घरफोडीतील पाच लाखांसाठी सनीचा "गेम'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जून 2020


 सनी याने उमरेडमध्ये एका मोठी घरफोडी केली. यात जवळपास 10 लाख रुपये सनी याला मिळाले. मात्र, वाटणीत आलेली पाच लाखांची रक्कम सनी याने रायडर व अन्य साथीदारांना दिली नाही. त्यामुळे त्यांच्यात वाद सुरू होता. पैशाच्या वादातून चार दिवसांपूर्वी सनी व प्रशिल या दोघांमध्ये हाणामारी झाली.

नागपूर : घरफोडी केल्यानंतर चोरीच्या पैशाची वाटणीतील मोठा हिस्सा कुख्यात सन्नी दामोदर जांगिड (वय 20 रा. चंद्रनगर) याने घेतला होता. त्यापैकी काही रक्‍कम सनीला चार आरोपी मागत होते. मात्र, तो पैसे देत नसल्यामुळे सनीचा नियोजन आखून "गेम' करण्यात आल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. सनी जांगिड हत्याकांडात अजनी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. तर हुडकेश्वर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वीच अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते. प्रशिल जाधव ऊर्फ मोनू रायडर व आकाश शेवारे अशी अटकेतील मारेकऱ्यांची नावे आहेत.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी याने उमरेडमध्ये एका मोठी घरफोडी केली. यात जवळपास 10 लाख रुपये सनी याला मिळाले. मात्र, वाटणीत आलेली पाच लाखांची रक्कम सनी याने रायडर व अन्य साथीदारांना दिली नाही. त्यामुळे त्यांच्यात वाद सुरू होता. पैशाच्या वादातून चार दिवसांपूर्वी सनी व प्रशिल या दोघांमध्ये हाणामारी झाली. शनिवारी सनी हा त्याचा मित्र सौरभ लांडे याच्या अंत्यसंस्कारासाठी मानेवाडा घाट येथे गेला. याचदरम्यान प्रशिल याने सनी याच्या मोबाईलवर संपर्क साधून त्याला मानेवाडा घाटामागील श्रीनगर परिसरात बोलाविले. (एमएच-40-बीवाय-0682) या क्रमांकाच्या मोपेडवर बसून प्रशिल व त्याचे दोन साथीदार सनी याला घेऊन गेले. त्यांनी सनी याला पाच लाख मागितले. सनी याने पैसे देण्यास टाळाटाळ केली.

वाचा- गर्लफ्रेंडवर पैसे उडविण्यासाठी अवलंबला वाममार्ग, पोलिसांनी सापळा रचला आणि...

असा केला खात्मा
सनीचे मोपेडवरून तिघांनी अपहरण केले. त्याला चालत्या गाडीवरून पाच लाखांचा हिशेब देण्यासाठी मारहाण सुरू केली. त्यामुळे सनीने चालत्या दुचाकीवरून उडी मारली आणि पळायला लागला. प्रशिल व त्याच्या साथीदारांनी पाठलाग करून त्याला पकडले. जबरदस्त मारहाण केली. तरी तो पैसे देण्यास नकार देत होता. त्यामुळे आरोपींनी आधी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. नंतर सनीचा गळा दाबून हत्या केली व पसार झाले.

आई घरी असती तर...
नंदा जांगीड या पोलिस स्टेशनमध्ये असतानाच सनी हा पैसे देण्यासाठी प्रशिल व त्याच्या साथीदारांना घरी घेऊन आला. घराला कुलूप होते. त्यामुळे प्रशिल याला पैसे मिळाले नाही. आई परतल्यानंतर पैसे देतो, असे सनी प्रशिल याला म्हणाला. मात्र, आता सनी याला सोडले तर तो आपल्याला ठार मारेल, अशी भीती प्रशिल याला होती. त्यामुळे प्रशिल व त्याचे साथीदार सनी याला बेसाजवळील दुंडा मारुती परिसरात घेऊन गेले. तेथे त्याचा खून केला. रविवारी सायंकाळी सनीचा मृतदेह आढळला. जर सनीची आई घरी असती तर सनीचा जीव वाचला असता.

गॅंगवॉर भडकणार !
सनी हा कुख्यात गुंडाचा भाचा होता. मामाच्या नावावर सनी रंगदारी करीत होता. मात्र, सनीचा "गेम' केल्यामुळे आता अजनी-हुडकेश्‍वर परिसरात गॅंगवार भडकण्याची चिन्हे आहेत. सनीच्या हत्याकांडानंतर त्याचा मामा आपल्या चौघांचाही गेम करेल, ही भीती असल्यामुळे चारही आरोपींनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hulligance Sunny murdered not sharing five lakh