किलोभर पीठ, किलोभर तांदुळ घेतले उधारीवर, कोरोनामुळे हातातोंडाची भेट कठीण

sushilabai
sushilabai

केवल जीवनतारे
नागपूर : उपराजधानीतील साई मंदिर परिसरात पुजेसाठी येणाऱ्या भक्तांच्या भरोशावर येथील फुलविक्रेंत्यांचे जगणे असते. परंतु कोरोना विषाणूमुळे भक्तांनी साईमंदिराकडे पाठ फिरवली आणि हार, फुले विकणाऱ्यांचे जगणे कठिण झाले आहे. येथील सुशीलाबाईंशी संवाद साधला असता, पाच दिवसात एकही हार विकला गेला नाही, पैसे नसल्याने एक किलो पीठ आणि एक किलो तांदुळ उधारीवर किराना दुकानातून घेतले असल्याची व्यथा मांडली. भरल्या कुटुंबाला फुलांचा आधार आहे, मात्र ही फुले आता सुकून गेली आहेत. पाच-सहा दिवसात कोरोनाने जगण्यातील दाहकता वाढली, असे सांगताना त्या माऊलीचे डोळे पाणावले.

कोरोना विषाणूची दहशत नागपुरात पसरली आहे. यामुळे भक्तही दुर्मिळ झाले. मात्र देवाच्या आधाराने "रस्त्यावरचे आयुष्य' जगणाऱ्यांना दोन वेळचे पोट कसे भरावे ही चिंता आहे. सुशीलाबाई आणि त्यांचा मुलगा साई मंदिर परिसरात हार विकण्याचा व्यवसाय करतात. तीस वर्षात कधी नव्हे अशी परिस्थिती आली आहे. देवाचा धावा करण्यासाठी भक्त मंदिरात येतात, मात्र या कोरोनामुळे पाच दिवसात खडतर आयुष्य जगण्याचा अनुभव आला. पाच दिवसात अत्यंत हालअपेष्टा सोसाव्या लागत आहेत. हातावरचे पोट घेऊन जगणारे आयुष्य किती दाहक आणि सत्त्वपरीक्षा घेणारे असू शकते, याची प्रचिती कोरोनाच्या संकटाने आली. एक मुलगा जग सोडून गेला. दोन स्नूषा, चार मुलं, असा भरला संसार असून या साऱ्यांचा जगण्याचा आधार हे फुलांचे दुकान आहे. मात्र दिवसभरात एकही हार विकला जात नाही. यामुळे कुटुंबावर उपासमारीची पाळी येण्याची भिती आहे. मंगळवारी एक किलो पीठ आणि एक किलो तांदुळ उधारीवर घेतले. गुरूवारी साई मंदिरात गर्दी असते. दहा ते पंधरा हार विक्रेते येथे पोट भरतात, मात्र मंदिरात गर्दी करू नये असा वटहुकूम काढण्यात आल्याने हातवरचे पोट असणाऱ्यांना जगण्याची चिंता सतावत आहे.

अतिक्रमण हटवणारे जगू देत नाही
साई मंदिरात एकच दुकान होते. सर्वात समोर दुकान होते. परंतु दरवेळेस होणाऱ्या अतिक्रमण कारवाईमुळे हळुहळु मागे यावे लागले. आता सर्वात शेवटी दुकान थाटावे लागत असल्याने हारांची विक्री कमी होते. मागील पाच दिवसात एकही हार विकला नाही. कोरोना येईल ही भिती तर आहे, परंतु या संकटाने भुकबळी तर ठरणार नाही, अशी भिती सुशीलाबाईंचा मुलगा प्रकाश हारवाले यांनी व्यक्त केली. यावेळी अनेक हारवाल्यांनी आपल्या व्यथा सांगितल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com