रात्रीच्या अंधारात ते भेटले, राजाला लागली कुणकुण आणि क्षणात झाले होत्याचे नव्हते

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 फेब्रुवारी 2020

रोशनने राजा आणि त्याच्या मित्रांवर चाकू उगारला. अगोदरच रागात असलेल्या राजाने मागेपुढे न पाहता चाकू हिसकावून घेतला आणि रोशनवरच घाव घातले. राजाच्या मित्रांनीसुद्धा दगडाने घाव घालणे सुरू केले. घटनास्थळावरच रोशनचा मृत्यू झाला.

नागपूर : बहिणीला परपुरुषासोबत बघून चिडलेल्या भावाने मित्रांच्या मदतीने तिच्या प्रियकराची चाकू व दगडाचे घाव घालून हत्या केली. गुरुवारी रात्री घडलेल्या या घटनेने मिनिमातानगरात एकच खळबळ उडवून दिली. कळमना पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे.

रोशन चौरसिया (27) रा. भिलगाव, वाठोडा असे मृताचे नाव आहे. या प्रकरणात राजा भारती (20) रा. मिनिमातानगर, पाच झोपडा याला अटक करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, गुंडप्रवृत्तीच्या रोशनचे राजाच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. परंतु, दोघांमध्ये विसंवाद निर्माण झाल्याने काही दिवसांपासून त्यांचे आपसात बोलणे बंद होते. गुरुवारी रात्री रोशन हा मिनिमातानगरातील पाच झोपडा परिसरात गेला. त्याला बघून राजाची बहीण घराबाहेर पडली. जवळच्याच घासीराम मंदिर परिसरात दोघेही भेटले. अंधाऱ्या भागात दोघेही बोलत बसले होते.

सविस्तर वाचा - महापौर संदीप जोशींसह वीस जणांविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट

रात्री बराच उशीर होऊनही बहीण घरात दिसत नसल्याने राजाला संशय आला. त्याने मित्र आकाश मेहता याला सोबत घेऊन बहिणीला शोधणे सुरू केले. दोघेही घासीराम मंदिर परिसरात असल्याची कुणकूण राजाला लागली. रात्री 11 वाजताच्या सुमारास तो आकाशसह अन्य मित्रांना सोबत घेऊन तिथे गेला. बहिणीसह रोशनलाही हटकले. या प्रकाराने रोशन संतापला. दोघांमध्ये बाचाबाची झाली. स्थानिकांच्या दाव्यानुसार रोशनने राजा आणि त्याच्या मित्रांवर चाकू उगारला. अगोदरच रागात असलेल्या राजाने मागेपुढे न पाहता चाकू हिसकावून घेतला आणि रोशनवरच घाव घातले. राजाच्या मित्रांनीसुद्धा दगडाने घाव घालणे सुरू केले. घटनास्थळावरच रोशनचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

या घटनेची माहिती मिळताच कळमना पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. कळमना पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत राजाला अटक केली. आकाशलासुद्धा ताब्यात घेण्यात आल्याची माहिती असून अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder by brother of sister''s lover