esakal | पैशाच्या देवाणघेवाणीचा वाद विकोपाला, कन्हानमध्ये सात जणांनी केले हे क्रूर कृत्य

बोलून बातमी शोधा

Murder of a young man with a knife due to old enmity

गुन्ह्यातील फरार मुख्य आरोपी वीरेंद्र जगतपाल चौहान (वय28, कांद्री) आणि अटकेतील आरोपी वीरेद्र कल्लू नायक (वय28, खदान) यांचा राजू कश्‍यपसोबत गेल्या काही दिवसांपासून पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद सुरू होता.

पैशाच्या देवाणघेवाणीचा वाद विकोपाला, कन्हानमध्ये सात जणांनी केले हे क्रूर कृत्य
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

टेकाडी (जि. नागपूर) : पैशांच्या देवाणघेवणीतून निर्माण झालेल्या आठवड्याभराच्या वैमनस्यातून चाकूने वार करून 35 वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली. ही घटना सोमवारी रात्री 11 च्या सुमारास कांद्री शिवारात असलेल्या इंडियन बॅंक ऑफ इंडियासमोर घडली. राजू शीतल कश्‍यप असे मृताचे तर वीरेंद्र कल्लू नायक असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. गुन्ह्यातील इतर सहा आरोपी अद्याप फरार आहेत.

घटनेनंतर जखमी राजू कश्‍यप याला नागरिकांनी रुग्णालयात नेत असताना अतिरक्तस्त्रावाने त्याचा मृत्यू झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्ह्यात असलेल्या आरोपींची गुन्हे जगतातील पार्श्वभूमी असून, प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्‍यता आहे. अकरम खान छोटे खान आणि राजू शीतल कश्‍यप दोघेही वेकोलि कोळसा खाणअंतर्गत येणाऱ्या लोकेश जैन या कंत्राट कंपनीमध्ये कार्यरत होते.

पत्नीने केली पतीची हत्या आणि मुलाने फोडली बापाच्या खुनाला वाचा

गुन्ह्यातील फरार मुख्य आरोपी वीरेंद्र जगतपाल चौहान (वय28, कांद्री) आणि अटकेतील आरोपी वीरेद्र कल्लू नायक (वय28, खदान) यांचा राजू कश्‍यपसोबत गेल्या काही दिवसांपासून पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद सुरू होता. सतत सुरू असलेले भांडण विकोपाला गेले. सोमवारी (ता.1) रात्री अकराच्या सुमारास राजू आणि फिर्यादी हे दोघेही दुचाकीने कामावरून जवाहरलाल नेहरू रुग्णालयामार्गे परत येते होते.

दरम्यान इंडियन बॅंक ऑफ इंडियासमोर सात आरोपींनी त्यांची दुचाकी थांबवून त्याच्यावर तलवार, चाकू आणि लाथा बुक्‍क्‍यांनी वार करून त्याला जबर जखमी केले. त्याला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. राजूसोबत असलेला युवक अकरम खान छोटे खान याने राजू कश्‍यप याला नागरिकांच्या मदतीने तत्काळ नजीकच्या जवाहरलाल नेहरू रुग्णालयात नेले. त्यानंतर कामठी येथे हलविण्यात आले.

अतिरक्तस्त्रवाने वाटेतच त्याचा मृत्यू झाला. हत्येची बातमी परिसरात पसरताच काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. कन्हान पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळावर पोहचून जमावाला शांत केले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय कामठी येथे रवाना केला.

घटनेच्या काही तासातच पोलिसांनी आरोपी वीरेंद्र कल्लू नायक (वय28, खदान) याला अटक करून फरार मुख्य आरोपी वीरेंद्र जगतपाल चौहान, रघुवेंद्र जगतपाल चौहान, सूरज चौहान यांच्यावर।गुन्हा दाखल केला असून, सोबत असलेल्या इतर अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, डीवायएसपी संजय पुज्जलवार यांनी घटनास्थळाची पाहणी करून आरोपींचा शोध घेण्याचे निर्देश दिले. गुन्ह्याच्या तपास पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांच्याकडे आहे. बातमी लिहिस्तोवर इतर आरोपींना अटक झाली नव्हती.
 


इतर आरोपींना लवकरच ताब्यात घेऊ
गुन्ह्यातील आरोपी गुन्हेगारी वृत्तीचे आहेत. त्यांच्यातील काहींवर गुन्हे दाखल आहेत. पैशांच्या देवाणघेवाणीतून निर्माण झालेल्या वादातून ही हत्या झाली. एका आरोपीला अटक करण्यात आली. इतर सहा आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. घटनास्थळावरील बॅंकेचे सीसीटीव्ही तपासले असता त्यात गुन्हा घडत असतानाचा घटनाक्रम आलेला नाही. इतर आरोपींना लवकरात लवकर अटक करू.
संजय पुज्जलवार, डीवायएसपी