कोरोनामुळे मेट्रोचीही थांबली चाके; उत्पन्नालाही फटका

metro.
metro.
Updated on

नागपूर : गेल्या पाच वर्षात 86 टक्के कामे पूर्ण करणाऱ्या मेट्रोच्या बांधकामाच्या गतीला कोरोनामुळे 'ब्रेक' लागला आहे. गड्डीगोदाम येथील चारस्तरीय पूल तसेच आनंद टॉकीजजवळील रेल्वे ट्रॅकवरून उंच पूलासह अनेक स्टेशनचे बांधकाम बंद आहे. त्यामुळे मेट्रो प्रकल्प पूर्ण होण्याचा कालावधी आणखी वाढणार आहे. एवढेच नव्हे प्रवासी सेवेतून मिळणाऱ्या उत्पन्नालाही फटका बसला आहे.
कोरोनामुळे सर्वच प्रवासी सेवा बंद करण्यात आली आहे. यात मेट्रोही अपवाद नाही. हिंगणा मार्गावर सेवा सुरू केल्यानंतर मेट्रोची प्रवासी संख्या प्रति दिवस 18 हजारांवर गेली होती. यातून एका दिवसाला साडेतीन लाख रुपये उत्पन्नाचा मैलाचा दगडही मेट्रोने पार केला होता. मात्र, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संचारबंदी व लॉकडाऊनमुळे 23 मार्चपासून मेट्रो सेवा बंद करण्यात आली. सुरुवातीला 31 मार्चपर्यंत, त्यानंतर 14 एप्रिलपर्यंत व आता 3 मेपर्यंत प्रवासी सेवा बंद राहणार आहे. गेल्या एकवीस दिवसांपासून मेट्रो सेवा बंद असल्याने मेट्रोचे दररोजचे साडेतीन लाख रुपये, असे एकूण 73.5 लाखांचे उत्पन्न बुडाले. याशिवाय महामेट्रोने मजूर व कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मेट्रोची प्रमुख कामेही बंद केली. गड्डीगोदाम येथे चार मजली उड्डाणपूल तयार करण्यात येत आहे. देशातील स्थापत्य कलेचे अद्‌भूत उदाहरण ठरणाऱ्या या पूलाचे काम फेब्रुवारीत सुरू करण्यात आले. परंतु काम सुरू झाल्यानंतर दीड महिन्यांमध्येच कोरोनाच्या संकटामुळे तूर्तास काम बंद आहे. याशिवाय सिताबर्डी ते प्रजापतीनगरपर्यंत मेट्रो ट्रॅकवर आनंद टॉकीजजवळ देशातील सर्वाधिक 231 मीटर लांबीचा अत्याधुनिक पूल बांधण्यात येत आहे. या पूलाचेही बांधकाम बंद करण्यात आले आहे. याशिवाय वर्धा रोडवरील अजनी, रहाटे कॉलनी, छत्रपती चौक या स्टेशनचे तर हिंगणा मार्गावरील एलएडी कॉलेज, शंकरनगर आणि रचना रिंग रोड या मेट्रो स्टेशनची कामेही रखडली. ही प्रमुख कामे रखडल्याने मेट्रो प्रकल्प पूर्ण होण्याचा कालावधी आणखी वाढणार आहे. त्यामुळे नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याच्या महामेट्रोच्या संकल्पाला सुरुंग लागला आहे.

खर्चालाही आळा
राज्य सरकारने 2020-21 या आर्थिक वर्षात नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी 245.34 कोटींची तरतूद केली. यातील 44.55 कोटी इक्विटीच्या स्वरुपात तर 200.79 कोटी कर्जाच्या स्वरुपात मेट्रोला मिळणार आहे. मात्र कोरोनामुळे लॉकडाऊन वाढण्याचीच शक्‍यता आहे. या तरतुदीतून होणाऱ्या खर्चालाही ब्रेक लागणार आहे.

3 मेपर्यंत प्रवासी सेवा बंद
कोरोना विषाणूचा प्रकोप बघता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढविला. या लॉकडाऊनमुळे वर्धा मार्गावरील सिताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशन आणि हिंगणा मार्गावरील सिताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्यनगर मेट्रो स्टेशनदरम्यान प्रवासी सेवा 3 मेपर्यंत बंद राहणार असल्याचे महामेट्रोने नमुद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com