
जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती तीन महिन्यात झालेली घरगुती गॅस सिलेंडरची भरमसाठ वाढ यामुळे त्यांच्यावर सर्वच बाजूने महागाईची कुऱ्हाड कोसळल्याने सर्वसामान्य माणूस अधिकच चिंताग्रस्त झाला आहे.
सावनेर (जि. नागपूर) : कोरोना संकटामुळे अनेकांचे वेतन रखडले, कोणाचे कमी झाले, अनेकांचा रोजगार हिरावला तर काहींचे उद्योगधंदे बुडाले. अशा लोकांकडे उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न उभा ठाकल्याने कुणी उधार उसनवार घेऊन तर कुणी शिल्लक असलेल्या पैशावर कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. शिवाय निसर्गाच्या लहरीपणामुळे बऱ्याच वर्षापासून अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेती न परवडणारी झाली आहे.
त्यामुळे असे कुटुंब अगोदरच खर्चात काटकसर करून आपल्या संसाराचा गाडा कसेबसे पुढे ढकलीत आहेत. यातच जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती तीन महिन्यात झालेली घरगुती गॅस सिलेंडरची भरमसाठ वाढ यामुळे त्यांच्यावर सर्वच बाजूने महागाईची कुऱ्हाड कोसळल्याने सर्वसामान्य माणूस अधिकच चिंताग्रस्त झाला आहे.
गॅस सिलेंडरच्या दरात अचानक झालेल्या वाढीमुळे स्वयंपाकघरातील खर्चाचे गणित जुळवायचे कसे, हा प्रश्न सर्वसामान्य घरातील कुटुंब प्रमुखाला सतावत आहे. या वाढत्या दराचे चटके सामान्य गृहिणीलाही सहन करावे लागत आहे. दिवसेंदिवस इंधनाचे दर वाढत असून त्यामुळे सामान्य माणसाला जगणे कठीण होत चालले आहे.
आर्थिक बोजा वाढला
इंधन दरवाढीमुळे अनेक कुटुंबीयांना ताणतणावात जीवन जगावे लागत आहे. शेतकऱ्यांचाही आर्थिक बोजा वाढला आहे.
- संजय टेंभेकर,
शेतकरी उमरी
चिंता अधिकच वाढली
जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे महिन्याला लागणाऱ्या खर्चात वाढ झाल्याने सर्वसामान्यांची चिंता अधिकच वाढली आहे.
- विनित पाटील,
सर्वसामान्य नागरिक, सावनेर
जगणे झाले कठीण
केंद्र शासनाने गॅस सिलेंडर, पेट्रोल व डिझेलमध्ये भरमसाठ वाढ करून सर्वसामान्यांचे जगणे कठीण केले आहे.
- मनोज बसवार,
सामाजिक कार्यकर्ते, सावनेर