विळखा वाढतोय... पंधरा दिवसात १० शिक्षकांचा मृत्यू, आता संघटनांनी दिला हा इशारा

मंगेश गोमासे
Wednesday, 16 September 2020

राज्यात देशभरातील सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण आहे. मागील काही दिवसात राज्यात लाखोंची भर पडली. नागपुरात १५ दिवसात २७ हजार रुग्णांची भर पडली असून १५ दिवसात ८६३ मृत्यू झालेत. यामध्ये शहरातील १४ पोलिसांचा समावेश आहे.

नागपूर : कोरोनाचे संकट मागील दोन महिन्यापासून अधिकच वाढत आहे. या संकटामुळे एकीकडे डॉक्टर आणि पोलिसांना आपल्या विळख्यात घेतले असताना आता त्या शिक्षकही बळी पडत आहेत. गेल्या पंधरा दिवसात १० शिक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.

राज्यात देशभरातील सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण आहे. मागील काही दिवसात राज्यात लाखोंची भर पडली. नागपुरात १५ दिवसात २७ हजार रुग्णांची भर पडली असून १५ दिवसात ८६३ मृत्यू झालेत. यामध्ये शहरातील १४ पोलिसांचा समावेश आहे. कोरोना असताना त्यांना दिवसरात्र कर्तव्यावर राहावे लागते. याचप्रमाणे जिल्हा परिषद आणि खासगी अनुदानित शाळांच्या शिक्षकांना कोरोना सर्वेक्षणाच्या कामात जुंपविण्यात आले. याचा विरोध म्हणून शिक्षकांनी कोरोना सर्वेक्षणाचे काम दिल्यास, शाळेत शिकवायचे कसे? हा प्रश्न उपस्थित करून या कामातून मुक्तता देण्यात यावी अशी मागणी केली. यातूनच शालेय शिक्षण विभागाने त्यांची कोरोनाच्या कामातून मोकळीक देण्याचा निर्णय घेतला. तसा अधिकृत आदेशही काढला. या आदेशाला धरून प्राथमिक, माध्यमिक आणि उपसंचालक कार्यालयाने पत्र काढले.

कोरोनामुळे संगणक इन्स्टिट्यूट झाले बंद; होतकरु विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान; प्रशिक्षणापासून वंचित

मात्र, यानंतरही जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदारांकडून शिक्षकांना कोरोना कामातून मुक्तता देण्यात येत नसल्याचे दिसून येते. त्यातूनच शिक्षकांना कोरोनाचे संक्रमण होत असून १० शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी तीन शिक्षक शहरातील तर ७ शिक्षक ग्रामीण भागातील आहेत. इतक्या मृत्यूनंतर अद्यापही शिक्षकांकडून कोरोना सर्वेक्षण करण्यात येत आहे हे विशेष.

काही संघटना आंदोलनाच्या तयारीत
कोरोनामुळे शिक्षकाचे मृत्यू वाढत असल्याने या कामातून शिक्षकांना मुक्त करा अशी मागणी आता संघटना करू लागल्या आहेत. आज एका शिक्षकांचे कोरोनाने निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्व्हेक्षणाबाबत शिक्षकांमध्ये प्रचंड रोष आहे. या सर्व्हेक्षण बंद करण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून होत असून काही संघटना आंदोलनही करणाच्या तयारीत आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या शिक्षकांना विमा कवच म्हणून लाख रुपये देण्याची मागणी संघटनांकडून करण्यात येत आहे.

तीव्र आंदोलन करणार

शासनाने संबंधित मृत शिक्षकांच्या कुटुंबीयांना ५० लाख विमा लाभ देण्यात यावा व सर्वेक्षण करणाऱ्या सर्व शिक्षकांना त्वरित कोविड कामातून कार्यमुक्त करण्यात यावे. अन्यथा मनसे शिक्षक सेनेतर्फे २ ऑक्टोबर रोजी तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा  महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेनेचे राज्य सरचिटणीस शरद भांडारकर यांनी दिला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In last 15 days, 10 teachers died due to corona