आता कुठल्या निर्णयांवरून आयुक्त मुंढे यांच्यावर संतापले महापौर जोशी ? वाचा

राजेश प्रायकर
Friday, 14 August 2020

शहरातील सर्व व्यापारी व त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांची संख्या ५ लाखापर्यंत आहे. आता सहा दिवसांत ५० लाख चाचण्या कशा करणार? असा सवाल करून आयुक्तांनी शहरातील वातावरण दूषित करू नये, असे आवाहन महापौरांनी केले.

नागपूर : व्यापाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी १८ ऑगस्टपर्यंत करावी, अन्यथा दुकाने बंद करू या आयुक्तांच्या निर्णयावर संताप व्यक्त करीत महापौर संदीप जोशी यांनी या निर्णयाविरोधात प्रसंगी रस्त्यावर उतरणार, असा इशारा दिला.

शहरातील सर्व व्यापारी व त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांची संख्या ५ लाखापर्यंत आहे. आता सहा दिवसांत ५० लाख चाचण्या कशा करणार? असा सवाल करून आयुक्तांनी शहरातील वातावरण दूषित करू नये, असे आवाहन महापौरांनी केले.

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील व्यापाऱ्यांना सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी १८ ऑगस्टपर्यंत करावी अन्यथा दुकाने बंद करू, असे सांगितले आहे. यावर महापौर संदीप जोशी म्हणाले की, शहरात ५० हजार व्यापारी असून प्रत्येकाकडे सरासरी १० कर्मचारी आहेत.

यामुळे १८ ऑगस्टपर्यंत ५ लाख चाचण्या कराव्या लागतील. हे शक्य आहे काय? आयुक्तांचा हा निर्णय अव्यवहार्य नव्हे तर व्यापाऱ्यांसोबतच तुटपुंज्या पगारात घर चालविणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही वेठीस धरणारा आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याची चाचणी दुकानदाराने करण्याचेही निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

दुकानदारांचीही स्थिती नाजूक आहे. ते एवढे पैसे कुठून आणणार. ५ लाख चाचण्या करण्यासाठी १९०० रुपये प्रती चाचणीप्रमाणे ९५ कोटींचा व्यवसाय होईल. आयुक्तांनी शहरात भीतीचे वातावरण निर्माण करू नये. व्यापाऱ्यांशी संवादातूनही मार्ग निघू शकतो.

षडयंत्र! पैसे कमविण्यासाठी कोरोना रुग्णांचा वापर होत आहे का...वाचा सविस्तर

व्यापाऱ्यांकडील एखादा कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यास संपर्कातील इतरांचीही चाचणी हे योग्य आहे. परंतु, सर्व व्यापाऱ्यांना इशारा देणे योग्य नाही. यात कुठलेही राजकारण न करता जनतेसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरणार, असा इशारा महापौरांनी दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mayor Joshi is angry with Commissioner Mundhe over which decisions?