लक्ष्मीपती "विष्णू' ओढतोय भाजीचा ठेला, वाचा लॉकडाऊननंतरची व्यथा...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जून 2020

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मुलांना सुटी लागताच विष्णू रसवंतीही सुरू करायचा. संपूर्ण कुटुंबच या व्यवसायात लागायचे. सांघिक परिश्रमाच्या बळावर या कुटुंबाचे अडीच ते तीन महिन्यांचे उत्पन्न 1 लाखाच्याही वर जायचे. यंदा मात्र कोरोनाने घात केला. सर्वाधिक उत्पन्नाचा हंगामच बुडाला.

नागपूर : वाट्टेल ते कष्ट उपसायचे, पण पाचविला पुजलेली गरिबी दूर सारायचीच, या विश्‍वासाने छोट्याशा गावातील विष्णू संत्रानगरीत दाखल झाला. जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न तो कमावू लागला. उन्हाळ्यात तर तो लाखभर रुपये जमा करायचा. मात्र, कोरोनाने दिवस पुन्हा पालटवले. आता भाजीचा ठेला ओढण्याची वेळ त्याच्यावर परतली आहे. याही स्थितीत "भोग सरल सुख येईल' या विश्‍वासाने तो दिवसभर राबतो आहे. 

विष्णू पटेल हा मूळचा मध्य प्रदेशातील रिवा जिल्ह्याच्या एका गावातील रहिवासी. नशिबाने दिले त्यावर समाधान न मानता, मोठे स्वप्न उराशी बाळगून तो नागपूर नगरीत दाखल झाला. छोट्या ठेल्यावर दाबेलीचे दुकान थाटले. ग्राहकांचा सन्मान आणि समाधानावर भर दिला. लवकरच देवनगर परिसरात त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली. काचीपुऱ्यातील छोट्याशा घरात त्याचा संसारही फुलत आहे.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मुलांना सुटी लागताच विष्णू रसवंतीही सुरू करायचा. संपूर्ण कुटुंबच या व्यवसायात लागायचे. सांघिक परिश्रमाच्या बळावर या कुटुंबाचे अडीच ते तीन महिन्यांचे उत्पन्न 1 लाखाच्याही वर जायचे. यंदा मात्र कोरोनाने घात केला. सर्वाधिक उत्पन्नाचा हंगामच बुडाला.

हेही वाचा : भयंकर... "लुटेरी दुल्हन' प्रीती दासने बलात्कार पीडितेला मागितली एवढी रक्कम, वाचा कशासाठी?

विपरित परिस्थिही विष्णूला थोपवू शकली नाही. त्याने ठेल्यावर भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला. फार उत्पन्न नसले तरी गाठीला असणारे पैसे खर्च करावे लागू नये, कुटुंबाचे भरणपोषण या व्यवसायातून व्हावे, येवढीच त्याची माफक अपेक्षा आहे. त्याच्यातील हा कणखरपणा लॉकडाऊनच्या काळात हिंमत गमाविणाऱ्यांसाठी दिशादर्शक आहे. 

गावाकढची ओढ 
विष्णू राहतो त्या वस्तीत सर्वच छोटे विक्रेते वास्तव्यास आहेत. मॉन्सूनचे आगमन होताच व्यवसाय ठप्प होतो. यामुळे जूनचा मध्य लोटताच वस्तीतील अनेक कुटुंब गावाकडे परततात. यंदा व्यवसायच ठप्प असल्याने लॉकडाऊनचे नियम शिथिल होताच साऱ्यांनीच गावाकडची वाट धरली. पण, विष्णू खचला नाही. तो कुटुंबासह अजूनही तळ ठोकून आहे. पण, गावाची ओढ त्यालाही खुणावू लागली आहे. भाजी विक्रीतून थोडे फार पैसे जमा होताच गावाकडे जाण्याची त्याची तयारी आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lakshmipati "Vishnu" pulling vegetable cart