दुर्मीळ आजारावर मात करून मिळवले नवजीवन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जून 2020

अचानकपणे एक दिवस त्रास खूप वाढल्याने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर (मेडिकल) येथे दाखल करण्यात आले. सुरुवातीला वार्ड क्रमांक 48 मध्ये डॉ. विनोद खंडाईत यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते, परंतु एकाएकी श्वास घेण्याची क्षमता कमी झाल्याने त्यांना आयसीयू मध्ये दाखल केले

नागपूर ः व्यवसायाने स्वयंपाकी असलेले आनंदराव गेल्या वर्षभरापासून गिळताना त्रास होणे, शारीरिक अशक्तपणा, डोळ्याच्या पापण्या जड पडणे, एकच वस्तू दोन दिसणे अश्‍या वेगवेगळ्या समस्यांनी ग्रस्त होते. त्यासाठी त्यांनी असंख्य ठिकाणी उपचार घेतले परंतु त्यांचा त्रास मात्र कमी झाला नाही. अचानकपणे एक दिवस त्रास खूप वाढल्याने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर (मेडिकल) येथे दाखल करण्यात आले. सुरुवातीला वार्ड क्रमांक 48 मध्ये डॉ. विनोद खंडाईत यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते, परंतु एकाएकी श्वास घेण्याची क्षमता कमी झाल्याने त्यांना आयसीयू मध्ये दाखल केले, तिथे त्यांना व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले. जवळपास 19 दिवस ते व्हेंटिलेटरवर वर होते त्यादरम्यान कित्येक वेळेस त्यांना मृत्यूने गाठण्याचा प्रयत्न केला परंतु हार न मानता त्यांची जगण्यासाठीची लढाई चालूच होती. मेडिकल च्या डॉक्‍टरांची टीम सातत्याने प्रयत्न करत होती व हळूहळू त्या प्रयत्नांना यश येऊ लागले, आनंदराव शुध्दीवर आले श्वास घेण्याचा प्रयत्न करू लागले व एके दिवशी त्यांना व्हेंटिलेटर पासून मुक्त करण्यात आले. आनंदरावांना अतिशय दुर्मिळ असा अँटी मस्क अँटीबॉडी माएस्थेनिया ग्रॅवीस नावाचा आजार झाला होता जो की 7-8 प्रति दशलक्ष व्यक्तींना होतो. अश्‍या या जीवघेण्या आजारातून वाचवण्यासाठी मेडिकल च्या तज्ञ डॉक्‍टरांनी प्रामुख्याने डॉ. विनोद खंडाईत (पथकप्रमुख, पथक क्र.), डॉ. मिलिंद व्यवहारे (आयसीयू प्रमुख), डॉ. अभिषेक पांडे (साहाय्यक व्याख्याता) यांनी विशेष मेहनत घेतली. आनंदरावांचे कुटुंब अतिशय आनंदी असून मेडिकल चे सदैव ऋणी राहू अशी भावना व्यक्त त्यांनी व्यक्त केली.
 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: major health problems solve