नागपुरात हत्याकांडांची मालिका; तडीपार गुंडाचा खून 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जून 2020

नितेशने रंगदारी दाखवत लोकेशच्या कानशिलात लगावली होती आणि गेम करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे लोकेश चिडून होता. आपला गेम होण्याची भीतीसुद्धा लोकेशच्या मनात होती. 

नागपूर : गुन्हेगारी जगतात सक्रिय असलेल्या एका कुख्यात तडीपार गुंडाचा पाच ते सहा आरोपींनी तलवारीने भोसकून खात्मा केला. हे हत्याकांड परिसरातील गुन्हेगारीतील वर्चस्वातून झाल्याची माहिती आहे. आरोपींमध्ये लोकेश शाहूच्या गॅंगचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. हे हत्याकांड आज भरदुपारी कळमन्यात घडले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितेश मुलचंद पटले (वय 34, रा. जामनगर, कळमना) असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे. नितेश पटले याच्याविरुद्ध शहरातील अनेक पोलिस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारी जगतातील त्याचे वर्चस्व पाहता पोलिसांनी मे 2019 मध्ये नितेशला शहरातून तडीपार केले होते. तो कन्हान शहरात तडीपारी कापत होता. दरम्यान, नितेशने कन्हानमध्ये एका युवकाचा खून केला. या हत्याकांडात पोलिसांनी त्याला अटक करून कारागृहात पाठवले होते. 

तो दहा दिवसांपूर्वीच जेलमधून सुटून आला होता. तडीपार असल्यामुळे पोलिस नितेशच्या घरावर नजर ठेवून होते. त्यामुळे तो वारंवार आपल्या राहण्याचे ठिकाण बदलत होता. जेलमधून सुटून आल्यानंतर त्याने लोकेश शाहूसोबत परिसरातील वर्चस्वावरून वाद घातला. नितेशने रंगदारी दाखवत लोकेशच्या कानशिलात लगावली होती आणि गेम करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे लोकेश चिडून होता. आपला गेम होण्याची भीतीसुद्धा लोकेशच्या मनात होती. 

जुगारात झाला वाद 
गुरुवारी दुपारी नितेश, लोकेश आणि अन्य जुगारी पत्ते खेळत होते. यामध्ये हारजीतवरून नितेश आणि लोकेश यांच्यात वाद झाला. नितेशने लोकेशला मारहाण केली. लोकेशने जीव घेण्याच्या भीतीपोटी तलवार आणि चाकूने नितेशवर हल्ला केला. त्यानंतर लोकेशच्या साथीदाराने नितेशला रक्‍तात लोळवून खात्मा केला. 

हेही वाचा : Breaking : कॉंग्रेसच्या नेत्याने केली महिलेची फसवणूक; वाचा सविस्तर...

तीन तलवारी जप्त 
हत्याकांड घडताच कळमना आणि पारडी पोलिस लगेच घटनास्थळाव पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळावरून तीन तलवारी जप्त केल्या. गुन्हे शाखेचे पथकही घटनास्थळवर पोहोचले. कळमना पोलिस ठाण्यात हत्याकांडाचा गुन्हा दाखल करण्यात आला. कळमना पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder of a young man