जनता कर्फ्यू  :  दुकानांबाबत मनपा आयुक्त व पोलिसांत विरोधाभास, जाणून घ्या... 

राजेश प्रायकर 
Friday, 24 July 2020

महापौर संदीप जोशी यांनी गुरुवारी 31 जुलैपर्यंत नागरिकांना संधी देण्याचे आवाहन आयुक्तांना केले होते तर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी फेसबुक लाइव्हद्वारे नागपूरकरांना चार दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. मात्र, 22 तासांच्या अंतरानेच महापौर आणि आयुक्तांनी भूमिकेत बदल करीत उद्या, शनिवारी आणि रविवारी "जनता कर्फ्यू'ची संयुक्तपणे घोषणा केली.

नागपूर : अत्यावश्‍यक मेडिकल सेवेशिवाय इतर कामांसाठी नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही. दूधविक्रीची दुकाने सुरू राहतील. मात्र, किराणा दुकाने व इतर सेवांची दुकाने बंद राहतील, असे मनपा आयुक्त मुंढे यांनी स्पष्ट केले. जनता कर्फ्यूमध्ये काय सुरू राहील, काय नाही? याबाबत पोलिस विभागाने प्रसिद्धीपत्रक पाठविले असून, त्यात किराणा दुकाने सुरू राहील, असे नमूद केले. त्यामुळे मनपा आयुक्त व पोलिसांच्या परस्पर विरोधी वक्तव्याने गोंधळाची स्थिती निर्माण होण्याची शक्‍यता आहे. सणासुदीचे दिवस असून लॉकडाऊनच्याही शक्‍यतेमुळे अनेकांनी शनिवार, रविवारी किराणा आदी खरेदीचा बेत आखला होता. दुकाने बंद राहिल्यास नागरिकांसोबत दुकानदारांचीही निराशा होणार आहे. 

महापौर संदीप जोशी यांनी गुरुवारी 31 जुलैपर्यंत नागरिकांना संधी देण्याचे आवाहन आयुक्तांना केले होते तर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी फेसबुक लाइव्हद्वारे नागपूरकरांना चार दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. मात्र, 22 तासांच्या अंतरानेच महापौर आणि आयुक्तांनी भूमिकेत बदल करीत उद्या, शनिवारी आणि रविवारी "जनता कर्फ्यू'ची संयुक्तपणे घोषणा केली. मात्र, "जनता कर्फ्यू'मध्ये शहराबाहेर गेलेले नागरिक शनिवारी शहरात परत येऊ शकतील की नाही?, शनिवारी आणि रविवारीही अनेक कार्यालये सुरू असतात, त्यातील कर्मचाऱ्यांनी घरून काम करावे की त्यांना कार्यालयात जाता येईल? याबाबत कुठलीही स्पष्टता नसल्याने उद्या नागपूरकरांत संभ्रम निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 

महत्त्वाची बातमी - हे तंत्रज्ञान ठरणार शेतकऱ्यांसाठी वरदान...कीड नियंत्रणासाठी लावले यंत्र
 

लॉकडाउनसंदर्भात जनतेच्या मनातील संभ्रम दूर व्हावा, त्यावर जनप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या समन्वयाने निर्णय व्हावा यासाठी महापौर संदीप जोशी यांच्या पुढाकाराने शुक्रवारी मनपा मुख्यालयातील आयुक्त कक्षात बैठक पार पडली. बैठकीत महापौरांसह, खासदार डॉ. विकास महात्मे, खासदार कृपाल तुमाने, आमदार सर्वश्री गिरीश व्यास, प्रा. अनिल सोले, नागो गाणार, विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, मोहन मते, विकास ठाकरे, प्रवीण दटके, उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती पिंटू झलके, आयुक्त तुकाराम मुंढे, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, अतिरिक्त पोलिस आयुक्त नीलेश भरणे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी आदी उपस्थित होते. 

चर्चेमध्ये सर्व लोकप्रतिनिधींनी लॉकडाउन न करण्याबाबत भूमिका मांडली. शहरात दोन दिवस "जनता कर्फ्यू' लागू करण्याची सूचना आमदार तथा ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके यांनी मांडली. त्यांच्या सूचनेवर महापौर संदीप जोशी, आयुक्त तुकाराम मुंढे आणि अतिरिक्त पोलिस आयुक्त नीलेश भरणे यांनी 25 व 26 जुलैला "जनता कर्फ्यू'चा निर्णय घेतला. मात्र, जनता कर्फ्यूबाबत अनेक बाबी स्पष्ट नाही. नागरिकांनी स्वत: स्वयंस्फूर्तीने घरातच राहावे. फक्त अत्यावश्‍यक वैद्यकीय सेवेसाठीच घराबाहेर निघावे, असे आवाहन करून महापौर व आयुक्त मोकळे झाले. 

मात्र, एखादा व्यक्ती आज मुंबई किंवा देशातील कुठल्याही शहरातून नागपूरकडे निघाला असेल व उद्या तो शहरात येत असेल तर त्याच्याबाबत काय? किंवा एखादा व्यक्ती आज शहराबाहेर गेला असेल व उद्या परत येत असेल तर त्याने काय करावे? याबाबत कुठलीही स्पष्टता नाही. त्यामुळे अनेकांची गोंधळ उडणार आहे. 

 
पोलिसांची नाकाबंदी 

शहरातील सर्वच प्रमुख चौकांसह शहरात येणाऱ्या आठ नाक्‍यांवर नाकाबंदी करण्यात येणार आहे. नागरिकांत ध्वनी क्षेपणाद्वारे जनजागृती करण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी कळविले आहे. जनता कर्फ्यूमध्ये राज्य राखीव पोलिस दल, दंगल नियंत्रण पथक पेट्रोलिंग करणार आहे. या बंदोबस्तासाठी 364 अधिकारी, 2300 पोलिस कर्मचारी, 343 होमगार्ड, राज्य राखीव दलाचे 2 प्लाटून, पाच दंगल नियंत्रण पथकासह क्‍यूआरटी पथकही सज्ज करण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Janta Curfew in Nagpur, No clarity about guidelines