महावितरण ग्राहकांच्या पाठीशी, बिल भरण्यासाठी केली ही सोय...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जून 2020

लॉकडाउनच्या कालावधीत मीटर रीडिंग बंद असल्याने ग्राहकांना सरासरी युनिटचे वीजबिल पाठविण्यात आले. या काळात वेबपोर्टल व मोबाईल ऍपद्वारे स्वतःहून मीटर रीडिंग पाठविणाऱ्या ग्राहकांना प्रत्यक्ष वीजवापरानुसार बिल देण्यात आले. मात्र, एप्रिल, मे, जून महिन्यांत स्वतःहून रीडिंग न पाठविणाऱ्या वीजग्राहकांना आता मीटर रीडिंग घेतल्यानंतर अचूक व प्रत्यक्ष वीजवापरानुसार बिल पाठविण्यात येत आहे.

नागपूर : वीजग्राहकांनो दोन-अडीच महिन्यांचे एकत्रित वीजबिल आल्यास घाबरू नका, अशी भावनिक गळ महावितरणने घातली आहे. वीजबिल एकत्र आले तरी भरलेल्या रकमेचे समायोजन होणार असून, एकूण वापरेलल्या युनिटची मासिक विभागणी करून ग्राहकांना स्लॅब बेनिफिट दिले जाणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.

लॉकडाउनच्या कालावधीत मीटर रीडिंग बंद असल्याने ग्राहकांना सरासरी युनिटचे वीजबिल पाठविण्यात आले. या काळात वेबपोर्टल व मोबाईल ऍपद्वारे स्वतःहून मीटर रीडिंग पाठविणाऱ्या ग्राहकांना प्रत्यक्ष वीजवापरानुसार बिल देण्यात आले. मात्र, एप्रिल, मे, जून महिन्यांत स्वतःहून रीडिंग न पाठविणाऱ्या वीजग्राहकांना आता मीटर रीडिंग घेतल्यानंतर अचूक व प्रत्यक्ष वीजवापरानुसार बिल पाठविण्यात येत आहे.

हे वीजबिल लॉकडाऊन कालावधीतील दोन-अडीच महिन्यांचे असले तरी संगणकीय प्रणालीद्वारे बिलाची मासिक वापरानुसार विभागणी करून युनिट व स्लॅबप्रमाणे वीजदर लावून (स्लॅब बेनिफिटसह) देण्यात येत आहे. उदा. दोन महिन्यांचे वीजबिल 330 युनिट असल्यास 330 युनिटचा स्लॅब दर न लावता मासिक प्रत्येकी 165 युनिटप्रमाणे स्लॅब दर लावण्यात येत आहे. तसेच एप्रिल व मे महिन्यातील सरासरी युनिट व बिलाची रक्कम भरली असल्यास फिक्‍स चार्जेस, विद्युत शुल्क वगळून उर्वरित रकमेचे समायोजन करण्यात येत आहे. यासंबंधीची माहिती ग्राहकांसाठी संबंधित वीजबिलामध्ये नमूद करण्यात येत आहे.

अवश्य वाचा- नदीपात्रात सुरू होते अंत्यसंस्कार, अचानक आला पाण्याचा लोंढा आणि...

लॉकडाऊनच्या कालावधीत वीज मीटरचे रीडिंग व बिल वितरण थांबविण्यात आले होते. स्थानिक प्रशासनाची परवानगी मिळताच महावितरणने प्रतिबंधित क्षेत्र वगळून अन्य भागात मीटर रीडिंग व वीजबिल वितरणाचे काम कोरोना प्रतिबंधित क्षेत्र वगळून सुरू केले आहे. एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी मीटर रीडिंग घेताना हॅण्ड ग्लोव्हज, मास्क, सॅनिटाजर तसेच फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच सोसायट्यांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आवश्‍यक असल्यास परवानगी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे. 23 मार्चनंतर आता मीटर रीडिंग घेऊन प्रत्यक्ष वीजवापरानुसार दोन ते अडीच महिन्यांचे एकच अचूक वीजबिल दिले जात आहे. एप्रिल, मे महिन्यात भरणा केलेली रक्कम व सरासरी युनिट समायोजित केले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MSEDCL will pay the bill by dividing the used units