इतवारीत केमिकल, रंग, प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जून 2020

इतवारीत चुना ओळ येथे जंगल्याजी धोंडबाजी इंटरप्राईजेस हे जुने प्रतिष्ठान आहे. अत्यंत दाटीवाटीचा परिसरात असलेल्या जंगल्याजी धोंडबाजी इंटरप्रायजेसच्या चार मजली इमारतीला आज पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास आग लागली. या भागात इमारती लागूनच असल्याने नागरिकांतही भीती निर्माण झाली.

नागपूर : विदर्भातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या इतवारी भागातील चुना ओळीतील रंग, केमिकल, प्लास्टिकच्या बहुमजली गोदामाला आज पहाटे आग लागली. दाटीवाटीचे क्षेत्र व अरुंद रस्त्यामुळे आग विझविण्यासाठी अग्निशमन जवानांना मोठी कसरत करावी लागली. मुख्य रस्त्यावर अग्निशमन बंब उभे ठेवून सातशे मीटर लांब पाईपद्वारे पाण्याचा मारा करून दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या आगीत कोट्यवधीचे रंग, केमिकल जळाले. 

इतवारीत चुना ओळ येथे जंगल्याजी धोंडबाजी इंटरप्राईजेस हे जुने प्रतिष्ठान आहे. अत्यंत दाटीवाटीचा परिसरात असलेल्या जंगल्याजी धोंडबाजी इंटरप्रायजेसच्या चार मजली इमारतीला आज पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास आग लागली. या भागात इमारती लागूनच असल्याने नागरिकांतही भीती निर्माण झाली. येथील नागरिकांनी तत्काळ आगीची माहिती अशोक नाचनकर यांना तसेच अग्निशमन विभागाला दिली. लकडगंज व गंजीपेठ अग्निशमन केंद्रातील दोन अग्निशमन बंब तत्काळ रवाना करण्यात आले. 

गोदामातील प्लास्टिक, केमिकलमुळे आगीने रौद्र रूप धारण केले. त्यामुळे इतर घरे तसेच दुकानांनाही धोका निर्माण झाला. तत्काळ सिव्हिल, कॉटन मार्केट, सुगतनगर, सक्करदरा या अग्निशमन केंद्रातील अग्निशमन बंबही बोलावण्यात आले. मात्र तोपर्यंत आग चौथ्या माळ्यापर्यंत पोहचली होती. इमारतीत पेंट तयार करण्यासाठी केमिकल असल्याने आग लवकरच पसरली. या इमारतीत पहिल्या माळ्यावर दुकान तर वरच्या माळ्यांना गोदामाचे स्वरूप दिले आहे. या गोदामात कोट्यवधींचा पेंट, नायलॉन रस्सी आदी सामान ठेवले होते. ही सर्व साम्रगी लवकर आग पकडणारी असल्यामुळे आगीने रौद्ररुप धारण केले. 

असे का घडले? - तीन हजार मुलींचा बाप अखेर कोसळला..पोरके करून गेला
 

या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन जवानांना तारेवरची कसरत करावी लागली. आग लागलेल्या इमारतीपर्यंत अग्निशमन बंब जात नसल्याने जागनाथ बुधवारी या मुख्य रस्त्यावर ते उभे करण्यात आले. तेथून अनेक पाईप जोडून इमारतीपर्यंत पाणी पोहोचविण्यात आले. अग्निशमन जवानांनी सातत्याने पाण्याचा मारा करीत इतर भागात आग पसरू नये, याची काळजी घेतली. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 10 अग्निशमन बंबातून सतत पाण्याचा मारा केला. त्यामुळे आग आटोक्‍यात आली. 

मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्या नेतृत्वात व उपमुख्य अग्निशमन अधिकारी बी. पी. चंदनखेडे यांच्या मार्गदर्शनात सर्व केंद्र अधिकाऱ्यांनी आगीवर नियंत्रणासाठी सात तास प्रयत्न केले. आग विझली असली तरी त्यातून धूर बाहेर येत असल्याने दोन अग्निशमन बंब घटनास्थळी ठेवण्यात आले आहे. आगीदरम्यान विभागीय केंद्र अधिकारी मोहन गुडधे, अनिल गोळे, धर्मराज नाकोड, राजेन्द्र दुबे, एस. बी. रामगोणीवार, सुनिल डोकरे, बी. बी. वाघ, वाघमारे व इतर कर्मचाऱ्यांनीही प्रयत्न केले. 

नागरिकांची गर्दी 

आग लागल्यानंतर आगीचे लोळ दूरूनच दिसून लागले. परिसरातील नागरिकांसह इतर भागातील नागरिकांनीही आग पाहण्यासाठी गर्दी केली. अनेकांनी मोबाईल कॅमेऱ्याद्वारे आगीचे फोटो काढले. अग्निशमन जवानांनी नागरिकांना दूर करण्याची व पाण्याचा मारा करण्याची दुहेरी कामगिरी एकाचवेळी पार पाडली. 

इमारतीचे बांधकाम तोडले 

चार मजली इमारतीचे बांधकाम पक्के असल्याने सिव्हिल लाईन येथील आपातकालीन नियंत्रण कक्षातील 'इंन्सीडंट रिस्पॉन्स टीम'सह जेसीबीही घटनास्थळी आणण्यात आले. आगीवर नियंत्रणासाठी अडथळा ठरत असलेला इमारतीचा भाग जेसीबीने तोडण्यात आला. बांधकाम तोडल्यानंतर अग्निशमन जवानांनी इमारतीत प्रवेश केला. 

दहा दिवसांत दुसरा आघात 

नाचनकर कुटुंबातील सदस्य गणेश नाचनकर यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. आज त्यांचा दशक्रीया विधी होता. याकरिता नाचनकर कुटुंबिय हे रामटेक येथे जाणार होते. परंतु, त्यापूर्वीच आगीची घटना घडली. परिणामी, नाचनकर कुटुंबियांवर दहा दिवसातच आणखी एक संकट कोसळले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A huge fire in a chemical, paint, plastic warehouse