
नाताळ तसेच गीता जयंतीनिमित्त अनेकांचे फोटो लागलेल्या त्यांच्या झोपडीकडे लक्ष गेले नाही तर नवलच.
नागपूर ः झोपडीत अठरा विश्वे दारिद्र्य...तरुण स्वयंमग्न मुलगा, रिक्षा ओढून जर्जर झालेले शरीर....असे असतानाही शहरातील नामवंत तसेच थोर नेते, देव, देवीचे फोटो लावून, दिव्यांची आरास सजवून मोहन परमाकोटी गरीबीतही उत्साहात प्रत्येक सण साजरा करताना दिसून येत आहे. नाताळ तसेच गीता जयंतीनिमित्त अनेकांचे फोटो लागलेल्या त्यांच्या झोपडीकडे लक्ष गेले नाही तर नवलच.
सहकारनगर, जयताळा रोडवरील झोपडी आज अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. येथून ये-जा करणारे प्रत्येकच जण कुतूहलाने या झोपडीकडे बघून पुढे जात आहे. शहराचे महापौर, आमदारापासून तर माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी, मदनमोहन मालवीय, शहरातील पोलिस अधिकारी आणि देवी, देवता, संतांचे फोटो लागलेल्या झोपडीत ५६ वर्षीय मोहन परमाकोटी स्वयंमग्न मुलांसह १७ वर्षांपासून वास्तव्यास आहे.
हेही वाचा - कंपनीत काम आटोपून चौघांनाही लागली घराची ओढ, पण...
अगदी रस्त्यावर असलेल्या झोपडीपुढे आज तिरंगा फडकल्याने नागरिकांची आणखीच उत्सुकता वाढली होती. काही नागरिक थांबून पाहत होते, त्यांना मोहन नमस्कार करताना दिसून आले. अशाप्रकारे फोटो लावण्यामागील कारणांबाबत विचारले असता त्यांनी ‘आज ख्रिसमस, गीता जयंती है ना साब, इसलिये फोटो लगाये, शाम को दिये भी लगाऊंगा` असे सांगितले. प्रत्येक सणाला तसेच थोर पुरुषांची जयंतीला फोटो लावत असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांच्या झोपडीत दोघांना आवश्यक भांडी, जेवण तयार करण्यासाठी गोळा केलेले सरपण, अंथरुणासाठी काही चादरी, सौर उर्जेवरील एक दिवा एवढेच दिसून आले. मुलाच्या जेवणापासून तर सारेच त्यांना करावे लागते. कधी काळी रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या मोहन आता थकले. त्यामुळे पुढच्याच इमारतीत साफसफाईची कामे करून मिळेल त्यावर जीवन जगत आहे. कधी कुणी काहीतरी देऊन जातो, असेही त्यांनी सांगितले.
काढतात आवडत्या फोटोची प्रिंट
गेल्या सतरा वर्षांपासून प्रत्येक सणाला आवडत्या व्यक्तींची फोटो लावत असल्याचे ते म्हणाले. सणासुदीला अनेकांच्या घरी पाहुणे येतात. माझ्या झोपडीतही कुणीतरी यावे, असे वाटते. पण कुणी येत नाही. त्यामुळे आपल्या आवडत्या व्यक्तींची फोटो इंटरनेटवाल्याकडून शोधून त्याची प्रिंट काढून घरापुढे बॅनरसारख्या तयार केलेल्या प्लायवूडच्या तक्त्यावर चिकटवतो. ते माझ्या उत्साहात सहभागी झाल्यासारखे वाटते, असे मोहन यांनी सांगितले. मिळालेल्या पैशातून फोटो प्रिंट काढून आणण्यासाठी पैसे वाचवितो, हा छंदच जडला, असेही ते म्हणाले.
रस्त्यावर लावली ६० झाडे
मोहन परमाकोटी हे पर्यावरणप्रेमीही आहे. त्यांनी झोपडीच्या दोन्ही बाजूला विविध प्रजातीची झाडे लावली आहेत. यात बोरं, सिताफळ, मुंगण्याच्या शेंगा, बदामीचे झाडांचा समावेश आहे. झाडांच्या बुंध्याला चुना लावल्याने त्यांच्या आकर्षणात आणखीच भर पडली आहे.
दहावीपर्यंत शिक्षण
मोहन परमाकोटी यांचे वडील रेल्वेत नोकरीला होते. अजनी येथील रेल्वेच्या शाळेत मोहन यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले. दहावी अनुत्तीर्ण असल्याने नोकरीऐवजी मिळेल ते काम करण्यास त्यांनी सुरुवात केली. रिक्षाही चालविला. परंतु आता ते थकले असून मुलाची त्यांना चिंता आहे.
नक्की वाचा - पॅनलचा खर्च करणार कोण? उमेदवारांपुढे पेच; गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्यांचा हिरमोड
नातेवाईकांनी फिरवली पाठ
‘घर फिरले की घराचे वासेही फिरतात' ही म्हण मोहन यांच्यावर उपयुक्त आहे. त्यांचे शहरात नातेवाईक आहेत. परंतु कुणीही ढुंकूनही पाहत नाही. नातेवाईकांनी पाठ फिरवली. परंतु काहीही तक्रार नसल्याचे त्यांनी सांगितले.
संपादन - अथर्व महांकाळ