विदर्भाने 34 वर्षांपूर्वी कसे आणले उत्तर प्रदेशच्या नाकीनऊ, वाचा

सुहास फडकर
सुहास फडकर


नागपूर : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील मध्य विभागात उत्तर प्रदेशचा संघ नेहमीच प्रतिस्पर्ध्यांवर वरचढ ठरायचा. परंतु, कधीकधी विदर्भासारखे कमकुवत संघही त्यांच्यावर भारी पडायचे. 34 वर्षांपूर्वी व्हीसीएच्या सिव्हिल लाइन्स मैदानावर झालेल्या अशाच एका सामन्यात विदर्भाने उत्तर प्रदेशच्या अक्षरश: नाकीनऊ आणले होते. अखेर कसाबसा सामना वाचवून उत्तर प्रदेशने आपली इज्जत वाचविली. 

नोव्हेंबर 1986 मध्ये झालेल्या तीनदिवसीय सामन्यात कर्णधार प्रवीण हिंगणीकर, उमाकांत फाटे, मदन कावरे, राजू पनकुले, सुहास फडकर, सुनील हेडाऊ, सतीश टकले, विकास गवते, हेमंत वसू, संजय जुगादे, भरत ठाकरेसारखे स्टार खेळाडू विदर्भ संघाची ताकद होती. तर, उत्तर प्रदेश संघातही कर्णधार रजिंदरसिंग हंस, कसोटीपटू गोपाल शर्मा, आर. पी. सिंग, शशिकांत खंडकर, सुनील चतुर्वेदी, एस. पी. सिंग, राहुल सप्रु, व्ही. एस. यादव, एस. आनंद, के. के. शर्मा, एम. ए. अन्सारीसारखे दर्जेदार फलंदाज व गोलंदाज होते. नाणेफेक जिंकल्यानंतर विदर्भाने उत्तर प्रदेशचा पहिला डाव अवघ्या 183 धावांत गुंडाळून पाहुण्यांना पहिल्याच दिवशी "जोर का झटका' दिला. टकले व जुगादेने प्रत्येकी तीन आणि गवते व ठाकरे यांनी दोन-दोन गडी बाद करून चहापानापूर्वीच पाहुण्यांची दाणादाण उडविली. 

विदर्भानेही सुरुवातीलाच 54 धावांमध्ये तीन गडी गमावले. त्यामुळे आपलीही उत्तर प्रदेशसारखीच अवस्था होणार की काय? अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, सुहास फडकर यांनी संघावर ती वेळ येऊ दिली नाही. एका टोकाने पटापट गडी बाद होत असताना त्यांनी संघाला तीनशेपार पोहोचविले. फडकर यांच्या 128 धावांमुळेच विदर्भाला पहिल्या डावात 126 धावांची मोठी आघाडी मिळू शकली. के. के. शर्मा यांचे आठ बळीही विदर्भाला रोखू शकले नाहीत. सलामीवीर एस. पी. सिंग यांच्या 116 धावांच्या जोरावर उत्तर प्रदेशने दुसऱ्या डावात 284 धावा काढून सामन्यात रंगत आणली खरी, पण पराभवाचे सावट अद्याप दूर झाले नव्हते. 

अन्‌ विदर्भाने सोडला विजयाचा नाद 


विदर्भाला विजयासाठी 33 षट्‌कांत 159 धावा खूप मोठ्या नव्हत्या. संघात अनेक "मॅचविनर' असल्यामुळे ते प्रतिषटक पाच धावा सहज काढू शकले असते. त्यासाठी सुरुवात चांगली होणे आवश्‍यक होते. दुर्दैवाने 34 धावांमध्येच हिंगणीकर (14 धावा), कावरे (2 धावा) व पनकुले (6 धावा) हे आघाडीचे तीन फलंदाज बाद झाल्याने विदर्भाने विजयाचा नाद सोडून दिला. त्यानंतर उर्वरित षटके निमूटपणे खेळून काढत सामना पहिल्या डावाच्या आघाडीवर जिंकून दुधाची तहान ताकावर भागविली. अनिर्णीत राहिलेल्या सामन्यात विदर्भाने सर्वाधिक 13 गुणांची कमाई केली. तर, उत्तर प्रदेशला 8 गुणांवर समाधान मानावे लागले. फडकर यांच्या शतकाखेरीज ठाकरे यांचे दुसऱ्या डावातील पाच बळी विदर्भासाठी समाधानाची बाब ठरली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com