मंत्री म्हणाले निलंबित करा, सचिवांनी बजावली नोटीस... वाचा काय आहे प्रकरण

नीलेश डोये
शुक्रवार, 5 जून 2020

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र राज्य अधिकारी, कर्मचारी संघटनेने निलंबनाच्या कारवाईला विरोध दर्शवित प्रथम चौकशी करण्याची मागणी केली होती.

नागपूर : निकृष्ट धान्य पुरवठाप्रकरणी अन्न पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दोन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना (डीएसओ) निलंबित करून चौकशी करण्याचे आदेश दिले होते. सचिवांनी दोन्ही अधिकाऱ्यांना कारण दाखवा नोटीस बजावली. या प्रकरणी नाशिकचे अधिकारीही अडचणीत येण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

 
नाशिक येथे तपासणीदरम्यान अन्न पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी तांदूळ निकृष्ट असल्याचे निदर्शनास आले. संताप व्यक्त करीत त्यांनी तांदूळ पुरवठा केलेल्या गडचिरोली आणि नागपूर येथील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दोषी धरत निलंबनाचे आदेश दिले होते. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र राज्य अधिकारी, कर्मचारी संघटनेने निलंबनाच्या कारवाईला विरोध दर्शवित प्रथम चौकशी करण्याची मागणी केली होती.

हेही वाचा :  सोशल मिडीयावर भिडले मनपा आयुक्त आणि पोलीस आयुक्तांचे समर्थक

अन्न पुरवठा विभागाचे सचिव यांनी संघटनेची मागणी मान्य करीत न्यायभूमिकेने थेट निलंबन करता प्रथम चौकशीचे आदेश दिले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गडचिरोलीवरून तांदूळ नागपूरच्या एफसीआय गोदामात आणल्या गेला. येथून नाशिकला हा तांदूळ रवाना झाला. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तांदूळ जाताना संबंधित जिल्ह्यांमधील विभागातील अधिकारी उपस्थित असतात. नागपूरवरून नाशिकला तांदूळ पाठविताना तेथील अधिकारी हजर होते. शिवाय त्यांच्याकडून पुरवठा अधिकाऱ्यांकडून मालाची तपासणी होणे आवश्‍यक आहे. माल निकृष्ट असल्यास तत्काळ त्याची नोंद करणे आवश्‍यक आहे. नाशिकच्या दोन्ही अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य योग्यरित्या बजावले नसल्याचे सांगण्यात येते. यामुळे नाशिकचे अधिकारीही या प्रकरणी अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The minister said suspended, the secretary issued a notice