कशामुळे बसला नागपुरातील हजारो युवा खेळाडूंना फटका, सविस्तर वाचा

file photo
file photo


नागपूर : उन्हाळी क्रीडा शिबिरे शहरातील क्रीडा जगताचा अविभाज्य घटक आहे. या शिबिरांमध्ये दरवर्षी हजारो युवा खेळाडूंना प्रशिक्षणाचे धडे मिळून भविष्यात ते चांगले खेळाडू म्हणून उदयास येतात. मात्र कोरोनामुळे यंदा शिबिरांमध्ये सर्वत्र शुकशुकाट जाणवला. शिबिरांअभावी युवा खेळाडूंचे तर आर्थिक नुकसान झालेच, शिवाय क्रिकेट प्रशिक्षकांनाही फटका बसला. नागपूरच्या आतापर्यंतच्या इतिहासात यंदा प्रथमच उन्हाळी शिबिरांमध्ये खेळाडूंचा किलबिलाट जाणवला नाही, हे उल्लेखनीय. 


उपराजधानीत मुजूमदार क्रिकेट अकादमी, प्रवीण हिंगणीकर क्रिकेट अकादमी, डॉ. आंबेडकर कॉलेज अकादमी, रुबी स्पोर्टिंग क्‍लब, रेशीमबाग क्रिकेट क्‍लब, नागपूर क्रिकेट अकादमी, सिटी जिमखाना, इंडियन जिमखाना, शरद भाके क्रिकेट क्‍लब, नवनिकेतन क्‍लब, ऍडव्होकेट क्‍लब, रॉयल क्रिकेट क्‍लब या प्रमुख क्रिकेट क्‍लब्ससह दरवर्षी पन्नासावर छोटी-मोठी उन्हाळी शिबिरे चालतात. वर्षभर शाळा व महाविद्‌यालयांमध्ये व्यस्त राहात असल्यामुळे वेळ मिळत नाही. अशा वेळी उन्हाळी शिबिरेच नवोदित खेळाडूंसाठी योग्य वेळ असते. त्यामुळे क्रिकेट इच्छूक खेळाडूंसह पालकही उन्हाळी शिबिरांची आतुरतेने वाट पाहात असतात. या शिबिरांमध्ये हजारो युवा खेळाडू क्रिकेटचे बेसिक प्रशिक्षण घेतात आणि क्रिकेटची आवड निर्माण होऊन पुढे ते क्रिकेटमध्ये करिअर करतात. मात्र कोरोनामुळे यावर्षी उन्हाळी शिबिरांमध्ये चिटपाखरूही फिरकले नाही. परिणामत: क्‍लब चालविणाऱ्या क्रिकेट प्रशिक्षकांचे लाखोंचे नुकसान झाले. विशेषत: निव्वळ उन्हाळी शिबिरांवर उपजिविका असलेल्यांना जबर फटका बसला. कोरोनाने वर्षभराची कमाई हिरावून नेल्याचे गेल्या 35 वर्षांपासून वसंतनगर येथे क्‍लब चालविणारे क्रिकेट प्रशिक्षक सुनील मुजूमदार यांनी सांगितले. 


इनडोअर सभागृह सरावासाठी खुले करा हो !  प्रशिक्षकांचे प्रशासनाकडे आर्जव 


क्रिकेटचा खेळ केवळ मनोरंजन नाही. अनेकांचे ते उपविविकेचे साधन आहे. क्‍लबचे मालक लाखो रुपयांची गुंतवणूक करून मैदानाचे "मेंटेनन्स' करतात. उन्हाळी शिबिरांवरच त्यांचे वर्षभराचे नियोजन अवलंबून असते. दुर्दैवाने यावर्षी एका पैशाचीही कमाई न झाल्याने क्रिकेट प्रशिक्षक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मैदानावर सराव करण्याची संधी न मिळाल्याने खेळाडूंचेही मोठे नुकसान झाले. गेल्या तीन-चार महिन्यांपासून बहूतांश क्रिकेटपटू घरांतच अडकून राहिले. त्यांना केवळ फिटनेस व हलका वर्कआऊटच करता आला. पण त्याला "आऊटडोअर प्रॅक्‍टिस'ची सर नसल्याची भावना काही खेळाडूंनी बोलून दाखविली. चार भिंतीत राहिल्यामुळे त्यांच्यात चिडचिड व नैराश्‍य वाढले आहे. लॉकडाउनचा फटका खेळाडू व प्रशिक्षकांसह विदर्भ क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित आगामी क्रिकेट स्पर्धांनाही बसणार आहे. कारण बहूतांश खेळाडू सध्या "आऊट ऑफ टच' आहेत. त्यांना स्पर्धेपूर्वी नियमित सरावाची नितांत आवश्‍यकता आहे. पुरेशा सरावाअभावी त्यांच्या भविष्यातील कामगिरीवर परिणाम होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. उन्हाळी शिबिरांवरच क्रीडा साहित्यांची विक्री करणाऱ्यांचेही भविष्य अवलंबून असते. त्यांनाही उन्हाळी शिबिरांचा जबर आर्थिक फटका बसला आहे. खेळाडूंची अडचण लक्षात घेता आता तरी "सोशल डिस्टन्सिंग'च्या अटींवर सराव करण्याची परवानगी द्‌यावी, अशी त्यांची मागणी आहे. 


" हा केवळ क्रिकेट क्‍लब चालविणाऱ्या क्‍लब मालकांच्या आर्थिक नुकसानीचा मुद्‌दा नाही. यावर्षी उन्हाळी शिबिरे आयोजित न झाल्यामुळे अनेक प्रतिभावान युवा खेळाडूंचे अतोनात नुकसान झाले आहे. विशेषत: वर्षभर शाळांमध्ये व्यस्त राहणाऱ्या व उन्हाळी शिबिरांची वाट पाहणाऱ्या उदयोन्मुख खेळाडूंना जबर फटका बसला. लॉकडाउनमुळे एकूणच नागपुरातील क्रिकेट विश्‍वाचे मोठे नुकसान झाले आहे.' 
-प्रवीण हिंगणीकर, क्रिकेट प्रशिक्षक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com