परीक्षा केंद्रावर जायचे तरी कसे? : एमपीएससीची तयारी करणाऱ्यांपुढे पेच

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जून 2020

पुणे, मुंबईत राहून एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांची संख्या मोठी आहे. तिथे राहणे शक्‍य नसणारे पूर्व विदर्भातील विद्यार्थी नागपुरात थांबून अभ्यास करतात. अभ्यासाची तयारी करतो त्याच शहरात केंद्राची निवड करण्याकडे उमेदवारांचा कल असतो. कोरोनाच्या संकटामुळे जवळपास सर्वच विद्यार्थी आपल्या मूळगावी परतले. अभ्यासचे ठिकाण सोडून गावी परतलेल्या राज्यभरातील उमेदवारांची संख्या 2 लाखांच्या वर असण्याचा अंदाज आहे. 

नागपूर  : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले असून 11 सप्टेंबर व 13 ऑक्‍टोबरला पेपर घेतले जाणार आहे. बाहेरगावी राहून या परीक्षेची तयारी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सध्या लॉकडाउनच्या नियमानुसार आंतरजिल्हा प्रवासाला बंदी आहे. अशा स्थितीत अन्य जिल्ह्यात परीक्षा केंद्र असल्यास पोहचायचे तरी कसे?, असा पेच उमेदवारांपुढे निर्माण झाला आहे. कोरोनाचे संकट आणि प्रवासाची अडचण लक्षात घेऊन केंद्र बदलाची मुभा द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. 
पुणे, मुंबईत राहून एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांची संख्या मोठी आहे. तिथे राहणे शक्‍य नसणारे पूर्व विदर्भातील विद्यार्थी नागपुरात थांबून अभ्यास करतात. अभ्यासाची तयारी करतो त्याच शहरात केंद्राची निवड करण्याकडे उमेदवारांचा कल असतो. कोरोनाच्या संकटामुळे जवळपास सर्वच विद्यार्थी आपल्या मूळगावी परतले. अभ्यासचे ठिकाण सोडून गावी परतलेल्या राज्यभरातील उमेदवारांची संख्या 2 लाखांच्या वर असण्याचा अंदाज आहे. 

सध्या नियम शिथील झाले असले तरी लॉकडाउन कायम आहे. त्यात राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आंतर जिल्हा प्रवासाला बंदी असल्याने अन्य जिल्ह्यात गेल्यास होम क्वारंटाईन रहावे लागते. हिच परिस्थिती कायम राहिल्यास परीक्षा केंद्रावर पोहोचता येईल की नाही, यासंदर्भात उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. परीक्षा केंद्र बदलून देण्याची मुभा द्यावी, अन्यथा अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागण्याची शक्‍यता आहे. 

स्टुडंट राईट फोरम ऑफ इंडियाचे आयोगाला निवेदन 
कोरोनाचे संकट व लॉकडाउनचा विचार करता विद्यार्थ्यांना केंद्रावर पोहोचण्यात अडचणी येऊ शकतात. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या सुविधेनुसार गृह जिल्ह्यात किंवा जवळच्या केंद्रावर परीक्षा देण्याची मुभा द्यावी, अशी मागणी स्टुडंट राईट फोरम ऑफ इंडियाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे निवेदनातून केली आहे. 

परीक्षा पुढे ढकलावी - खुशबू 
कोरोनाचे संकट कायम असताना गृहजिल्हा सोडून अन्य जिल्ह्यात जाणे सोपे नाही. पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक यासारख्या कोरोनाचे रुग्ण अधिक असणाऱ्या शहरात परीक्षा द्यायला जाणे योग्यही नाही. ही अडचण लक्षात घेऊन परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी खुशबू गायकवाड या विद्यार्थिनीने व्यक्त केली. ती पुण्यात राहून परीक्षेची तयारी करीत होती. कोरोनाचा संसर्ग वाढू लागताच ती परतली. तिचे परीक्षा केंद्र नागपूरच असले तरी अनेक मैत्रिणींनी पुणे केंद्राची निवड केली आहे. परीक्षेपेक्षा जीव महत्त्वाचा असल्याने अनेक उमेदवार परीक्षेवर पाणी फेरण्याच्या विचारात असल्याचे तिने सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How to go at exam center?