कोण म्हणाले, आयुक्त मुंढेच्या हेकेखोरपणामुळे महापालिका बदनाम ?

Municipal Corporation was discredited due to the stubbornness of Commissioner Mundhe
Municipal Corporation was discredited due to the stubbornness of Commissioner Mundhe

नागपूर : आयुक्त व पदाधिकारी संवाद नसल्याने शहराचे नुकसान होत आहे. शहरातील पावसाळ्यातील उपाययोजनांची कामे रखडली असून नागरिक नगरसेवकांवर रोष व्यक्त करीत आहेत. लोकप्रतिनिधींवर प्रशासन गुन्हे दाखल करीत असेल तर सर्वांनी मिळून अशा अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे. दीडशे वर्षे जुन्या संस्थेचे नाव आज एका हेकेखोर व्यक्तीमुळे बदनाम होत आहे, अशा शब्दात आज नगरसेवकांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांना टोला लगावला. त्याचवेळी अनेक नगरसेवकांनी मिळवून कामे करण्याचे आवाहन करीत आयुक्तांना संवादासाठी साद दिली. 

महापालिकेची शनिवारी स्थगित करण्यात आलेली सभा आज दुपारी रेशीमबागेतील सुरेश भट सभागृहात पुन्हा सुरू झाली. शनिवारी कॉंग्रेसचे नगरसेवक नितीन साठवणे व शिवसेनेच्या नगरसेविका मंगला गवरे यांनी आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर चर्चेसाठी स्थगन प्रस्ताव दिला होता. बहुमताने चर्चेसाठी मंजूर साठवणे व गवरे यांच्या प्रस्तावावर नितीन साठवणे यांनी बोलण्यास सुरुवात केली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रतिबंधित करण्यात आलेल्या सतरंजीपुऱ्यातील नागरिकांना वेठीस धरण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

पत्नी गर्भवती होती, प्रसूतीसाठी रुग्णालयात नेताना पोलिसांशी वाद घालावा लागला. पोलिस यावेळी आयुक्तांचे आदेश असल्याचे सांगत होते. ओळख दाखविल्यानंतर पोलिसांनी परवानगी दिली. रुग्णालयात दाखल करताच तासाभरात प्रसूती झाली. नगरसेवकांना अशा पद्धतीने कोरोनाच्या नावावर वागणूक दिली गेली तर सामान्य जनतेचे काय? असा सवाल करीत आयुक्तांनी गुन्हा दाखल करण्याचे अधिकाऱ्यांना सांगितले, अशी आयुक्तांची कार्यपद्धती असल्याचे सांगितले.

भाजपचे डॉ. छोटू भोयर यांनी कोरोनासंदर्भात केलेल्या उपाययोजनांबाबत पोलिस, आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले. मात्र, सारे काही एकटाच करतो, हे चालणार नाही, असा इशारा देत सर्वांना सोबत घेऊनच काम करावे लागेल, या सूचनेसह त्यांनी आयुक्तांवर रोष व्यक्त केला. लोकप्रतिनिधींवर गुन्हा दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांवरच गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, असा संतापही त्यांनी व्यक्त केला. स्थानिक नागरिकांचे प्रश्‍न सुटावे या हेतूने स्थानिक स्वराज्य संस्था घटनेत असल्याचे नमूद करीत ही व्यवस्थाच मी एकटा चांगला व बाकी वाईट या कार्यपद्धतीमुळे नाकारली जात असल्याचे अविनाश ठाकरे म्हणाले.

कुणाशीही संवाद साधायचा नाही, ही बाब योग्य नसून आज दीडशे वर्षे जुनी संस्था हेकेखोर व्यक्तीमुळे बदनाम होत आहे, असा टोला त्यांनी आयुक्तांना लगावला. त्याचवेळी त्यांनी आयुक्तांना संवादासाठी सादही घातली. चर्चेत पुरुषोत्तम हजारे, किशोर जिचकार, दिनेश यादव, आईशा उईके, जुल्फीकार भुट्टो, जितेंद्र घोडेस्वार, मनोज चाफले, मनोज सांगोळे, दीपक चौधरी, हर्षला साबळे, उज्ज्वला बनकर, स्नेहा निकोसे, सुनील हिरणवार, मनोज गावंडे, प्रमोद चिखले, प्रणिती शहाणे यांनीही चर्चेत भाग घेतला. 

आयुक्तांच्या सभात्यागामुळे नगरसेवक वाईट 
आयुक्तांच्या सभात्यागामुळे नागपूरकर नगरसेवकांकडे वाईट नजरेने बघत असल्याचे प्रगती पाटील यांनी सांगितले. नगरसेवक स्वतःची नव्हे तर जनतेची कामे घेऊन आयुक्तांकडे येतात. त्यामुळे नगरसेवकांना वेळ द्यावी. पदाधिकारी व प्रशासनात संवाद हवा, असेही त्या म्हणाल्या. प्रशासन संवाद साधत नसेल तर नगरसेवकांनी कामे कशी करायची? असा सवाल कॉंग्रेसच्या दर्शनी धवड यांनी उपस्थित केला. 

"मीपणा'मुळे नको ते घडले 
प्रकाश भोयर यांनी आयुक्तांच्या मीपणामुळे शनिवारी नको ते घडले, असे सांगितले. विलगीकरण केंद्रात सुविधा नसताना लोकांना अक्षरशः कोंबण्यात आल्याचा आरोप करीत आयुक्तांच्या कार्यप्रणालीवर परिणिती फुके यांनी बोट ठेवले. वैद्यकीय आणीबाणीच्या काळात महापौर व इतर सदस्यांना विचारले जात नाही, त्यामुळे राजकीय आणीबाणीचेही चित्र दिसत असल्याचे यशश्री नंदनवार म्हणाल्या. 

साठवणेंच्या पाठीमागे सभागृह 
नितीन साठवणे यांच्यावर प्रशासनाने शासकीय कामात अडथळा निर्माण करीत असल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल केला. यावरून अनेक सदस्यांनी प्रशासनावर टीका केली. शनिवारी ज्याप्रमाणे आयुक्तांना राग आला, त्याचप्रमाणे साठवणे यांना राग येऊ शकत नाही काय? असा सवाल करीत सर्वच सदस्यांनी त्यांच्यावरील गुन्हा मागे घेण्याची मागणी केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com