सलून व्यावसायिक करणार 'माझे दुकान, माझी मागणी' आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जून 2020

शनिवारपासून सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सलून व्यावसायिक आपआपल्या दुकानांसमोर बसून आंदोलन करणार आहेत. यावेळी काळ्या फिती लावत सलून व्यवसाय बचाव आंदोलन करण्यात येणार आहे. 

नागपूर : गेल्या अडीच महिन्यांपासून सलून व्यवसाय लॉकडाऊनमुळे बंद आहे. त्यामुळे, व्यावसायिकांसह कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. नागपूरचे जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना याबाबत वेळोवेळी निवेदने देण्यात आली आहेत. मात्र, त्यावर कुठलेही पाऊन न उचलण्यात आल्यामुळे सलून व ब्यूटीपार्लर व्यावसायिक शनिवारपासून 'माझे दुकान माझी मागणी' आंदोलन करणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष सतीश तलवारकर यांनी दिली. 

याबाबत युवा विभागाचे अध्यक्ष अमोल तळखंडे, उपाध्यक्ष आनंद आंबोलकर, कार्याध्यक्ष श्‍याम चौधरी सरचिटणीस डॉ. सतीश फोपसे, शुभांगी भोयर, रंजना चौधरी, अर्चना जांभूळकर यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त, पालकमंत्री यांना निवेदनाची प्रत देऊन विविध मागण्यांसाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनाबाबतची माहिती दिली. शनिवारपासून सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सलून व्यावसायिक आपआपल्या दुकानांसमोर बसून आंदोलन करणार आहेत. यावेळी काळ्या फिती लावत सलून व्यवसाय बचाव आंदोलन करण्यात येणार आहे. 

हेही वाचा : वरुडच्या दोन युवकांचा शेकदरी धरणात बुडून मृत्यू 

या आंदोलनाद्वारे कंटेनमेंट झोन वगळता सलून व ब्यूटीपार्लर दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी. दुकान, घरभाडे व तीन महिन्यांचे विद्युत बिल माफ करावे. व्यावसायिक व कामगारांना आर्थिक मदत राज्य शासनाने जाहीर करावी. व्यवसाय प्रक्रियेबाबत शासनाने अधिसूचना जाहीर करावी, आदी मागण्या करण्यात येणार आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'My shop, my demand' movement