खो-खो पटू दीपालीला हवाय शासनाकडून न्याय

नरेंद्र चोरे
रविवार, 24 मे 2020

दीपालीने 17 वर्षांपूर्वी खो-खोसारख्या देशी खेळात पहिल्यांदा पाऊल ठेवले, तेव्हा अशी वेळ येईल अशी पुसटशीही कल्पना तिने केली नव्हती. मात्र, शासनाचे चुकीचे धोरण व लालफीतशाहीमुळे तिच्यावर उपासमारीची वेळ आली.

नागपूर  : पुणे-मुंबईच्या तुलनेत वैदर्भी खेळाडूंना कशी सापत्न वागणूक दिली जाते, याचे ज्वलंत उदाहरण नागपूरची युवा आंतरराष्ट्रीय खो-खो पटू दीपाली सबानेचे आहे. दीपालीने तब्बल अकरावेळा राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. आशियाई स्पर्धेतही देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. दीपालीच्या बरोबरीच्या मराठवाड्यातील खेळाडूंना राज्य शासनाने नोकऱ्या दिल्या. परंतु, त्याच संघाची सदस्य राहिलेली दीपाली नोकरीसाठी चार वर्षांपासून शासनाचे उंबरठे झिजवत आहे. गरीब मायबापाच्या या पोरीने आता "सकाळ'मार्फत थेट क्रीडामंत्र्यांकडेच न्याय मागितला आहे.

दीपालीने 17 वर्षांपूर्वी खो-खोसारख्या देशी खेळात पहिल्यांदा पाऊल ठेवले, तेव्हा अशी वेळ येईल अशी पुसटशीही कल्पना तिने केली नव्हती. मात्र, शासनाचे चुकीचे धोरण व लालफीतशाहीमुळे तिच्यावर उपासमारीची वेळ आली. 27 वर्षीय दीपालीने नऊवेळा सिनियर नॅशनलमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. दोनवेळा सबज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाली.

पाचवेळा फेडरेशन चषक, पाचवेळा महिलांच्या राष्ट्रीय स्पर्धेत, चारवेळा पश्‍चिम विभाग स्पर्धेत आणि सलग आठवेळा पश्‍चिम विभाग आंतरविद्यापीठ खो-खो स्पर्धेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. राष्ट्रीय स्पर्धेतील सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल तिला एप्रिल 2016 मध्ये इंदूर येथे झालेल्या तिसऱ्या आशियाई खो-खो स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.

सेवाग्राम आश्रमचे अध्यक्ष प्रभू पायउतार, सर्व सेवा संघाने केला हा आरोप

याशिवाय साऊथ एशियन (सॅफ) गेम्समध्येही भारतीय संघात राखीव खेळाडू राहिलेली आहे. इंदूरमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यात अष्टपैलू दीपालीचे उल्लेखनीय योगदान राहिले होते.

विजेत्या भारतीय संघाच्या सदस्य राहिलेल्या उस्मानाबाद व सांगलीच्या दोन खेळाडूंना राज्य शासनाने तालुका क्रीडाधिकारी पदावर नोकऱ्या दिल्या. मात्र, दीपालीच्या गुणांची शासनाने कदरच केली नाही. तिने 2016 मध्येच ब वर्गाच्या नोकरीसाठी अर्ज केला होता. कागदपत्रांची पडताळणीसुद्धा झाली. परंतु, दीपालीची फाइल मंत्रालयातच अडकून पडली. दरम्यानच्या काळात सरकार बदलले, परंतु, दीपालीची फाइल पुढे सरकली नाही.

लॉकडाउनच्या अगोदर, दीपालीने क्रीडामंत्री सुनील केदार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. त्यावर सकारात्मक कारवाई होण्याची ती वाट पाहात आहे. नोकरीची प्रबळ दावेदार असूनही न मिळाल्याने नाइलाजाने आता तिला कुटुंबाला आधार देण्यासाठी खासगी नोकरी करावी लागत आहे. बी. ए. बीपीएड झालेली दीपाली सध्या जवाहर गुरुकुलमध्ये तुटपुंज्या पगारावर शारीरिक शिक्षक म्हणून "जॉब' करीत आहेत.

पारडी येथील अंबेनगरात राहणाऱ्या दीपालीचे वडील विजय सबाने एका मिठाईच्या दुकानात रोजंदारीवर होते. सध्या ते घरीच आहेत. त्यांना पेन्शनही नाही. आई अंजू गृहिणी आहे. हलाखीच्या परिस्थितीमुळे थोरल्या भावालाही शिक्षण सोडून गांधीबागमधील कपड्याच्या दुकानात नोकरी करावी लागते आहे. लॉकडाउनमुळे दीपालीचा खेळही बंद आहे, तीन-चार महिन्यांपासून पगारही नाही. त्यामुळे सध्या सरकारी नोकरीची नितांत गरज असल्याचे दीपालीने सांगितले.

दीपालीमध्ये कमालीचे टॅलेंट
देशभरातील विविध राष्ट्रीय स्पर्धा गाजविणाऱ्या दीपालीमध्ये कमालीचे "टॅलेंट' आहे. ती महाराष्ट्र संघाची नेहमीच मुख्य आधारस्तंभ राहिलेली आहे. मात्र, त्याउपरही तिच्यावर शासनाने अन्याय केला आहे. दीपालीची आर्थिक परिस्थिती बघता तिला नोकरीची अत्यंत आवश्‍यकता आहे. क्रीडामंत्री नागपूरचेच असल्यामुळे तिच्यावरील अन्याय दूर होईल, अशी आम्हाला आशा आहे.
-पराग बन्सोले, दीपालीचे प्रशिक्षक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kho-Kho Player Deepali gets justice from Maharashtra government