखीणच भर पडली आहे. मोठ्या प्रमाणावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आम्हाला "स्मार्ट सिटी' नको, केवळ मूलभूत सोयीसुविधा द्या, अशी चर्चा आता नागपूरकरांमध्ये जोर धरू लागली आहे. भोंगळ कारभार व नियोजनाअभावीचे हे सर्व घडत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. अवघ्या 48 मिलिमीटर पावसाने मनपाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला आहे.

अग्निशमन विभागाची दमछाक
पावसानंतर तक्रारींचा प्रचंड पाऊस पडल्याने अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. वैभव अपार्टमेंट (जरिपटका), जाटतरोडी, खामला, धंतोली, मेडीकल चौक, गांधीबाग, लकडगंज, मानेवाडा, दर्शन कॉलनी, दयानंद पार्क, सरदार पटेल चौक, पद्मावती टी- पॉइंट, घडीवाल ले-आउट, गणेश चौक, काशीबाई देऊळ, गंजीपेठ, योगेंद्रनगर, सी. ए. रोड, हिंगण्यासह अनेक ठिकाणी पाणी शिरल्याच्या विजा पडल्याच्या, आग लागल्याच्या आणि झाडे कोसळल्याच्या तक्रारी आल्या. विभागाकडे उशिरा रात्रीपर्यंत तक्रारींचा ओघ सुरूच होता. पावसाच्या कचाट्यातून पॉश वस्त्याही सुटल्या नाहीत, हे उल्लेखनीय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com