महापालिकेला कसा पडतोय कोरोनाचा विळखा ? वाचा सविस्तर

राजेश प्रायकर
Wednesday, 16 September 2020

महापालिकेत आतापर्यंत अडीचशे कर्मचारी, अधिकारी बाधित आढळून आले. त्यामुळे ते नियमाप्रमाणे विलगीकरणात गेले. यातील काहींनी विलगीकरणाचा काळ पूर्ण केला. ते महापालिकेत कामावर रुजूही झाले. परंतु हे कर्मचारी, अधिकारी कोरोनातून पूर्णपणे बरे झाले काय? याबाबत कुणीही खात्रीने सांगू शकत नसल्याने इतर कर्मचारी, अधिकाऱ्यांत भीतीचे वातावरण आहे.

नागपूर : कोरोनाची बाधा झाल्यानंतर अनेक कर्मचारी, अधिकारी विलगीकरणात होते. विलगीकरणाचा काळ पूर्ण केल्यानंतर कोरोनातून पूर्णपणे मुक्त झाले की नाही, याबाबत खात्री करण्यासाठी दुसऱ्यांदा कोरोना चाचणी करणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष करीत कर्मचारी, अधिकारी थेट कामावर येत आहेत. त्यामुळे आतापर्यंत बाधा न झालेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांत भीतीचे वातावरण आहे. याशिवाय संपूर्ण महापालिकाच कोरोनाच्या विळख्यात येण्याचा धोकाही वाढला आहे.

महापालिकेत आतापर्यंत अडीचशे कर्मचारी, अधिकारी बाधित आढळून आले. त्यामुळे ते नियमाप्रमाणे विलगीकरणात गेले. यातील काहींनी विलगीकरणाचा काळ पूर्ण केला. ते महापालिकेत कामावर रुजूही झाले. परंतु हे कर्मचारी, अधिकारी कोरोनातून पूर्णपणे बरे झाले काय? याबाबत कुणीही खात्रीने सांगू शकत नसल्याने इतर कर्मचारी, अधिकाऱ्यांत भीतीचे वातावरण आहे.

माजी आयुक्त तुकाराम मुंढे कोरोनाबाधित आढळून आले. त्यांनीही सतरा दिवसांचा विलगीकरणाचा काळ पूर्ण केला. परंतु लोकांमध्ये वावरण्यापूर्वी त्यांनी कोरोनाची दुसरी चाचणी केली होती. यात निगेटिव्ह आढळून आल्यानंतरच त्यांनी लोकांना भेटण्यास सुरुवात केली होती. लोकांपुढे जाण्यापूर्वी एक आयएएस अधिकारी दुसरी चाचणी करतात तर मग महापालिकेतील विलगीकरणाचा काळ पूर्ण केलेले कर्मचारी व अधिकारी दुसऱ्यांदा चाचणीला बगल का देत आहेत? असा सवाल महापालिकेतील एका अधिकाऱ्याने उपस्थित केला.

तीन हजार योद्धे बाधित, महापौरांनी घातली कोणती भावनिक साद? वाचा सविस्तर -

हे अधिकारी, कर्मचारी कोरोनातून पूर्णपणे बरे झाले नसल्यास त्यांच्यापासून इतरांना बाधा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक कर्मचारी, अधिकाऱ्यांनी कोरोनाची लागण होण्याची भीती व्यक्त केली. आतापर्यंत महापालिकेतील १२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे महापालिकेतील कर्मचारी, अधिकाऱ्यांनी धास्ती घेतली. त्यात आता दुसरी चाचणी न करता कामावर रुजू होत असलेल्या कर्मचाऱ्यामुळे अनेकजण सुट्यांवर जाण्याचा बेत आखत आहे. एकूणच संपूर्ण महापालिका कोरोनाच्या विळख्यात येण्याचा धोका वाढला आहे.

झोनमध्ये बेधडक प्रमाणपत्र
पॉझिटिव्ह आल्यानंतर विलगीकरणाचा काळ पूर्ण केलेले अनेकजण झोनमधून बरे झाल्याचे प्रमाणपत्र घेत असल्याचे एका कर्मचाऱ्याने नमूद केले. झोन अधिकारी कोरोनाबाधित पूर्ण बरा झाल्याचे निदान कसे करीत आहेत? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

चाचणीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना पाठविले परत
विलगीकरणाचा काळ पूर्ण केल्यानंतर काही कर्मचारी दुसऱ्यांदा चाचणीसाठी कोविड टेस्ट सेंटरवर गेले होते. त्यांना चाचणी सेंटरमधून दुसऱ्यांदा चाचणी करण्याची गरज नसल्याचे सांगून परत पाठविले जात असल्याची धक्कादायक माहितीही या कर्मचाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How does the corona fall to the Municipal Corporation? Read detailed