मुंढेंच्या संकटात भर, नगरसेविका का जाणार पोलिसांत? वाचा सविस्तर

राजेश प्रायकर
Saturday, 29 August 2020

माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भाजपने चरित्रहननाचा आरोप केला. मात्र, भाजपने रस्त्यावर तसेच सभेतही त्यांच्याविरोधात जी भूमिका घ्यायची होती, ती घेतली. अशा पद्धतीने चरित्रहनन करण्याची भाजपला गरज नाही, असे नमूद करीत उपमहापौर मनीषा कोठे यांनी मुंढे यांची महिलांबाबतची मानसिकता दिसून येत असल्याची टिका केली.

नागपूर : शहरातील महिलांबाबत घाणेरडे आरोप केल्याने माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकटात पुन्हा भर पडली आहे. कुठल्या महिलेने, केव्हा आयुक्तांपुढे कपडे फाडले, याबाबत २४ तासांत खुलासा करावा, अन्यथा त्यांच्याविरोधात भाजपच्या नगरसेविका तसेच महिला आघाडीच्या पदाधिकारी पोलिसांत तक्रार दाखल करणार, असा इशारा उपमहापौर मनीषा कोठे यांनी आज दिला.

माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भाजपने चरित्रहननाचा आरोप केला. मात्र, भाजपने रस्त्यावर तसेच सभेतही त्यांच्याविरोधात जी भूमिका घ्यायची होती, ती घेतली. अशा पद्धतीने चरित्रहनन करण्याची भाजपला गरज नाही, असे नमूद करीत उपमहापौर मनीषा कोठे यांनी मुंढे यांची महिलांबाबतची मानसिकता दिसून येत असल्याची टिका केली.

आयुक्त असताना मुंढे कुणालाही भेटत नव्हते. एखाद्या वेळेस कुणी भेटले तर त्याची संपूर्ण नोंद असते. त्यामुळे ज्या महिलेने कपडे फाडले, त्यांचे नाव, पत्ता २४ तासांत द्यावा. एवढेच नव्हे तर मुंढे यांच्या निवासस्थानी, कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहे. ज्या दिवशी ही घटना घडली, त्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेजही २४ तासांत द्यावे, अन्यथा महिलेचे चरित्रहनन केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येईल, असा इशारा उपमहापौर मनीषा कोठे यांनी दिला.

आयुक्त मुंढेच्या बदलीसाठी कोणी केला समझोता?, वाचा सविस्तर

स्मार्ट सिटी कंपनीतील गर्भवती महिलेला त्रास दिल्याची महिला आयोगाकडे मुंढेची तक्रार आहे. यावर अंतिम सुनावणी अपेक्षित आहे. एवढेच नव्हे नागपूर जिल्हा परिषदेतील एका महिलेने मुंढे यांच्यावर लैंगिक छळाची तक्रार दाखल केली. यातून मुंढे यांचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोनच वाईट असल्याचा आरोपही कोठे यांनी केला. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, नगरसेविका दिव्या धुरडे, वर्षा ठाकरे, प्रगती पाटील यावेळी उपस्थित होत्या.

मुंढेंनी पोलिसांत तक्रार का केली नाही?
एखाद्या महिलेने त्यांच्या चरित्रहननाचा प्रयत्न केला तर त्याचवेळी त्यांनी पोलिसांत तक्रार का केली नाही? असा सवाल दयाशंकर तिवारी यांनी केला. मुंढे यांनी थेट भाजपचेच नाव घेतले. त्यामुळे आता भाजप नगरसेविका त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करेल, असे ते म्हणाले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mundhe in trouble, what is the reason? read detailed