टाकू का विहिरीत उडी? असे म्हणताच गेला तोल...

अनिल कांबळे
Wednesday, 28 October 2020

राजेश हा खासगी काम करतो तर पत्नी मेट्रोमध्ये नोकरीला आहे. त्यांना दोन मुली एक मुलगा आहे. राजेश यांना दारूचे व्यसन होते. त्याला दारू सोडण्यासाठी पत्नी वारंवार समजूत घालत होती. मात्र राजेश सुधरायचे नाव घेत नव्हता.

नागपूर  ः पतीच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे कंटाळलेल्या पत्नीने त्याला उपदेशाचे डोज दिले. शब्द वाढत गेल्याने दोघांत वाद झाला. पत्नीला घाबरविण्यासाठी पतीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याची धमकी दिली. दारू सोडण्यास मनाई करीत तो वस्तीतील सार्वजनिक विहिरीजवळ पोहचला. 

तेथे पत्नीने त्याची समजूत घातली. दारूच्या नशेत असलेला पती नाटक करीत ‘टाकू का विहिरीत उडी...’ अशी पत्नीला धमकी देत होता. दरम्यान त्याचा काठावरून तोल गेल्याने तो विहिरीत पडला. त्याला पोहणे येत नसल्यामुळे बुडून दुर्दैवी अंत झाला. राजेश कांबळे (४७, शंकरपूर) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

हेही वाचा - ‘मला कोरोना झाला असून, लास्ट स्टेजवर आहे’ असे म्हणत केला विश्वासघात
 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश हा खासगी काम करतो तर पत्नी मेट्रोमध्ये नोकरीला आहे. त्यांना दोन मुली एक मुलगा आहे. राजेश यांना दारूचे व्यसन होते. त्याला दारू सोडण्यासाठी पत्नी वारंवार समजूत घालत होती. मात्र राजेश सुधरायचे नाव घेत नव्हता.

मंगळवारी दुपारच्या सुमारास पत्नी घरी आली असता राजेश दारुच्या नशेत आढळून आले. यावेळी पत्नीने त्यास समुपदेशनाचे डोज दिले. मात्र राजूचा गैरसमज झाला आणि तो रागाच्या भरात घराबाहेर पडला. वडीलांच्या मागेच त्यांची मुलगी धावत निघाली. त्याच्या पाठोपाठ पत्नीसुद्धा आली. दरम्यान राजूने वस्तीतीलच सार्वजनिक विहिर गाठली. तेथे पत्नीला घाबरविण्यासाठी आत्महत्येचे नाटक करीत असतानाच विहिरीत तोल जाऊन पडला, अशी माहिती बेलतरोडी पोलिसांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
संपादन  : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband drowned in a well