लॉकडाउनने कुणाचे बिघडवले आरोग्य ! सविस्तर वाचा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जुलै 2020

जिम बंद असल्यामुळे केवळ मालकच आर्थिक अडचणीत नाही, तर त्यावर उदरनिर्वाह असलेले कर्मचारीही बेरोजगार झाले आहेत. दैनंदिन खर्चासाठी पैसे नसल्यामुळे ते नैराश्‍येच्या वातावरणात आहेत.

नागपूर : कुणाल वाचनेकर यांनी लाखो रुपये खर्च करून चार-पाच महिन्यांपूर्वी माधवनगरमध्ये जिम सुरू केला. शहरात फिटनेसचे "फॅड' वाढत चालल्याने हाती दोन पैसे येतील, अशी त्यांना आशा होती. मात्र उद्‌घाटन होऊन जेमतेम 40 दिवस लोटत नाही तोच लॉकडाउन लागला आणि सर्व आशेवर पाणी फिरले. व्यवसायाची गाडी रुळावर येण्यापूर्वीच रुळावरून घसरली. कोरोनाचा मार बसल्याचे हे एकमेव उदाहरण नाही. शहरातील शेकडो जिम व फिटनेस क्‍लब्सला कोरोनाचा फटका बसला. 

काही महिन्यांपूर्वी दुसऱ्याच्या जिममध्ये ट्रेनर म्हणून काम करणारे व राष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू असलेले कुणाल यांनी रोजगारासोबतच नागपूरकरांचे स्वास्थ्य सुधारण्याच्या उद्‌देशाने स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. जवळची थोडीफार जमापूंजी व कर्ज काढून "एक्‍स्ट्रा एज फिटनेस' नावाचा जिम उघडला. गेल्या दोन फेब्रुवारीला "मिस्टर युनिव्हर्स' किताब विजेता संग्राम चौगुले यांच्या हस्ते जिमचे थाटात उद्‌घाटनही झाले. व्यवसाय सुरू होऊन सव्वा महिना होत नाही तोच 13 मार्चला देशात लॉकडाउन लागला. तेव्हापासून जिमला कुलुप लागले. एका पैशाचीही कमाई नाही. त्यामुळे बॅंकेचे ईएमआय, भरमसाठ किराया, इलेक्‍ट्रिक बिल, ट्रेनर्स व कर्मचाऱ्यांचा पगार, मेंटेनन्ससाठी पैसे आणायचे कुठून, असा प्रश्‍न त्यांना पडला आहे. किराया थकल्याने घरमालकाने जिमला कुलुप ठोकले. त्यामुळे प्रशासनाच्या आदेशाची वाट पाहण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा मार्गही नाही. 

इनडोअर सभागृह सरावासाठी खुले करा हो !  प्रशिक्षकांचे प्रशासनाकडे आर्जव 
 

जिम बंद असल्यामुळे केवळ मालकच आर्थिक अडचणीत नाही, तर त्यावर उदरनिर्वाह असलेले कर्मचारीही बेरोजगार झाले आहेत. दैनंदिन खर्चासाठी पैसे नसल्यामुळे ते नैराश्‍येच्या वातावरणात आहेत. सध्याच्या घडीला शहराच्या विविध भागांत पाचशेच्या वर छोटेमोठे जिम व फिटनेस क्‍लब आहेत. कमीकधिक प्रमाणात त्यांचीही हीच अवस्था आहे. जिम मालकांच्या असोसिएशनने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री उद्‌धव ठाकरे, जिल्हाधिकारी व मनपा आयुक्‍तांना पत्र दिले. परंतु, अजूनपर्यंत यावर निर्णय झाला नाही. सरकारने अनेक दुकानांना परवानगी दिली. त्याचप्रमाणे जिमलाही हिरवी झेंडी दाखवावी, अशी त्यांची मागणी आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown spoils Gym's health!