लॉकडाउनमुळे यांना बसणार रिव्हर्स किक ! सविस्तर वाचा

file photo
file photo


नागपूर : पावसाळा सुरू झाला की उपराजधानीला फुटबॉलचा ज्वर चढतो. जुलै व ऑगस्ट महिन्यात शहरातील अनेक मैदानांवर फुटबॉलचे सामने रंगतात. खेळाडूंसह हजारो क्रीडाप्रेमी फुटबॉलचा आनंद घेतात. मात्र कोरोनामुळे यंदा झोपडपट्‌टी फुटबॉल स्पर्धेसह तीन फुटबॉल स्पर्धांच्या आयोजनावर अनिश्‍चिततेचे सावट निर्माण झाले आहे. या स्पर्धा न झाल्यास हजारो युवा फुटबॉलपटूंना फटका बसण्याची शक्‍यता आहे. 


नागपुरातील फुटबॉल स्पर्धेचा हंगाम नागपूर जिल्हा फुटबॉल संघटने (एनडीएफए)तर्फे आयोजित एलिट डिव्हिजन फुटबॉल स्पर्धेने जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात होतो. सामने अजनी रेल्वे मैदान, पोलिस लाइन टाकळी मैदान तसेच मोतीबाग येथील दक्षिणपूर्व रेल्वे मैदानावर खेळले जातात. यावर्षी सुयोगनगर येथील मैदान विकसित केल्याने येथे सामने आयोजित करण्याची तयारी संघटनेने दर्शविली होती. मात्र लॉकडाउनमुळे संघटनेच्या आशेवर पाणी फिरले आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता एनडीएफएचे अध्यक्ष हरीश वोरा यांनी ही स्पर्धा अनिश्‍तिचकाळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता एलिटसह सिनियर व फर्स्ट डिव्हिजन फुटबॉल स्पर्धेवरही प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 


शाळा सुरू झाल्या की, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे आयोजित आंतरशालेय क्रीडा स्पर्धांनाही जुलै महिन्यात सुरूवात होते. विविध वयोगटांत होणाऱ्या या स्पर्धेत विविध शाळांचे हजारो युवा खेळाडू सहभागी होतात. साधारणपणे सुब्रतो मुखर्जी करंडक स्पर्धेने विविध मैदानांवर श्रीगणेशा होतो. परंतु, कोरोनामुळे शाळा अद्‌याप सुरू न झाल्याने या स्पर्धाही खोळंबल्या आहेत. त्यामुळे आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतरच शालेय क्रीडा स्पर्धांना प्रशासनाकडून हिरवा कंदिल मिळण्याची शक्‍यता आहे. यावर्षी स्पर्धा न झाल्यास दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांनाही क्रीडा गुणांपासून वंचित राहावे लागू शकते. आई कुसूम सहारे फाउंडेशनतर्फे आयोजित विना जोड्यांची झोपडपट्‌टी स्पर्धा पावसाळ्यातील आणखी एक आकर्षण आहे. रेशीमबाग मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेत झोपडपट्‌टीतील शेकडो गोरगरीब खेळाडू सहभागी होतात. हजारो फुटबॉलप्रेमींची मैदानावर गर्दी उसळते. कोरोनामुळे ही स्पर्धाही होण्याची शक्‍यता कमीच आहे. तशी भिती फाऊंडेशनचे अध्यक्ष नगरसेवक नागेश सहारे यांनी व्यक्‍त केली आहे. यावेळी स्पर्धा न झाल्यास गेल्या दोन दशकांत पहिल्यांदाच मालिका खंडीत होणार आहे.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com