आय हेट यू... तुझ्या-माझ्यातील प्रेम संपले... आता जगण्याला अर्थ नाही

अनिल कांबळे
रविवार, 31 मे 2020

त्याला दारू पिण्याची सवय लागली. त्यामुळे आलेला पगार हा दारूत उडवणे सुरू केले. पत्नीला मारहाण करून शिवीगाळ करणे हा त्याचा नित्यक्रम होता. लॉकडाऊनमुळे गत दोन महिन्यांपासून तो घरीच होता. त्यामुळे तो चिडचिड करीत होता.

नागपूर  :  "तुझ्या-माझ्यातील प्रेमसंबंध संपले... तू माझी पोलिस ठाण्यात तक्रार केली... आता जगण्याला अर्थ उरला नाही... अशी सुसाईड नोट लिहून एका महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास गांधीबाग पोलिस क्वॉर्टर येथे उघडकीस आली. प्रमेश्वर भजभुजे असे मृताचे नाव आहे.

विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली (बदललेले नाव) ही पोलिस विभागात कार्यरत आहे. गेल्या दहा वर्षांपूर्वी तिच्या आत्याकडून नातेवाईक असलेला प्रमेश्‍वर या युवकाशी तिची गिरड येथे असलेल्या एका लग्न समारंभात ओळख झाली. त्यावेळी सोनाली बाराव्या वर्गात होती. तर प्रमेश्‍वर बेरोजगार होता. दोघांची तिच्या आत्याने ओळख करून दिली. दोघांमध्ये मैत्री झाली.

पत्नीने केली पतीची हत्या आणि मुलाने फोडली बापाच्या खुनाला वाचा

फोनवरून दोघेही संपर्कात होते. दोघांचेही प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. दरम्यान, सोनालीने पोलिस विभागात भरती प्रक्रियेत भाग घेतला. पोलिस विभागात पोलिस शिपाई पदावर तिची निवड झाली. त्यानंतरही तिने बेरोजगार असलेल्या प्रमेश्‍वराशी प्रेमसंबंध कायम ठेवले. सोनालीच्या लग्नासाठी घरी बोलणी सुरू असल्यामुळे तिने प्रमेश्‍वरला लग्नाबाबत विचारणा केली.

त्यावेळी दोघांनीही आपापल्या कुटुंबीयांना दोघांचा निर्णय सांगून टाकला. "लव्ह कम अरेंज' असा मोठा लग्नसोहळा झाला. प्रमेश्‍वर गिरडवरून नागपुरात राहायला आला. त्याने स्विगी या कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम स्वीकारले.

दहा वर्षे दोघांचा संसार सुरळीत सुरू होता. दोन मुलींसह ते गांधीबाग पोलिस क्‍वॉटर्समध्ये राहत होते. परंतु, त्याला दारू पिण्याची सवय लागली. त्यामुळे आलेला पगार हा दारूत उडवणे सुरू केले. पत्नीला मारहाण करून शिवीगाळ करणे हा त्याचा नित्यक्रम होता. लॉकडाऊनमुळे गत दोन महिन्यांपासून तो घरीच होता. त्यामुळे तो चिडचिड करीत होता. त्याच्या मारहाणीला कंटाळून सोनाली यशोधानगरात असलेल्या माहेरी निघून गेली.

 

झाला वाद आणि दिली तक्रार

शुक्रवारी प्रमेश्‍वरचा पत्नीसोबत वाद झाला. त्याने पत्नीला मारहाण केली. नेहमीची मारहाणीला कंटाळून पत्नीने तहसील पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. वाद झाल्याने परमेश्वर यांच्या पत्नी माहेरी गेल्या. परमेश्वर घरी एकटेच होते. मध्यरात्री दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी तहसील पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

 

पत्नीच्या गाडीत ठेवली सुसाईड नोट

मारहाणाची तक्रार पोलिसांत केल्यानंतर पोलिस निरीक्षकाने दोघांची समजूत घातली आणि घरी पाठवले. त्यावेळी त्याने सुसाईड नोट लिहिली आणि पत्नी सोनालीच्या गाडीच्या डिक्‍कीत ठेवली. "आय हेट यू..तुझे माझे प्रेम संपले...आता जगण्याला काहीही अर्थ नाही... आता आपली पुन्हा नाळ जुळणार नाही..तू मला पोलिस स्टेशन दाखवले...माझा अपमान झाला...' असे लिहून प्रमेश्‍वरने आत्महत्या केली. ती चिठ्‌ठी पोलिसांनी जप्त केली आहे.

 

अशी आली घटना उघडकीस

गेल्या आठ दिवसांपूर्वी प्रमेश्‍वरला शेतीचे 5 हजार रुपये मिळाले होते. त्याने ते पैसे दारूवर उडवले. पत्नी सोनाली घरी आल्यानंतर तिने विचारणा करताच तिला मारहाण केली. तिचा मोबाईल फोडला. त्यामुळे ती माहेरी निघून गेली. दुसऱ्या दिवशी शेजारच्या एका पोलिस कर्मचाऱ्याने प्रमेश्‍वरला चहा-नाश्‍ता देण्यासाठी दार उघडले तेव्हा प्रमेश्‍वर गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. अशाप्रकारे एका प्रेमविवाहाचा करुण अंत झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The husband of a female police officer Suicide by strangulation