
बदललेली जीवनशैली, जगण्यातील ताणतणाव, सासरच्या कुटुंबाचा तिटकारा, एकलकोंडा स्वभाव, घरात गर्दी नको, ज्येष्ठांची सेवा करायला आवडत नाही, नोकरी करायची की घरातली कामे, अशी कारणे सांगत पत्नीकडून मानसिक त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी घेऊन पती भरोसा सेलकडे धाव घेत आहेत.
नागपूर : माहेरचा हस्तक्षेप, स्मार्टफोनचा वाढता वापर, विवाहबाह्य संबंध, अहंकारी, चिडखोर स्वभाव आदी कारणांनी पत्नी ऐकत नाही म्हणून दोन वर्षांत तब्बल 595 पुरुषांनी आपल्या पत्नीविरोधात नागपूरच्या भरोसा सेलकडे तक्रारी केल्या आहेत. विवाहात अन्याय फक्त स्त्रियांवरच होतो असे नाही. काही स्त्रियाही सासरच्या लोकांसह पतीला वेठीस धरत असल्याचे भरोसा सेलकडे आलेल्या तक्रारींतून स्पष्ट झाले आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील महिला तक्रार निवारण केंद्रात कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी ठरलेल्या महिलांना न्याय्य हक्क प्रदान करण्याचे काम केले जाते. मात्र, या केंद्रात केवळ महिलाच नाही तर पीडित पुरुषांनीसुद्धा आता धाव घेणे सुरू केले आहे. मागील दोन वर्षांत केंद्राकडे एकूण चार हजार 957 तक्रारी आल्या आहेत.
अवश्य वाचा - वडिलांच्या प्रेमाला मुकल्याने तीने केले असे...
यापैकी 595 तक्रारी या पत्नीकडून छळ होत असल्याच्या आहेत. बदललेली जीवनशैली, जगण्यातील ताणतणाव, सासरच्या कुटुंबाचा तिटकारा, एकलकोंडा स्वभाव, घरात गर्दी नको, ज्येष्ठांची सेवा करायला आवडत नाही, नोकरी करायची की घरातली कामे, अशी कारणे सांगत पत्नीकडून मानसिक त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी घेऊन पती भरोसा सेलकडे धाव घेत आहेत.
अधिक माहितीसाठी - ऊर्जामंत्री म्हणाले, केंद्राच्या योजनेची अडवणूक नाही
पत्नी नोकरी करणारी असो वा घर सांभाळणारी स्मार्टफोनच्या वापरावरून पती-पत्नीत वाद होताना दिसतो आहे, असे या तक्रारींवरून दिसून येते. पत्नी घरात मुलांना, आई-वडिलांना कमी वेळ देते, सतत सोशल मीडियावर सक्रिय असते, या कारणावरून वादाला सुरुवात होऊन भांडण विकोपाला जाण्याची अनेक उदाहरणे आहेत. याशिवाय पत्नीच्या माहेरच्या लोकांचा नको तितका हस्तक्षेप होत असल्यानेही पतीला चुकीची वागणूक दिली जात असल्याचे बहुतांश तक्रारींचा सूर आहे.
समेट घडवून आणण्याचा प्रयत्न
भरोसा सेलकडे महिलांप्रमाणेच पुरुषही तक्रारी घेऊन येतात. हे प्रमाण 20 ते 25 टक्के आहे. पत्नी माझे ऐकतच नाही, पालकांचा मान ठेवत नाही, सोशल मीडियावर अधिक असते, माहेरच्यांचे ऐकते, विवाहबाह्य संबंध आदी अनेक विषयांवर तक्रारी घेऊन पती येतात. अशावेळी दोघांचेही समुपदेशन करून त्यांच्यात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न असतो.
- शुभदा संखे,
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भरोसा सेल
न्यायासाठी वणवण भटकावे लागते
स्त्रियांकडून पुरुषांवर होणारे अत्याचार हे शारीरिक स्वरूपाचे नसले तरीही ते प्रचंड मानसिक त्रास देणारे असतात. हा त्रास शारीरिक त्रासाप्रमाणेच गंभीर असतो. आज देशात स्त्री-पुरुष समानतेचे नारे लावले जात आहेत. महिलांवरील अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी आयोग, कायदे, विविध संस्था कार्यरत आहेत. पीडित पुरुषांना न्यायासाठी वणवण भटकावे लागते अशी स्थिती आहे. यासाठी देशात पुरुष संरक्षण समितीने 498 (ब) कलमाची मागणी केली आहे.
- आनंद बागडे,
अध्यक्ष, जेंडर इक्विलिटी ऑर्गनायझेशन