file photo
file photo

जानकीनगरच्या 'यंग सिनियर्स'ची बातच न्यारी

नागपूर : आयुष्याच्या उत्तरार्धातील एकाकीपणामुळे नैराश्य येऊन चिडचिडपणा वाढतो. घरच्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे प्रचंड कोंडमारा होतो. अशावेळी ज्येष्ठांना खऱ्या अर्थाने गरज असते ती मानसिक आधाराची. नेमकी ही गोष्ट ध्यानात घेऊन जानकीनगरातील काही 'यंग सिनियर्स'नी ज्येष्ठ महिला मंडळाची स्थापना केली. आठ वर्षांपूर्वी लावलेले छोटेसे रोपटे आज विशाल वटवृक्षात रूपांतरित झाले. मंडळाच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ महिला वर्षभर विविध उपक्रम आयोजित करून एकमेकींचे मनोरंजन व आधार देताहेत. 


मोकळा श्वास घेता यावा, विरंगुळा मिळावा आणि एकमेकींच्या सुखदुःखात सहभागी होता यावे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनात काही महिलांनी २०१२ मध्ये जानकीनगर ज्येष्ठ महिला मंडळाची मुहूर्तमेढ रोवली. ''अकेला चला था...लोग जुडते गये...कारवॉं बनता गया...'' या युक्तीप्रमाणे मंडळात एकेक महिला जुळत गेली आणि अल्पावधीतच सदस्य संख्या सव्वाशेवर पोहोचली. सुनंदा हरणे अध्यक्ष असलेल्या या मंडळात प्रामुख्याने गृहिणी व पेन्शनर्सचा समावेश आहे. पंधरा जणींची कार्यकारिणी आहे. मंडळातर्फे ज्येष्ठ महिलांच्या कल्याणासाठी वर्षभर विविध उपक्रम चालविले जातात. मंडळाचे कार्यस्थळ असलेल्या हनुमान मंदिरात सायंकाळी गप्पांचे फड, संगीतखुर्ची, कॅरम, बॅडमिंटनसारखे मनोरंजनपर खेळ, विविध विषयांवर चर्चा, गेट टूगेदर व महिन्यातील महिला सदस्यांचे वाढदिवस धडाक्यात साजरे केले जातात. भेटवस्तू दिल्या जातात. 
याशिवाय थोर महापुरुषांची जयंती व पुण्यतिथी, राष्ट्रीय उत्सव, दिवाळी, दसरा, होळी, तिळसंक्रांत व इतर सण, जागतिक महिला दिवस, आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन, मान्यवरांचे व्याख्यान, मार्गदर्शन, चर्चासत्र, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबिरे इत्यादी कार्यक्रमांचे नियमित आयोजन केले जाते. तसेच देशभरात होणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या राज्य व राष्ट्रीय अधिवेशनासाठी महिलांना पाठविले जातात. मंडळाच्या सदस्य आनंद साजरा करण्याची एकही संधी सोडत नाहीत हे उल्लेखनीय.

मंडळात गरीब-श्रीमंत आहेत, कसलाही जातीभेद नाही, हेवेदावेही नाहीत. एकमेकींवर पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक निर्णय सहमतीने घेतले जातात. सदस्यांसाठी केवळ तिनशे रुपये वार्षिक वर्गणी आहे. आवश्यकता पडल्यास आणखी पैसे गोळा करून प्रत्येक कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरा करतात. या गुणवैशिष्ट्यामुळेच मंडळाने उपराजधानीतील एक आदर्श ज्येष्ठ महिला मंडळ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मंडळाच्या कार्यापासून प्रेरणा घेत शहरात इतरही ठिकाणी अशी मंडळे स्थापन होताहेत. 



आपापसात सोडविले जातात भांडणतंटे 


घराघरांमध्ये भांडणतंटे असतात. मंडळाच्या सदस्यांही त्याला अपवाद नाहीत. एखादी तक्रार आली की, त्यावर बैठकीत चर्चा करून त्यांचे निराकरण केले जाते. आतापर्यंत अनेकांच्या घरची छोटीमोठी भांडणे सामोपचाराने मिटवून त्यांनी ज्येष्ठ महिला सहकाऱ्यांवरील अन्याय दूर केले असल्याचे सुनंदा हरणे यांनी सांगितले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com