संजय गांधी निराधार योजना समिती अभावी अनेकांच्या अर्जाला मंजुरीची प्रतीक्षा

मनोज खुटाटे
Friday, 30 October 2020

सर्व निराधारांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेंशन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा मोबदला, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंगता पेंशन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना अशा विविध योजना राबविण्यात येतात.

जलालखेडा : निराधारांना आधार देण्याचे कार्य मासिक अनुदान देऊन शासन करीत असते. यासाठी शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येतात. विविध योजनेतील लाभार्थ्यांची निवड करण्याची जबाबदारी ही संजय गांधी निराधार योजना समितीकडे असते. ही समिती पालकमंत्र्याच्या शिफारशीनुसार जिल्हाधिकारी नियुक्त करतात. पण नरखेड तालुक्यात अद्याप ही समिती नियुक्त करण्यात न आल्यामुळे शेकडो पात्र लाभार्थी अर्ज करूनही अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.

समाजातील अनेक नागरिक वृद्ध आहेत, दिव्यांग आहेत, विधवा आहेत, परित्यक्त्या, अनाथ, दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत, अशा सर्व निराधारांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेंशन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा मोबदला, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंगता पेंशन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना अशा विविध योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत पात्र असलेल्या नागरिकांचे अर्ज मंजूर करण्यासाठी शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार योजना समिती नियुक्त करण्यात येते. पालकमंत्र्यांच्या शिफारसीनुसार जिल्हाधिकारी समितीची नियुक्ती करतात. पण नरखेड तालुक्यात अद्याप ही समितीची नियुक्ती करण्यात न आल्यामुळे ४५० निराधारांना अद्यापही शासनाचा आधार मिळू शकलेला नाही.

या समितीचा अध्यक्ष नेहमीच सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता असतो, तर तहसीलदार हे सचिव असतात. या समितीला मोठे अधिकार आहेत व निराधारांना आधार देण्यासाठी ही समिती महत्वाची आहे, तरी समितीची नियुक्ती होत नसल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सत्तेत शिवसेना, कांग्रेस व राष्ट्रवादी कांग्रेस हे पक्ष आहेत. नरखेड तालुक्यात राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार असून पालकमंत्री कांग्रेसचे असल्यामुळे समितीच्या नियुक्तीत अडचण येत असल्याची चर्चा नरखेड तालुक्यात जोरात आहे.

तातडीने दखल घ्यावी
वर्षभरापासून संजय गांधी निराधार योजना समितीची नियुक्ती न झाल्यामुळे अनेकांना निराधाराचे जीवन जगावे लागत आहे. त्यांनी विविध योजनेसाठी अर्ज केले आहेत. ते पात्र असून देखील समिती नसल्यामुळे त्यांचे अर्ज मंजूर होऊ शकले नाही. तरी पालकमंत्री यांनी याची तातडीने दखल घेत समिती नियुक्तीची शिफारस जिल्हाधिकारी यांच्याकडे करावी, जेणेकरून गरीब, विधवा, दिव्यांग व अनेक उपेक्षितांना न्याय मिळू शकेल.
अतुल पेठे, तालुकाध्यक्ष राका, नरखेड तालुका

निराधार अर्जाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत
नरखेड तालुक्यात समिती नसल्यामुळे अनेक निराधार अर्जाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. या क्षेत्राचे आमदार मंत्री असून देखील समिती नियुक्त होण्यास वेळ लागत आहे. यामुळे अनेकांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळण्यास विलंब होत आहे. शासनाने निराधारांना आधार देण्याची सध्या मोठी आवश्यकता आहे.
केश चव्हाण, माजी सभापती, जि. प. नागपूर

पात्र लाभार्थ्यांना न्याय देण्यात येईल
नरखेड तालुक्यात ४५० अर्ज अद्यापही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत, हे खरे आहे. पण नुकताच प्रभार घेऊन आढावा घेण्यात आला आहे. अर्जदारांना न्याय मिळावा यासाठी लवकरच सभा घेऊन अर्जाची तपासणी करून पात्र लाभार्थ्यांना न्याय देण्यात येईल.
डी. जी. जाधव, तहसीलदार, नरखेड

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Many people are waiting for list of Sanjay Gandhi Yojana