जॉनी लिव्हर म्हणातात, नागपूरचे लोक लय भारी

प्रशांत रॉय 
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

नागपूर : कडक इस्त्री केलेला, चकचकीत गाडीवाला, सुटबुटातील जंटलमन एकदम कोठेतरी थांबून पचकन खर्रा थुंकतो तेव्हा तो नागपूरकरच असावा याबद्दल शंका नसतेच. यातील विनोदाचा भाग सोडला तर नागपूरचे लोक अतिशय प्रेमळ आणि मदतीस नेहमी तयार असतात, असे कॉमेडी किंग जॉनी लिव्हर म्हणाले. 

नागपूर : कडक इस्त्री केलेला, चकचकीत गाडीवाला, सुटबुटातील जंटलमन एकदम कोठेतरी थांबून पचकन खर्रा थुंकतो तेव्हा तो नागपूरकरच असावा याबद्दल शंका नसतेच. यातील विनोदाचा भाग सोडला तर नागपूरचे लोक अतिशय प्रेमळ आणि मदतीस नेहमी तयार असतात, असे कॉमेडी किंग जॉनी लिव्हर म्हणाले. 

त्यांचे करिअर संपले-संपले असे सर्रास बोलले जात होते. प्रसिद्धीचे अत्युच्च क्षण अनुभवल्यानंतर बारा वर्षे चित्रपट उद्योगापासून दूर राहणे म्हणजे संपल्यातच जमा आहे. परंतु, फिनिक्‍स पक्ष्याप्रमाणे ऊर्जासंपन्न होऊन पुन्हा यशाकडे तेवढ्याच वेगाने प्रवास करणारे आणि सर्वांना खळखळून हसविणारे कॉमेडी किंग जॉनी लिव्हर यांच्याशी "सकाळ'च्या प्रतिनिधीने "एनआयटी'मध्ये केलेली खास बातचीत. 

प्र. शिक्षण न घेतल्याचं दुःख आहे का? 
उ.
निश्‍चितच! सातवीतच शिक्षण सोडले. आत्यंतिक गरिबीमुळे उदरनिर्वाहासाठी काहीतरी काम करणे गरजेचे होते. शिक्षण जरी नाही घेतले, तरी खूप बारकाईने सगळ्यांचे "ऑब्झर्व्हेशन' करायचो आणि आजही करतो. 

प्र. शाळेतील शिक्षक, दिवस आठवतात? 
उ.
धम्माल दिवस होते. मी बालपणापासूनच इतरांची मिमिक्री करत असल्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्येही फेमस होतो. माझ्या विनोदावर सर्व जण खळाळून हसत. मला शिकवणाऱ्या एक शिक्षिका सध्या अमेरिकेत आहेत. त्यांच्याशी आजही नियमित बोलणे होते. 

प्र. नागपूरशी संबंधित काही आठवणी? 
उ.
1980 मध्ये माझा पहिला ऑडिओ कॅसेट अल्बम "हंसी के हंगामे' तयार झाला. 1982 मध्ये एका शो साठी नागपूरला आलो होतो. धनवटे रंगमंदिरात माझा कार्यक्रम होता. येथे माझ्या कॅसेटचेही प्रकाशन केले. 38 वर्षे झाली या घटनेला. आजही ते क्षण डोळ्यांसमोर आहेत. 

प्र. आम आदमी ते बॉलिवूड सेलिब्रिटी प्रवासाबद्दल काय सांगाल? 
उ.
मागे वळून पाहतो तेव्हा आज जे काही मिळवलंय त्याबद्दल खरंच आश्‍चर्य होतं. परिश्रमाला पर्याय नाही. झोकून देऊन काम केले की लक्ष्याची प्राप्ती होतेच. 

प्र. महिलांच्या सबलीकरणाबद्दल तुमचे मत? 
उ.
एक काळ असा होता की चित्रपटात पुरुषच महिलांचा रोल करायचे. कारण, हे क्षेत्र चांगल्या महिलांसाठी नाही, असे बोलले जायचे. आता मात्र काळ झपाट्याने बदलला आहे. आज चित्रपट, डिफेन्ससह सर्वच क्षेत्रांत महिला नाव मिळवीत आहेत. खूप अभिमान वाटतो. 

प्र. वैदर्भी कलाकारांविषयी काय सांगाल? 
उ.
मेहनती लोक आहेत. राजकुमार हिराणी, सोनू सुद इत्यादींनी आपल्या कामाचा डंका वाजवला आहे. नवीन टॅलेंट पुढे येत आहे. एवढेच सांगतो, स्वप्न पाहा व ते पूर्ण करण्यासाठी जीवतोड प्रयत्न करा. रंगभूमी, टीव्ही, चित्रपट आणि वेबसिरीजमध्येही आता खूप संधी आहेत. 

प्र. युवकांना काय सल्ला द्याल? 
उ.
जे कराल त्यात तुमचे 100 टक्के द्या. स्वतःवर विश्‍वास ठेवा. मग बघा जग तुमचेच आहे. 

मुंबईपेक्षा नागपूर आवडले

एअरपोर्ट ते हॉटेल आणि आता हॉटेलपासून कॉलेजपर्यंत सहज पोहोचलो. वाहतूक कोंडीचा काही प्रश्‍नच नव्हता. नागपूरचे मोठे रस्ते, रस्त्यांवर फ्लायओव्हर आणि त्यावरून चालणारी मेट्रो खरंच खूप आवडलं. मुंबईतही असे असावे, असे वाटते. कारण, खूप महत्त्वाचा वेळ हा ट्रॅफिकमध्येच वाया जातो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jony livher says Nagpuri folk More heavy