चित्रकाराच्या वेदनांचा "काला यानि अँधेरा'

NATAK
NATAK

नागपूर : स्वार्थासाठी राजकीय पुढारी तपोनिष्ठ कलाकारांचे कधी शोषण करतील याचा नेम नसतो. प्रत्येकच पुढारी तसा नसला तरी, अशा असामाजिक जाणिवांचे नेतृत्व समाजात नाहीतच असे देखील नाही. बोटावर मोजण्याइतपत काही नेत्यांच्या वागण्यामुळे नि:स्वार्थ जगणारा कलासाधक भरडला जातो. कलाकाराचे भविष्यदेखील अनेकदा अंध:कारात जाते. अशाच एका चित्रकाराच्या आयुष्यातील असंख्य वेदनांचा मागोवा घेणारा नाट्यप्रयोग म्हणजे "काला यानि अँधेरा'.

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या भारत रंग महोत्सवात तिसरी नाट्यकृती इंडी प्रॉडक्‍शनने सादर केली. परेश व्यास निर्मित व कबीर ठाकोर दिग्दर्शित "काला यानि अँधेरा' हे हिंदी नाटक कलावंतावर होणाऱ्या हल्ल्यांच्या विरोधात प्रतिक्रिया देणारे होते. राजकीय फायद्यासाठी निःस्वार्थ कलासाधकांना वेठीस ठरणाऱ्या असामाजिक तत्वांचा नायनाट होईल तो दिवस अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याचा असेल असा सामाजिक संदेश नाट्यकृतीने दिला.

कायमच आनंदी उत्साही वाटणारे तपोनिष्ठ कलासाधक वैयक्‍तिक आयुष्यात किती भोगतात याची सामान्य माणसाला जाणीव करून देणारी ही नाट्यकृती होती. कला विश्‍वात कार्यरत मंडळींना नाट्यकृतीत दाखविण्यात आलेली स्थिती, घटना जणू आपल्याच आयुष्यातील वाटतात. मराठी साज असलेल्या या नाट्यकृतीला अस्सल गुजराती मातीचा सुगंध होता. महाराष्टातील लेखक दिग्दर्शक तसे रसिक प्रेक्षकांच्या परिचयाचे असतात. त्यांची संहिता विनोदशैली प्रत्येकाला ज्ञात असते. पण अहमदाबादेत बहरलेली नाट्यकृती क्वचितच नागपूरकरांना अनुभवता येते. "काला यानि अँधेरा' या नाट्यकृतीतील संवादाचा दर्जाला प्रत्येकच श्रोता टाळ्यांच्या कडकडाटात दाद देत होता.

जागतिक ख्यातीप्राप्त चित्रकाराच्या आयुष्याचा मागोवा घेणारी ही हिंदी नाट्यकृती सत्यघटनेवर आधारित होती. घटना घडली घडले, काही दिवसांनी लोक ती विसरतात. पण लेखक परेश व्यास यांनी "काला यानि अँधेरा' नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून 2007 साली झालेल्या चित्रकाराच्या मृत्यूला अमरत्व प्रदान केले आहे. वैभवसंपन्न चित्रकाराच्या आयुष्यातील ही कथा प्राध्यापक व त्यांच्या दोन विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील प्रसंगांचा वेध घेते. केवळ कलासाधनेला सर्वस्व समजणारा कृष्णन अन्‌ धनप्राप्तीसाठी कृष्णनच्या कौशल्यावर डोळा ठेवणारा राजू या दोन पात्रांतील संघर्ष नाट्यकृतीचा गाभा होता. राजूच्या माध्यमातून राजकीय पुढाऱ्याने प्राध्यापकाचा उगवलेला सूड, स्पर्धेला कंटाळून अज्ञानवासात गेलेला कृष्णनच्या चित्राकृतीच्या मदतीने राजूने केलेला राष्ट्रीय पुरस्कारापर्यंतचा प्रवास नाट्यकृतीतून दर्शवण्यात आला. पुढे राजूने कृष्णनचा केलेला प्रयत्न अन्‌ प्राध्यापकाचा मृत्यू क्षणोक्षणी नाट्यकृतीचे महत्त्व विषद करत होती.

कलासाधनेत कायमच समर्पित राहणाऱ्या कलावंताचा वारंवार अपमान होतो. तो सहन करण्याची मनस्थिती ठेवावी लागते. अन्यथा काय होऊ शकते याचा प्रत्येक कलासाधकाला विचार करण्यास भाग पाडणारी ही नाट्यकृती होती. स्वत:च्या चित्राकृतीला राष्ट्रीय पुरस्कार मिळून देखील कायमचाच हरवलेला कृष्णन, जीवन संघर्षाला साखळदंड समजून अलिप्त जगणारा केळकर अन्‌ राजूने जीव घेतल्यानंतर त्याच्याकडे स्वत:च्या नावाने चित्रकला महाविद्यालय उघडण्याची केळकर या प्राध्यापकाने व्यक्‍त केलेली ईच्छा नागपूरकर प्रेक्षकांना नि:शब्द करून गेली. व्यावसायाने वास्तुविशारद असलेल्या कबीर ठाकोर यांनी नाट्यकृतीच्या माध्यमातून चित्रकाराच्या विद्वत्तेला प्रकाशात आणले आहे. भव्य जोशी यांनी प्रकाश योजनेतून विलक्षण भव्यता प्रदान केलीतर राजनेता प्रशांत जांगिड यांनी, कृष्णनची भूमिका दीप पटेल यांनी, वेश्‍या पूजा पुरोहित, केळकर यांची भूमिका शिवम पारेख यांनी, राजूची भूमिका विशाल शाह यांनी तर के. के. च्या भूमिकेत स्वत: कबीर ठाकोर होते.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com