बापरे! मॅंगनीजसाठी चक्क रस्ताच खोदला  

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जून 2020

सिहोरा येथील रस्ता खोदून मॅंगनीज चोरी होत असल्याचे प्रकरण पुढे आले आहे. विशेष म्हणजे, रहदारीचा असलेला हा रस्ता अनेक दिवसांपासून रखडलेला होता. शेवटी हा रस्ता बनविण्यात आला; मात्र त्यालाही मॅंगनीज चोरांचे ग्रहण लागल्याचे चित्र आहे. 

टेकाडी  (नागपूर) : कन्हान पोलिस ठाण्याअंतर्गत गौण खनिजाची चोरी काही नवीन गोष्ट नाही. मात्र, गौण खनिजासाठी चक्क पक्का रस्ता खोदून काढण्यात आला असून, या गौण खनिजाची मोठ्या प्रमाणात चोरी करण्यात येत आहे. यामुळे सिहोरा रस्त्यावर अपघाताची शक्‍यता वाढली आहे. संबंधित विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

जिल्ह्यातील प्रत्येक गावापर्यंत रस्ता जोडण्याचे सरकारचे धोरण असले, तरी पारशिवनी तालुक्‍यातील कन्हान शहरालगत असलेल्या सिहोरा परिसरात मॅंगनीज या गौण खनिजाची चोरी होत आहे. चक्क रस्ता खोदून मॅंगनीज चोरी करण्यात येत असल्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. कन्हान क्षेत्रात वाळू, कोळसा, माती आणि मॅंगनीजची चोरी नवीन नाही. अशातच सिहोरा येथील रस्ता खोदून मॅंगनीज चोरी होत असल्याचे प्रकरण पुढे आले आहे. विशेष म्हणजे, रहदारीचा असलेला हा रस्ता अनेक दिवसांपासून रखडलेला होता. शेवटी हा रस्ता बनविण्यात आला; मात्र त्यालाही मॅंगनीज चोरांचे ग्रहण लागल्याचे चित्र आहे. 

अधिक वाचा : पाच जणांचा बळी घेणाऱ्या 'केटी 1'चा मृत्यू संसर्गामुळेच

क्षेत्रातील महिला आणि युवतींनी रस्ता खोदून मॅंगनीज काढण्याचा विडा उचललेला आहे. त्यामुळे जागोजागी रस्त्याला मोठे खड्डे पडलेले आहेत. रहदारीचा असलेला हा रस्ता सध्या अपघाताला आमंत्रण देत आहे. मात्र, अवैधरित्या होत असलेल्या खोदकामाकडे संबंधित विभाग आणि पोलिस प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. एखादी अप्रिय घटना घडल्यास जबाबदार कोण, असा सवाल नागरिक विचारत आहेत. रस्ता खोदून गौण खनिज चोरणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manganese theft