पतीपत्नी कामावरून दुचाकीने जात होते घरी, परंतू रस्त्यात घडले भयंकर...

अनिल पवार
Thursday, 23 July 2020

नागपूर-उमरेड महामार्गावर चौपदरीकरणाचे युद्धपातळीवर काम सुरू आहे. रस्त्याच्या बाजूला गिट्‌टीचे मोठमोठे ढिग टाकलेले आहेत. रामचंद्र वाघधरे(वय46,माडेगाव, ता.लाखांदूर भंडारा) व सोबत दुचाकीवर स्वार असलेल्या पत्नी त्रिशला वाघधरे(वय32) हे दोघे पतीपत्नी खापरी रेल्वे येथे आश्रमशाळेत काम करीत होते.

चांपा (जि.नागपूर :  आश्रमशाळेतील नोकरी करून घरी कामानिमित्त पतीपत्नी दुचाकीने जात होते. घरी काही कार्यक्रम असल्यामुळे ते आनंदात घराकडे जात होते. परंतू काळाला ते मंजूर नसावे कदाचित. भरधाव वेगाने येणा-या ट्रकने धडक दिल्यामुळे घडले ते भयंकर.

अधिक वाचा :नागपूर जिल्हयातील "या' तालुक्‍यात आहे कोरोनाचा कहर, आतापर्यंत चौघांचा मृत्यू

रस्त्याचे काम होते युद्‌धपातळीवर सुरू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर-उमरेड महामार्गावर चौपदरीकरणाचे युद्धपातळीवर काम सुरू आहे. रस्त्याच्या बाजूला गिट्‌टीचे मोठमोठे ढिग टाकलेले आहेत. रामचंद्र वाघधरे(वय46,माडेगाव, ता.लाखांदूर भंडारा) व सोबत दुचाकीवर स्वार असलेल्या पत्नी त्रिशला वाघधरे(वय32) हे दोघे पतीपत्नी खापरी रेल्वे येथे आश्रमशाळेत काम करीत होते. पतीपत्नी दोघेही घरी एका कार्यक्रमानिमित्त दुचाकीने जात असताना उमरेड तालुक्‍यांतील उटी शिवारात नागपूररवरून भरधाव वेगाने येत असलेल्या ट्रकचा ताबा सुटल्याने विरूद्ध दिशेने जात होता. त्याचवेळी या रस्त्यावरून जात असलेल्या दादा हरी सुर्यवंशी (वय48,वाल्मिकी नगर कुर्जारोड ब्रम्हपुरी) यांच्या चारचाकीला कट मारून समोरील दुचाकीला जोरदार धडक दिली.

अधिक वाचा : गृहमंत्री थेट पोहोचले सिहोरा वाळूघाटावर आणि फर्माविले की...

..आणि घडले दुर्दैवी
अपघात एवढा जबर होता की दुचाकीचा चेंदामेदा झाला. या घटनेत दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सोबत असलेल्या पत्नी त्रीशला या गंभीर जखमी झाल्या. उपचाराकरीता शासकीय रुग्णालयात नेताना त्यांचा मृत्यू झाला. सकाळी आठ वाजताच्या सुमारास उटी शिवारातील नागमंदिर नजीकच्या परिसरात घटना घडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पाहता पाहता जमाव उपस्थित झाला. कुही पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पाचगाव पोलिस चौकीचे प्रभारी कमलेश सोनटक्के, दिलीप लांजेवार, पवन सावरकर, विजय कुमरे, अमित पवार, संजय कानडे या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना तत्काळ उपचारासाठी नागपूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविले. परंतू दोघाही पतीपत्नीचा मृत्यू झाला. घटनेचा पुढील तपास कुही पोलिस करीत आहेत.
    

संपादन : विजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband and wife were going home by bike from work, but something terrible happened on the road