मतलब निकल गया तो पहचानते नहीं...! भाड्याचे पैसे मागताच मनपाने ॲम्बुलन्स केल्या बंद

राजेश प्रायकर
Tuesday, 3 November 2020

ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये शहरात कोव्हीड रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले होते. रुग्णालयात वेळीच दाखल न झाल्याने अनेकांचा मृत्यू झाला. अखेर महापालिकेने रुग्णांना तत्काळ मदत मिळावी, या हेतूने भाड्याने ॲम्बुलन्स घेण्याचे ठरविले. परंतु शहरातील विविध ॲम्बुलन्समालक व चालकांनी एकत्र येऊन महापालिकेला नकार दिला. त्यामुळे महापालिकेने आरटीओला विनंती केली. आरटीओने स्कूलबसच्या मालकांना विनंती केली.

नागपूर : कोव्हीड रुग्णांंना तत्काळ रुग्णालयांत दाखल करता यावे, यासाठी महापालिकेने ॲम्बुलन्स भाड्याने घेतल्या होत्या. सप्टेंबरपासून भाड्याने घेतलेल्या ॲम्बुलन्सचे भाडे मागताच महापालिकेने मालकांना बाहेरचा रस्ता दाखवला. १ नोव्हेंबरपासून या ॲम्बुलन्स बंद करण्यात आल्या असून, आता ॲम्बुलन्समालक भाड्याच्या पैशावरून चिंतित आहेत. विशेष म्हणजे शहरातील ॲम्बुलन्सधारकांनी एकत्र येऊन महापालिकेला नकार दिल्यानंतर स्कूलबसचे ॲम्बुलन्समध्ये रूपांतर करून या ॲम्बुलन्समालकांनी महापालिकेला मदत केली होती. 

ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये शहरात कोव्हीड रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले होते. रुग्णालयात वेळीच दाखल न झाल्याने अनेकांचा मृत्यू झाला. अखेर महापालिकेने रुग्णांना तत्काळ मदत मिळावी, या हेतूने भाड्याने ॲम्बुलन्स घेण्याचे ठरविले. परंतु शहरातील विविध ॲम्बुलन्समालक व चालकांनी एकत्र येऊन महापालिकेला नकार दिला. त्यामुळे महापालिकेने आरटीओला विनंती केली. आरटीओने स्कूलबसच्या मालकांना विनंती केली. त्यामुळे स्कूलबसचे रूपांतर ॲम्बुलन्समध्ये करून या सर्वांनी महापालिकेच्या मदतीसाठी पुढाकार घेतला.

महापालिकेने प्रतिदिवस १७०० रुपये भाडे निश्चित केले. ॲम्बुलन्स दिवसातून २५ किमी धावल्यास १७०० रुपये तर २५ किमीवर धावल्यास प्रतिकिमी दहा रुपये अधिकचे देण्याचेही ठरले. १ सप्टेंबरपासून शहरातील दहाही झोनमध्ये महापालिकेने ॲम्बुलन्स सुरू केल्या. चार महिन्यांपासन बेरोजगार असूनही या ॲम्बुलन्समालकांनी डिझेल व चालकांचा खर्च स्वतःच्या खिशातून केला. गेल्या दोन महिन्यांत कोव्हीडच्या काळात या ॲम्बुलन्समालकांनी महापालिकेची मदत केली. महिना झाल्यानंतर ॲम्बुलन्समालकांनी भाड्यासाठी महापालिकेकडे विचारणा केली.

अर्धवट सिमेंट रस्त्यांचे नागपूरकरांना धक्के

त्यावेळी टाळाटाळ करण्यात आल्याचे एका ॲम्बुलन्समालकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. वाहनचालकाचे वेतन, दररोजचे लागणारे डिझेलसाठी पैशाची गरज असल्याने भाड्यासाठी ॲम्बुलन्समालकांनी तगादा लावला. अखेर महापालिकेने दोन महिने ॲम्बुलन्स वापरल्यानंतर काल, १ नोव्हेंबरपासून बंद केल्या. आता दोन महिन्यांचे २५ ॲम्बुलन्समालकंचे दोन महिन्यांचे भाडे थकीत आहे. कोव्हीड काळात शाळा बंद असल्याने आर्थिक संकटात असूनही स्कूलबसचे ॲम्बुलन्समध्ये रूपांतर करून मदत करणाऱ्या या ॲम्बुलन्स चालकांनाच बाहेरचा रस्ता दाखविल्याने महापालिका प्रशासन व सत्ताधाऱ्यांविरोधात रोष निर्माण झाला आहे.

 २२ लाख थकविले
महापालिकेने कोव्हीड काळात ५३ दिवस या ॲम्बुलन्सचा वापर केला. एका दिवसाला एका ॲम्बुलन्सचे १७०० रुपये याप्रमाणे ५३ दिवसांचे ९० हजार रुपये एका मालकाचे थकीत आहे. एकूण २५ ॲम्बुलन्सचे एकूण २२ लाख ५२ हजार थकीत असल्याचे एका ॲम्बुलन्समालकाने सांगितले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: municipal corporation stopped the ambulance after asking for rent