आमदानी अठ्ठनी, खर्चा रुपया, त्याचेच नाव सोयाबीन

पचखेडीः शेतात सोयाबीन कापणीनंतर मळणी करताना शेतकरी.
पचखेडीः शेतात सोयाबीन कापणीनंतर मळणी करताना शेतकरी.

पचखेडी/कन्हान(जि.नागपूर) : सद्या शेतात सोयाबीन काढणीचे दिवस सुरू आहेत. कोरोनाच्या काळात डबघाईस आलेला शेतकरी आज जिव ओतून काम करतोय. चुहूबाजूने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याने यंदा पाउस चांगला येईल व पीक चांगले होईल म्हणून शेतात सोयाबीन पेरले. पाउस सरासरीपेक्षा जास्त झाला, पण सोयाबीनवर अळी व विविध रोगांनी हल्ला चढविला.त्यातही काही शेतकऱ्यांचे पीक कापणीला आले खरे, पण सोयाबीनची अवस्था आमदानी अठ्ठनी, खर्चा रुपया अशी झाली. आजघडीला खरीप पिकाची कापणी करुन सोयाबीनची मळणी केली. एकरी दोन ते तिन क्विंटल उतारी आल्याने ‘कमाई अठ्ठानी खर्च रुपया’ झाला असल्याने बळीराजा मेटाकुटीस आला आहे, अशी कैफियत पिडीत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

अधिक वाचाः सूरताल झाले बेताल, जादू झाली छूमंतर, कलेला लागली कोरोनाची नजर
 

 हेक्टरी ५० हजार नुकसानभरपाई देण्याची मागणी
यावर्षी सोयाबीनला लागणारा खर्च सोयाबीन पिशवी अडीच हजार रुपये, आणण्याचा खर्च वीस रुपये, पेरणी, बैलजोडी, मजूर, खत २५०० रुपये, जमीन तयार करणे२०००रुपये, डवरणी हजार रूपये, फवारणी २५०० रुपये, कापणी२०००रुपये, असा एका पिशवीला१२५२०रुपये खर्च. एका हेक्टरला तिन पिशव्या लागत असताना एका हेक्टरला ३७५६० रुपये खर्च लागतो. हेक्टरी चार क्विंटल उत्पादन झाले आहे. त्याची किंमत आज बाजार भावाप्रमाणे १२०० होत आहे. शासन अनुदान हेक्टरी ६८००रुपये देत आहे. तेव्हा शासन जगाच्या पोशिंद्याची मजाक तर करीत नाहीना, अशी सुज्ञ शेतकरी चर्चा करीत आहेत. शासनाने या गंभीर विषयाकडे लक्ष घालून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उमरेड विधानसभा प्रभारी राजेंद्र मेश्राम, नागपूर महासचिव अमरदिप तिरपुडे, राजू डोंगरे, राजू ठवकर, राजू देशपांडे, चंद्रमणी मेश्राम, शेषराव मेश्राम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

अधिक वाचाः हिंगणा एमआयडीसीत डंम्पिंग यार्डसाठी कुणी जागा देता का जागा !
 

घरचे गुणवत्तापूर्ण सोयाबीन बियाणे वापरून आत्मनिर्भय व्हा !
कन्हान : सोयाबीन बियाणांची पुढील वर्षी तुटवडा होण्याची दाट शक्यता असल्याने बाजारातील सोयाबीन बियाण्यावर खर्च करू नका. घरचे गुणवत्तापूर्ण सोयाबीन बियाणे वापरून आत्मनिर्भय व्हा, असा सल्ला राज्य शासनाच्या कृषी विभागाने दिला आहे.
यावर्षी निसर्गाने साथ न दिल्याने सोयाबीन पिकाच्या उत्पन्नाची घट पाहता पुढील वर्षी सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा होण्याची दाट शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी शेतातील सोयाबीन मळणी करताना आरपीएम ३०० ते ५०० ठेवावे, या अनुषंगाने सोयाबीन बियाणे फुटणार नाही, याची दक्षता घ्यावी. मळणीनंतर बियाणांसाठी राखीव ठेवलेले सोयाबीन २ ते ३ दिवस सावलीमध्ये वाळवावे. ज्या अनुषंगाने बियाण्यातील आर्दता ही ०९ ते १२ टक्के कमी असावी. बियाणांची साठवणूक करताना बियाणांच्या बॅग कोंदड जागी न ठेवता हवेशीर जागेत ठेवाव्या, जेणेकरून बुरशीची वाढ होणार नाही. एकावर एक जास्तीत जास्त तीन बॅग साठवताना ठेवण्यात याव्यात किंवा बॅग भिंतीला लावून उभ्या ठेवण्यात याव्यात. पोत्यांची थप्पी जमिनीपासून १० ते १५ सेंटीमीटर उंचीवर लाकडी फळी यावर लावावी. पेरणी करण्यापूर्वी उगवण क्षमता तपासून पेरणी करावी, अशाप्रकारे घरच्या घरी दर्जेदार गुणवंत्तापूर्ण व चांगली उगवणशक्ती असलेले बियाणे निर्माण करून "घरचे गुणवंत्तापूर्ण सोयाबीन बियाणे वापरून आत्मनिर्भय होण्याचा
सल्ला शेतकरी मंडळ व तालुका कृषी अधिकारी जी.बी.वाघ यांनी दिला.

उत्पादन खर्चावर हमी भाव द्यावा !
गेल्या दहा वर्षांपासून सोयाबीनला जो भाव आहे, तोच आहे. त्याकाळी दिडशे रुपये युरियाचा भाव होता. फाँस्फेट दिडशे रुपये होते. आजघडीला खताचे भाव डबल टीबल झालेत. मात्र भाव दहा वर्षाआधीचा आहे. शासनाला शेतकऱ्यांचा कळवळा असेल तर उत्पादन खर्चावर हमी भाव द्यावा.
राजू देशपांडे
शेतकरी

संपादनः विजयकुमार राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com