निर्णय चुकल्याने कसा हिरावला विदर्भाचा विजय 

सुहास फडकर
सुहास फडकर


नागपूर : अटीतटीच्या क्षणी अचूक निर्णय घेण्यासाठी झालेला उशीर किती घातक ठरू शकतो, याचा अनुभव 35 वर्षांपूर्वी विदर्भ रणजी संघाला मध्य प्रदेशविरुद्ध सिव्हिल लाइन्स मैदानावर झालेल्या सामन्यादरम्यान आला. पहिल्या डावात 88 धावांची मोठी आघाडी घेतल्यानंतर विदर्भाने दुसरा डाव घोषित करताना थोडा उशीर केला. त्यामुळे हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला गेला. विदर्भाने पहिल्या डावातील आघाडीवर सामना जिंकला. परंतु, निर्णायक विजय मिळवू न शकल्याचे दु:ख मनात राहून गेले. 


नोव्हेंबर 1985 मध्ये खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात विजय तेलंग यांच्या नेतृत्वाखालील विदर्भ संघात प्रवीण हिंगणीकर, सुनील मनोहर, सुहास फडकर, सतीश टकले, उस्मान गनी, प्रशांत पंडित, विकास गवते, विजय जोशींसारखे खेळाडू होते. तर मेहमूद हसनच्या नेतृत्वाखालील मध्य प्रदेश संघात आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू नरेंद्र हिरवानी, एस. अन्सारी, संजीवा राव, एम. एस. साहनी, ए. लघाटे, एम. हसन, आर. तलवार, देवाशीष निलोसे, एम. सातोकर, जे. वेगडसारखे दिग्गज होते. विदर्भाने फलकावर 302 धावा लावून सुरुवात चांगली केली. आठव्या स्थानावर फलंदाजीस आलेल्या टकले (66 धावा), त्याचप्रमाणे गवते (61 धावा) व हिंगणीकर (51 धावा) यांच्या अर्धशतकांखेरीज कर्णधार तेलंग यांचे 48 व फडकर यांचे 37 धावांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. मध्य प्रदेशकडून हिरवाणी यांनी चार गडी बाद केले. 


मध्य प्रदेशचा पहिला डाव अवघ्या 214 धावांत आटोपला. टकले व गवते यांनी प्रत्येकी चार गडी बाद करून विदर्भाला 88 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. सामना निकाली काढण्याच्या दृष्टीने विदर्भाने प्रयत्न सुरू केले. त्यांनी दुसऱ्या डावात वेगाने धावा काढल्या, पण या प्रयत्नात विदर्भाचे फलंदाज थोडे अधिक षटके खेळले. शेवटी हा बचावात्मक पवित्राच विदर्भाला घातक ठरला. कारण विदर्भाच्या गोलंदाजांना मध्य प्रदेशचा दुसरा डाव गुंडाळण्यासाठी पुरेशी षटकेच मिळाली नाही. फडकर यांनी दुसऱ्या डावात शतक (127 धावा) झळकाविले. तर पंडीत यांनी 55 धावांचे योगदान दिले. 

उशीर केला अन्‌ विजयही हिरावला 


विदर्भाने विजयासाठी 381 धावांचे लक्ष्य ठेवल्यानंतर मध्य प्रदेश संघ धावांचा पाठलाग करणार नाही, असे वाटले होते. मात्र, सहानी (123 धावा) व संजीवा रावच्या (72 धावा) दीडशतकी भागीदारीने पाहुण्या संघालाही जोश चढला. मध्य प्रदेशच्या आक्रमक पवित्र्यामुळे एका क्षणासाठी वैदर्भी खेळाडूही बॅकफुटवर आले. मध्य प्रदेशला विजयासाठी जेमतेम 51 धावांची गरज असताना षटके संपल्याने सामना अनिर्णीत राहिला. त्यावेळी मध्य प्रदेशची 8 बाद 330 धावा अशी स्थिती होती. विदर्भाला विजयासाठी फक्‍त दोन विकेटसची आवश्‍यकता होती. दुर्देवाने विदर्भाला विजय खेचता आला नाही. उशिरा घेतलेल्या निर्णयामुळेच विदर्भाला निर्णायक विजयापासून वंचित राहावे लागले. गनी यांचेही पाच बळी वाया गेले. सामन्यानंतर वैदर्भी खेळाडूंनाही आपली चूक लक्षात आली. शतकवीर सुहास फडकर यांनीदेखील ती भावना बोलून दाखविली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com