दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज; शंभर कोटी रुपये उभारणार

राजेश चरपे 
Wednesday, 21 October 2020

प्रशासनाचे प्रमुख या नात्याने नागपूरचे विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेत एक समिती स्थापन केली जाईल. त्यात महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी, सुधार प्रन्यासच्या सभापती यांचा समावेश राहील.

नागपूर  ः कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने त्याचा सामाना समर्थपणे करता यावा, याकरिता जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी शंभर कोटी रुपये उभारून जंबो कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर सुधार प्रन्यासच्या विश्वस्तांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

महानगर पालिका, नागपूर सुधार प्रन्यास, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद यांचा यात वाटा राहणार आहे. राज्य शासनालाही यात सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे सुधार प्रन्यासचे विश्वस्त भूषण शिंगणे आणि महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती व प्रन्यासचे विश्वस्त पिंटू झलके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

प्रशासनाचे प्रमुख या नात्याने नागपूरचे विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेत एक समिती स्थापन केली जाईल. त्यात महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी, सुधार प्रन्यासच्या सभापती यांचा समावेश राहील. ही समितीच कोव्हीड सेंटर कुठे उभारायचे याचा निर्णय घेईल. 

सविस्तर वाचा - चाळीसचे फेडले ८५ लाख; तरी सावकार करायचा १३ लाखांची मागणी; त्रास असह्य झाल्याने घेतला गळफास
 

मेडिकल, मेयो आणि एम्‍स असे तीन पर्याय आमच्याकडे उपलब्ध आहेत. त्यापैकी ज्यांच्याकडे जागा आणि सुविधा उपलब्ध राहील तेथे हे केव्हीड सेंटर उभे केले जाईल. यास प्रन्यासच्या बैठकीत सर्वांनी एकमताने मंजुरी प्रदान केली.

विभागीय क्रीडा संकुल किंवा कुठल्याही खुल्या जागेत कोव्हीड सेंटर उभारता आले असते. मात्र ते सोयीचे नाही. याशिवाय कोव्हीडची लाट गेल्यानंतर सर्व साहित्य काढून घेताना व त्या दुसरीकडे नेताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे एखाद्या मोठ्या इस्पितळालाचा शंभर कोटी रुपये देऊन ते अद्यावत करणे सोयीचे ठरेल, असे पिंटू झलके यांनी सांगितले.

पीएम आवाससाठी लॉटरी काढणार

प्रधानमंत्री आवाज योजनेंर्गत ४ हजार ४७५ घरे तयार आहेत. त्यात तरोडी, वाठोडा आणि वांजरा येथील घरांचा समावेश आहे. ही घरे तातडीने गोरगरिबांना वाटप करण्याची सूचना नितीन गडकरी यांनी केली होती. त्यानुसार लवकरच याकरिता लॉटरी काढण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी बाराशे घरे वितरित करण्यात आली आहेत. गडकरी यांनी नंदनवन येथे फॅब्रिकेडेड स्ट्रक्चलरची १६ घरांची इमारीत उभी केली आहे. तुलनेत स्वस्त आणि अतिशय मजबूत येथील घरकुल आहेत. तेसुद्धा वाटप करण्यात येणार असल्याचे शिंगणे आणि झलके यांनी सांगितले. 

संपादन  : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jumbo Coveid Center will be set up in Nagpur