मृगया चिन्हाचे संग्रहालय आता नागपुरात होणार...प्रस्ताव तयार करण्याची वनमंत्र्यांची सूचना

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जून 2020

मृगया अर्थात शिकार झालेल्या प्राणी, पक्ष्यांच्या चिन्हांचे वैज्ञानिकदृष्ट्या जतन व्हावे याकरिता वनविभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. द हेरिटेज कंझर्वेशन सोसायटी आणि वनविभागाच्या पुढाकाराने या वन्यजीवांच्या मृगया चिन्हावर आता यापुढे प्रक्रिया होणार आहे.

नागपूर :  वन्यजीवांच्या मृगया चिन्हांचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील संग्रहालय नागपुरात उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्याची सूचना वनमंत्री संजय राठोड यांनी नुकतीच दिली आहे. सेमिनरी हिल्स परिसरात असलेल्या प्रयोगशाळेत मृत वन्यजीवांवर प्रक्रिया करून मृगया चिन्हांच्या जपणुकीला सुरुवात झाली आहे. त्या प्रयोगशाळेला वनमंत्र्यांनी नुकतीच भेट दिली. वनमंत्र्यांनी सर्व वैज्ञानिक प्रक्रियेबाबत जाणून घेतले. हा ऐतिहासिक वारसा आपल्याला जपायला हवा त्यासाठी जी शासकीय मदत लागेल ती करायच्या सूचना त्यांनी दिल्या.

रासायनिक प्रक्रिया करण्याच्या सूचना

महाराष्ट्रातील वन विभागाच्या इतर ठिकाणी ज्या ट्रॉफी आहेत त्यासुद्धा लवकरात लवकर इथे आणून त्यावर रासायनिक प्रक्रिया करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. द हेरिटेज कंझर्वेशन सोसायटीच्या संचालिका लीना झिलपे-हाते, व्यवस्थापकीय संचालक, एनआरएलसी, (सेवानिवृत्त) भारत सरकारचे डॉ. बी. व्ही. खरवडे, मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांनी प्रकल्पाची माहिती दिली.

हे होते उपस्थित

राज्याचे वनबलप्रमुख सुरेश गैरोला, एफडीसीएमचे व्यवस्थापकीय संचालक एन. रामबाबू, मुख्य वन्यजीव रक्षक नितिन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक साईप्रकाश, प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. के. राव, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक शैलेश टेंभुर्णीकर, मुख्य वनसंरक्षक पी. कल्याणकुमार, नागपूर वन विभागाचे उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्‍ला, सहायक वनसंरक्षक सुरेंद्र काळे, वनपरिक्षेत्र अधिकारी विजय गंगावणे यावेळी उपस्थित होते.

अवश्य वाचा- मुलांच्या डोक्यात पब्जीचा विषाणू; अनेकांची हरविली झोप

चिन्हांचे वैज्ञानिकदृष्ट्या जतन

मृगया अर्थात शिकार झालेल्या प्राणी, पक्ष्यांच्या चिन्हांचे वैज्ञानिकदृष्ट्या जतन व्हावे याकरिता वनविभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. द हेरिटेज कंझर्वेशन सोसायटी आणि वनविभागाच्या पुढाकाराने या वन्यजीवांच्या मृगया चिन्हावर आता यापुढे प्रक्रिया होणार आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mrigaya symbol museum will now be in Nagpur