पुरुष आला तर नवरा, महिला राखीव आले तर पत्नी !

अजय धर्मपुरीवार
Tuesday, 20 October 2020

निवडणुकीचा बिगुल वाजताच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे.या दृष्टीने राजकीय नेत्यांनी आपली तयारी सुरू केली आहे. पुरुष आला तर नवरा व महिला राखीव आले तर पत्नी, असे समीकरण आतापासूनच तयार होत आहे.

हिंगणा (जि.नागपूर) : जिल्ह्यातील नोव्हेंबर ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या नगर पंचायत निवडणुकीसाठी प्रभाग रचना व सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यात हिंगणा, भिवापूर कुही नगरपंचायतीचा समावेश आहे. निवडणुकीचा बिगुल वाजताच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे.या दृष्टीने राजकीय नेत्यांनी आपली तयारी सुरू केली आहे. पुरुष आला तर नवरा व महिला राखीव आले तर पत्नी, असे समीकरण आतापासूनच तयार होत आहे. कोरोना संक्रमणाच्या काळात ग्रामपंचायतीची मुदत संपूनही निवडणुका घेण्यात आल्या नाही. शेवटी सरकारने प्रशासकाची नियुक्ती ग्रामपंचायतवर केली. नगरपंचायतची मुदत नोव्हेंबर महिन्यात संपत आहे. मुदत संपण्यापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने नगरपंचायत निवडणुकीचा प्रभाग रचना व सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. याबाबतचा आदेश राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव संजय सावंत यांनी काढला आहे.

अधिक वाचाःसावनेरात कुठेही जा, कधीही जा, हमखास होते कचऱ्याचे दर्शन

प्रभाग रचनेत फारसा बदल होणार नाही !
२१ ऑक्टोबर रोजी प्रभाग रचना तयार करण्यासंबंधिची नोटीस काढण्यात येणार आहे. २९ ऑक्टोबर रोजी प्रभाग रचना तयार झाल्यानंतर हरकती मागविण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेसाठी पाठवण्यात येणार आहे.‌‌ ३ नोव्हेंबर रोजी सदस्यपदाच्या आरक्षण सोडतीची नोटीस काढण्यात येईल. १० नोव्हेंबर रोजी सदस्य पदाच्या आरक्षण सोडत काढली जातील . १८ नोव्हेंबरपर्यंत आरक्षण सोडतीवर हरकती व सूचना मागविण्यात येईल. यानंतर साधारणतः फेबृवारी महिन्यात निवडणुका लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे .मागील पंचवार्षिक निवडणूक १ नोव्हेंबर २०१५ ला पार पडली होती. यामुळे नगर पंचायतीची मुदत २६ नोव्हेंबरपर्यंत आहे. हिंगणा, भिवापूर, कुही नगर पंचायतीमध्ये निवडणूक होणार आहे. प्रभाग रचनेत फारसा बदल होणार नाही, असे राजकीय पक्षाचे प्रतिनिधी सांगत आहेत.

अधिक वाचाः गावकरी म्हणतात, खड्डयात गेले राजकारण, अगोदर रस्ता करा !

जनतेच्या भेटीगाठी घेणे सुरू
सदस्य पदाच्या आरक्षणात मात्र बदल होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी जे वॉर्ड महिलांसाठी आरक्षित होते, ते आता पुरुषांसाठी आरक्षित होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. आरक्षणाच्या सोडतीत अनेक दिग्गज सदस्यांनाही फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे या दिग्गज नेत्यांची धाकधूक वाढली आहे. अनेक विद्यमान नगरसेवकांनी आरक्षण बदलल्यास पत्नी,भाऊ किंवा  बहिणीला उभे करण्यासाठी आत्तापासूनच फिल्डींग लावणे सुरू केले आहे. महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची आघाडी नगरपंचायत निवडणुकीत होते का हे पाहणे सुद्धा महत्त्वाचे आहे. भाजपसाठीही  निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे‌. शिवसेनेची ही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे‌‌ प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता नगरसेवक व इतर राजकीय नेत्यांनी जनतेच्या भेटीगाठी घेणे सुरू केले यामुळे आता हिंगणा, भिवापूर व कुही नगर पंचायत मधील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात होणार आहे ‌.

संपादनःविजयकुमार राऊत

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If the man comes, the husband, if the woman comes, the wife comes!