पावसाळा आला अन्‌ मानकापूरसाठी धोक्‍याची घंटा घेऊन आला, वाचा काय आहे प्रकार...

Mankapur threat due to faulty flyover
Mankapur threat due to faulty flyover

नागपूर :  मानकापूर येथे पिवळी नदीवर बांधलेल्या सदोष उड्डाणपुलामुळे यंदाही मानकापूर व झिंगाबाई टाकळी परिसरातील वस्त्यांना पुराचा धोका कायम आहे. सदोष पुलामुळे नदीतील पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाला आहे. संततधार किंवा जोरदार पावसात नदीतील पाणी जवळच्याच वस्त्यांमध्ये शिरण्याची भीती परिसरातील नागरिकांनी व्यक्‍त केली आहे.

मानकापूर येथे पिवळी नदीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुलाचे बांधकाम केले. पिवळी नदीच्या पात्रात मध्यभागी पिलर उभा केला आहे. परिणामी पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होत आहे. पाणी पुढे जात नसल्याने मानकापूर तसेच झिंगाबाई टाकळी परिसरात शिरते. पिवळी नदीच्या या भागात अनेक घरे तसेच झोपड्या व दुकाने आहेत.

शहरात संततधार सुरू राहिल्यास या वस्त्या पाण्याखाली येत असतात. दरवर्षी हा क्रम सुरू आहे. अनेक वर्षांपासून हा पिलर हटविण्याबाबत अधिकाऱ्यांची बैठक होते. परंतु, अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. यापूर्वी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही यासंबंधात बैठक घेतली होती. बैठकीत त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना सुनावले होते. परंतु, आता सरकार बदलले आणि या सदोष पुलाचे भिजतघोंगडे कायम आहे.

येथील नागरिक पावसाळ्यात दरवर्षी या पुलाच्या दुरुस्तीची मागणी करतात. परंतु, महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अद्याप डोळे उघडले नाहीत. या पुलामुळे वस्त्यांमध्ये शिरणाऱ्या पाण्याने दरवर्षी या भागातील गरीब नागरिकांना नुकसान सहन करावे लागत आहे. आणखी किती वर्षे नागरिकांनी नुकसान सहन करावे, असा प्रश्‍न या भागातील माजी नगरसेवक अरुण डवरे यांच्यासह नागरिकांनी उपस्थित केला आहे.

तक्रारींचा ढिगारा

सदोष पुलाबाबत तसेच त्यापासून पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पुराच्या समस्येबाबत आतापर्यंत या परिसरातील नागरिक तसेच माजी नगरसेवक अरुण डवरे यांनी महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे अनेकदा तक्रारी केल्या. हा पूल पावसाळ्यात अनेकांची झोप उडवीत असून, प्रशासन झोपेत आहे.

पुलाचे डिझाईनच चुकीचे
पुलाचे डिझाईनच चुकीचे आहे. नदीच्या मध्यभागी तयार केलेल्या पिलरमुळे पावसाचे पाणी त्याच परिसरात थांबते. ते पाणी पुन्हा परत येते. याशिवाय पाण्याचा प्रवाह पुढे जात नसल्याने पिवळी नदीला जोडण्यात आलेले नालेही तुडुंब भरतात. परिणामी अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरते. याबाबत अनेक तक्रारी केल्या. परंतु, काहीही झाले नाही.
- अरुण डवरे, माजी नगरसेवक, अभियंता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com